देसाई, दौलतराव उर्फ बाळासाहेब : (१० मार्च १९१० – २४ एप्रिल १९८३). महाराष्ट्राचे माजी मंत्री व लोकनेते. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील विहे (ता. पाटण) येथे झाला. ते दीड वर्षांचे असताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला. वडील श्रीपतराव अशिक्षित असल्यामुळे व घरच्या गरिबीमुळे लहानपणापासूनच त्यांना प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागले. यातून मार्ग काढण्यासाठी ते कोल्हापुरात आले. तेथे वसतिगृहांत राहून शिक्षण घेता येईल, असे त्यांना वाटले; परंतु सुरुवातीला त्यांना तेथे प्रवेश मिळाला नाही. तेव्हा त्यांनी दवाखान्यातील झाडलोट व इतर मिळेल ती कामे स्वीकारून आपले शिक्षण सुरू ठेवले. इंग्रजी चौथीच्या परीक्षेत १५० विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. त्यामुळे त्यांना प्रिन्स शिवाजी वसतिगृहात प्रवेश मिळाला. एल. एल. बी. होईपर्यत ते तेथेच राहिले. करवीर पीठाचे क्षात्रजगद्गुरू सदाशिव पाटील यांचे बंधू दाजीराव यांची कन्या बानुताई हिच्याशी त्यांचा विवाह झाला (१९३०).
बाळासाहेबांनी १९३७-४० मध्ये कराडमध्ये वकिलीचा व्यवसाय केला. पुढे ते सातारा जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य (१९३९) आणि अध्यक्ष झाले (१९४१-५२). बोर्डाची आर्थिक स्थिती ढासळलेली असताना सरकारी मंजुरीच्या अपेक्षेवर काढलेल्या ५५ शाळा व ३८८ शिक्षकांचा प्रश्न त्यांनी कौशल्याने सोडविला. याशिवाय सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना अमलात आणणारे मुंबई प्रांतातील सातारा जिल्हा लोकल बोर्ड हे पहिले बोर्ड ठरविले.
द्विभाषिक मुंबई राज्यात यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री व बाळासाहेब बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री झाले (१९५७-६०). त्यांनी या खात्याचा बारकाईने व तौलनिक अभ्यास केला. ज्यावेळेस अर्थसंकल्पात रस्ते खर्चासाठी सोळा कोटींमधील फक्त दोन कोटी महाराष्ट्रासाठी व चौदा कोटी गुजरातसाठी ठेवले गेले, तसेच गुजरातमधील पाटबंधारे कालव्यांची (कॅनॉल्स) कामे शोभीवंत फरशी (टाइल्स) बसवून करण्याचे ठरले, तेव्हा हा महाराष्ट्रावर होणारा अन्याय त्यांनी कणखरपणे पुराव्यांसह मांडला. परिणामी महाराष्ट्रातील रस्त्यांसाठी चौदा कोटी रु. तसेच इतर योजनांवरही खर्च करण्याचा निर्णय झाला. मुंबई-गोवा हमरस्ता, भुईबावडा व करूळसारखे घाट रस्ते, किल्ले व खेड्यांकडे जाणारे रस्ते, पूल, कालवे इ. कामे त्यांनी केली. कोयना धरण योजनेला आर्थिक, प्रशासकीय, मनुष्यबळ इ. सर्व प्रकारची मदत मिळवून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला.
महाराष्ट्र राज्याचे पहिले शिक्षणमंत्री असताना त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले (१९६०-६२). ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. १२०० च्या आत आहे, अशा आर्थिकदृष्ट्या मागास पालकांच्या मुलांना सर्व शिक्षण मोफत देण्याची योजना (ई. बी. सी.) त्यांनी १३ जून १९६० रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडली. शिक्षण घेताना गरिबी आड येऊ नये, हा या योजनेचा हेतू होता. कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांचे मोलाचे योगदान होते. याशिवाय त्यांनी सैनिकी, तांत्रिक ग्रामशिक्षणास महत्त्व दिले. प्राथमिक व माध्यमिक शाळा खेड्यापाड्यांत, तंत्रशिक्षणाच्या शाळा जिल्ह्याजिल्ह्यांत सुरू केल्या.
कसेल त्याची जमीन हा दृष्टिकोणातून कृषी खात्याचे मंत्री असताना त्यांनी शेती सुधारणेच्या योजना कार्यान्वित केल्या (१९६२-६३). शेतीसाठी बडींग योजना, विहीर खोदाई, पाणी उपसण्यासाठी तगाईवर इंजिन देणे, नव्या जातीच्या पिकांचे संशोधन, अन्नधान्ये, कडधान्ये, फळबाग व नगदी पिके वाढविणे, देविराज लांब धाग्याच्या कापसाची योजना इत्यादींमधून त्यांनी शेतकऱ्यांना फायदा करून दिला. कृषी, पशुसंवर्धन पदवीधरांची वेतनश्रेणी वाढवून अभ्यासू व कर्तव्यदक्ष लोक कृषी खात्याकडे वळविले. तसेच त्यांनी कोल्हापूर येथे कृषी महाविद्यालयाची स्थापना केली (जून १९६३).
१९६३ ते १९६७ या काळात बाळासाहेब गृहमंत्री झाले. त्यांनी मधुसूदन गोळीबार, औरंगाबाद स्फोट इत्यादी प्रकरणांत विघातक शक्तींना कठोर शासन दिले. पुणे, नागपूर, औरंगाबाद अशा नव्या पोलीस आयुक्तालयांची निर्मिती केली. पोलीस निवासव्यवस्था, पोलीस उपनिरीक्षकांच्या जागा वाढविल्या. महसूल खात्याचे मंत्री असताना (१९६७-७०) कुळ कायद्याची अंमलबजावणी, धान्योत्पादनाच्या विविध योजना, जमीनधारकांना खाते पुस्तकांचे वाटप, आधुनिक पद्धतीने शेती, शेतीशिक्षण व संशोधनावर भर, कोल्हापूर येथे महसूल न्यायालयाची स्थापना, नवा जमीन महसूल कायदा व ६०० वाड्यांचे स्वतंत्र महसूली गावांत रूपांतर हे त्यांचे निर्णय महत्त्वपूर्ण होते. प्रशासनामध्ये दरारा व कडक शिस्त निर्माण करणारे ‘लोकमंत्री’ म्हणून त्यांची ख्याती होती.
११ डिसेंबर १९६७ रोजी कोयना परिसर भूकंपाने हादरून गेला. यावेळी भूकंपग्रस्तांना सर्व प्रकारचे साह्य करून शासकीय मदत मिळवून दिली. पाटण परिसरात विविध संस्था, कार्यालये, रस्ते, सहकारी साखर कारखाना, कोयना एज्युकेशन सोसायटी, माध्यमिक शाळा व महाविद्यालय इत्यादींची उभारणी केली. तर कोल्हापूर येथील भुयारी गटार योजना, एस. टी. स्थानक, गुळ संशोधन केंद्र, जोतिबा डोंगरावर सुविधा, रस्ते, धरण इमारती, सरकारी कार्यालये इत्यादींची उभारणीत योगदान दिले.
बाळासाहेबांनी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया व शिवाजी पार्क या ठिकाणी छ. शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळे उभे केले. मल्लविद्या व तमाशा या कलांना त्यांनी प्रोत्साहन दिले. कुस्ती परिषदेचे ते अध्यक्ष होते. परिषदांना अनुदान, पैलवानांना बक्षिसे व मानसन्मान, कुस्ती प्रशिक्षण, कुस्ती पंचांची शिबिरे इ. माध्यमांतून त्यांनी कुस्ती कलेचा विकास साधला. कुस्तीच्या मैदानावरील करमणूक कर त्यांनी रद्द केला. त्यांच्या प्रयत्नामुळे तमाशाचा जाचक करमणूक कर माफ झाला. बाळासाहेब उच्च अभिरुचीचे रसिक होते. साहित्य, नाटक, संगीत इत्यादींमध्ये त्यांना स्वारस्य होते.
मुंबई येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- थोरात, आत्माराम गोपाळराव, लोकनेते बाळासाहेब देसाई : जीवन आणि कार्य, कोल्हापूर, २०१३.
- बागल, माधवराव, माझा परिवार, कोल्हापूर, १९६६.
समीक्षक : अरुण भोसले