केशनलिकेमध्ये पृष्ठताणामुळे दिसून येणारा आविष्कार. काचेची नळी, जिच्या आतील पोकळ भागाची त्रिज्या अतिशय लहान असते, तिला ‘केशनलिका’ असे म्हणतात. केशनलिकेचे एक टोक पाण्यात बुडवले, तर नळीत पाणी आपोआप वर चढते आणि आतील पाण्याची पातळी बाहेरील पाण्याच्या पातळीपेक्षा वर असते. कारण, पाण्याच्या दोन रेणूंमधील एकमेकांना आकर्षित करणारे बल म्हणजे समाकर्षण बल (cohesive force) हे तुलनेने कमी असते, आणि काच व पाणी यांच्या रेणूंमधील बल म्हणजे विषमाकर्षण बल (Adhesive force) तुलनेने अधिक असते. परिणामी काचेला चिकटून असलेले पाण्याचे रेणू वर खेचले जातात आणि आतील पाण्याची पातळी वर जाते. याचा आणखी एक परिणाम असाही होतो की, काचेच्या केशनलिकेच्या आतील पाण्याचा पृष्ठभाग अंतर्वक्र होतो. पारा व काच यांच्यातील नाते नेमके उलट असते. म्हणजे समाकर्षण बल तुलनेने अधिक असते व विषमाकर्षण बल तुलनेने कमी असते. म्हणून काचेच्या केशनलिकेत आतील पाऱ्याची पातळी खाली असते आणि पृष्ठभाग बहिर्वक्र असतो. द्रवांच्या या गुणधर्माला ‘कैशिकता’ असे म्हणतात. पाणी व पारा यांच्या या गुणधर्मातील फरकामुळेच पाणी काचेला चिकटते, आणि पारा चिकटत नाही.
द्रवामध्ये केशनलिका अर्धवट बुडविली असता, बाहेरच्या द्रवपातळीपेक्षा केशनलिकेतील द्रवाची पातळी जास्त असते (उदा., पाणी) किंवा कमी असते (उदा., पारा). ज्या द्रवांचा स्पर्शकोन (घन-द्रव आंतरपृष्ठ व द्रव-हवा आंतरपृष्ठ यांतील कोन) ९०° पेक्षा कमी असतो ते द्रव केशनलिकेत वर चढतात, तर ज्यांचा स्पर्शकोन ९०० पेक्षा जास्त असतो अशा द्रवांची केशनलिकेतील पातळी बाहेरच्या द्रवपातळीपेक्षा कमी असते.
झाडांच्या मुळांपाशी घातलेले पाणी झाडाच्या अगदी वरच्या शेंड्यापाशी असलेल्या पानांना मिळते. कित्येक मीटर उंचीपर्यंत पाणी झाडांमधून सतत वर जात रहाते. कारण झाडाच्या खोडात अनेक सूक्ष्म केशनलिका असतात. त्यातून पाणी वर खेचले जाते. तसेच ज्योत तेवत असतांना वरच्या टोकाशी असलेले तेल किंवा तूप जळून जाते. तरीही ज्योत शांतपणे तेवत रहाते.कारण कापसाच्या ज्योतीमध्ये असंख्य सूक्ष्म केशनलिका असतात आणि त्यातून तेल किंवा तूप सतत वर खेचले जात असते.
कळीचे शब्द : #केशनलिका #पृष्ठताण #स्पर्शकोन.
समीक्षक : माधव राजवाडे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.