ऑडन, विस्टन ह्यू : (२१ फेब्रुवारी १९०७ – २८ सप्टेंबर १९७३). इंग्रज कवी, लेखक व नाटककार म्हणून प्रसिद्ध. जन्म इंग्लंडमधील यॉर्क येथे झाला. त्यांचे बालपण बर्मिंघॅममध्ये गेले आणि शिक्षण ऑक्सफर्डच्या क्राइस्ट चर्चमध्ये झाले.ऑक्सफर्ड विद्यापीठाचे ते पदवीधर होते. ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी विज्ञान व अभियांत्रिकीचा अभ्यास केला. त्याचबरोबर त्यांनी ग्रीक साहित्य, प्राचीन इंग्रजी काव्याचा अभ्यास केला.त्यांचे विज्ञानाचे आकर्षण कधीच कमी झाले नाही, म्हणूनच त्यांच्या काव्यामध्ये वैज्ञानिक संदर्भ वारंवार येतात. ऑक्सफर्ड येथे असताना ऑडन आधुनिकतावादी काव्याशी परिचित झाले. विशेषत: टी.एस. इलियट. ऑक्सफर्ड येथेही ‘ऑडन ऑक्सफोर्ड ग्रुप’ किंवा ‘ऑडन जनरेशन’ या लेखकांच्या गटाचे मुख्य सदस्य बनले.
ज्यात स्टीफन स्पेंडर, सी. डे लुईस आणि लुई मॅकनिस यांचा समावेश होता. थॉमस हार्डी, रॉबर्ट फ्रॉस्ट, विल्यम ब्लेक, एमिली डिकिंसन, जेरार्ड मॅन्ले, हॉपकिन्स यांच्या कवितांनी ते प्रभावित झाले. इंग्रजी भाषेला नवीन चेहरा देणारी कविता त्यांनी लिहिली. वाड्मयीन कर्तृत्वाच्या आरंभकाळात त्यांच्यावर मार्क्सवादाचा प्रभाव होता. क्रिस्टोफर इशरवुड,स्टीव्हन स्पेंडर, सेसिल डे ल्यूइस या मार्क्सवादाने भारलेल्या इंग्रज साहित्यिकांचे नेतृत्व ऑडन यांनी केले.
१९३० मध्ये त्यांचा पोएम्स (Poems) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर १९३४ मध्ये द ऑरेटर्स (The Orators) या पुस्तकातून त्यांच्या दीर्घ कविता प्रसिद्ध झाल्या. १९३६ मध्ये विख्यात जर्मन कादंबरीकार टोमास मान यांची कन्या एरिका मान हिच्याशी विवाह झाला. स्पेन यादवी युद्धात लढणाऱ्या डाव्यांबद्दल सहानुभूतीने प्रेरित होऊन ते स्पेनला गेले. १९३७ मध्ये त्यांना काव्याचे किंग जॉर्ज सुवर्णपदक मिळाले. त्यांनी जर्मनी, आइसलँड आणि चीनला भेट दिली. स्पॅनिश गृहयुद्धात काम केले आणि १९३९ ला इंग्लंड सोडून ते अमेरिकेत गेले.अमेरिकेचे नागरिक झाले.अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांनी काही काळ काम केले. १९४८ मध्ये द एज ऑफ अनक्झीटी साठी (The Age of Anxiety) त्यांना पुलित्झर पुरस्कार (Pulitzer Prize) मिळाला. अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्टस अँड लेटर्स या संस्थेचे सदस्य म्हणून त्यांची १९५४ मध्ये नियुक्ती झाली. पुढे १९५६ ते १९६१ या काळात ऑक्सफर्ड विद्यापीठात काव्याचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या बहुतेक कविता नैतिक मुद्द्यांशी संबंधित आहेत आणि उत्तम असे राजकीय, सामाजिक आणि मानसिक संदर्भ त्यांना आहेत. कवितेच्या सामाजिक आणि राजकीय परिणामांकडे सर्वाधिक लक्ष वेधले असले तरी त्यातील मानसिक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. त्यांच्या सुरुवातीच्या कार्यात मार्क्स आणि फ्राईडच्या विचाराचा प्रभाव कमी होता, परंतु नंतर त्यांनी धार्मिक आणि आध्यात्मिक विचाराचा मार्ग दाखविला. काही समीक्षकांनी ऑडन यांना रोमँटिकविरोधी असे म्हटले आहे. मानवी अस्तित्वाच्या सार्वत्रिक नमुन्यांकरिता ‘विश्लेषक स्पष्टतेचा कवी’ म्हणून ऑडनची कविता अष्टपैलू मानली जाते. संपूर्ण कारकीर्दीत त्यांनी ख्रिस्तोफर ईशरवुड आणि लुई मॅकनिस यांच्याबरोबर लेखनकार्य केले. विसाव्या शतकात सर्वात महान आणि सर्जनशील इंग्रजी कवींपैकी ते एक मानले जातात.
सुप्रसिद्ध लेखक ऑडन हे प्रख्यात नाटककार, लिब्रेटिस्ट, संपादक आणि निबंधकार देखील होते. भांडवलशाही विचार, ब्रिटनमधील मध्यमवर्गाचे वास्तव चित्रण आणि येऊ घातलेली क्रांती यासंबधीचे चिंतन त्यांच्या लेखनातून व्यक्त होते.ऑडन यांनी तीन नाटके लिहिली. द डॉग बिनिथ द स्किन (१९३५), द असेंट ऑफ एफ (१९३६) आणि ऑन द फ्राँटिअर (१९३८) ही ती तीन नाटके होत. ब्रेक्ट या जर्मन नाटककाराचा प्रभाव त्यांच्यावर दिसून येतो. लेटर्स फ्रॉम आइसलँड (१९३७),जर्नी टू अ वॉर (१९३९) ही त्यांची प्रवासवर्णने प्रसिद्ध झाली. त्यानंतरही त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली त्यात अनादर टाइम (१९४०),न्यू इअर लेटर (१९४१), फॉर द टाइम बीइंग (१९४४), द एज ऑफ अँग्झायटी एबरोक एकलॉग (१९४७), कलेक्टेड शोर्ट पोएम्स (१९५०), नोन्स (१९५१), द शील्ड ऑफ आकिलीझ (१९५५), होमेज टूक्लिओ (१९६०) आणि अबाउट द हाऊस (१९६५) या पुस्तकांचा त्यात समावेश आहे. किर्केगॅार, फ्रॅाईड,जेम्स जॅाइस, फ्रांटस् काफ्का, येटस, रिल्के यांसारख्या लेखक आणि विचारवंतांबद्दल त्यांनी लिहिले आहे. १९५६ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात ‘काव्याचा प्राध्यापक’ या नात्याने त्यांनी दिलेले पहिले व्याख्यान सखोल चिंतनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण ठरले. याशिवाय ऑक्सफर्ड पोएट्री (१९३६), ऑक्सफर्ड बुक ऑफ लाईट व्हर्स (१९३८), द फेबर बुक ऑफअफोरिझम्स (१९६२), नाइंटिथ सेंचुरी मायनर पोएटस (१९६६) या ग्रंथांचे संपादन त्यांनी केले.विस्टन ह्यूऑडन यांनी १९५४ ते १९७३ या काळात ‘अमेरिकन कविंच्या अकादमीचे कुलगुरू’ म्हणून काम पाहिले.
तीन दशकांहून अधिक काळ ऑडन यांनी लेखन केले. समकालीन वैचारिक परिस्थिती आणि समस्या यांचे आकलन करण्याची तीव्र संवेदनक्षमता त्यांच्या व्यक्तिमत्वाचे मुख्य वैशिष्ट्य होय. साम्यवादापासून कॅथलिक धर्मनिष्ठेपर्यंत त्यांच्या वैचारिक लेखनाचा प्रवास दिसतो. बौद्धिकतेमुळे त्यांच्या काव्यात उदबोधन व नैतिक प्रतिपादनाला महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे गुढवादाला किंवा हळूवार प्रेम भावनेला त्यात फारसे महत्त्व नव्हते. काव्याभिव्यक्ती व काव्यभाषा याविषयी ते अधिक दक्ष व प्रयोगशील होते. त्यांच्या काव्याचे बाह्यांग हे त्यांच्या वैचारिक परिवर्तनाबरोबरच बदलत गेल्याचे दिसून येते. मुख्यतः बुद्धिजीवी वर्गाला उद्देशून त्यांनी काव्य लिहिले. इंग्रजी काव्याच्या इतिहासात १९३० नंतरच्या काळात प्रातिनिधिक विचारवंत कवी म्हणून त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. २९ सप्टेंबर १९७३ रोजी ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना येथे ऑडन यांचे निधन झाले.
संदर्भ :
- https://www.biography.com/writer/wh-auden.
- www.britanica.com/ biography / W. H. Auden.
- www.poetryfoundation.org/ poets/ W.H. Auden.
- ऐसी अक्षरे, दिवाळी २०१९.