बेनेश, एदुआर्त : (२८ मे १८८४ — ३ संप्टेबर १९४८). चेकोस्लोव्हाकिया प्रजासत्ताकाचा एक संस्थापक. बोहेमियातील कॉझलानी ह्या खेड्यात सधन शेतकरी कुटुंबात जन्म. प्राग येथे प्राथमिक शिक्षण घेऊन त्याने पुढील शिक्षण पॅरिस व दी झॉं (फ्रान्स) ह्या विद्यापीठांत घेतले व कायद्यातील डॉक्टरेट ही पदवी मिळविली (१९०८). १९०९पासून प्राग विद्यापीठात तो अर्थशास्त्र व समाजशास्त्र ह्या विषयांचा व्याख्याता झाला. विद्यार्थीदशेतच त्याच्यावर टॉमाश मासारिक ह्या मुत्सद्द्याच्या राजकीय विचारांचा पगडा बसला. पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीस वेनेश मासारिकच्या ‘माफिया’ ह्या गुप्तसंघटनेचा सभासद झाला आणि ते दोघे आस्ट्रियाच्या सत्तेविरुद्ध संविधानात्मक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नरत झाले.

त्यांनी हॅब्जबर्ग राजवटीविरुद्ध जागतिक मतपरिवर्तन करण्यासाठी दौरे काढले आणि १९१६ साली चेकोस्लोव्हाक नॅशनल कौंसिल स्थापन केले. मासारिक या संस्थेचा अध्यक्ष व बेनेश सचिव झाला. १९१८ मध्ये त्यांनी हंगामी सरकार बनविले आणि त्यायोगे चेकोस्लोव्हाकियातील राजेशाही संपुष्टात आणली.

मासारिक नव्या प्रजासत्ताकाचा अध्यक्ष व बेनेश परराष्ट्रमंत्री  झाला. पुढे १७ वर्षे बेनेशने परराष्ट्रखाते सांभाळले. १९२०-२१ या काळात तो पंतप्रधान होता. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्ध दरम्यानच्या काळात त्याने शांततापूर्ण सहअस्तित्व व सहकार्य यांवर भर देऊन  राष्ट्रसंघाच्या कामकाजात भाग घेतला आणि रशियास त्यात प्रवेश मिळवून दिला (१९३४). पॅरिस येथील शांतता परिषदेत त्याने आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले. राष्टंसघामध्ये त्याने जिनीव्हा कराराचा मसुदा तयार केला. राष्ट्रसंघातील मतभेद सोडविण्यासाठी सक्तीचा लवाद नेमण्याची तरतूद करण्यात त्याने पुढाकार घेतला. चेकोस्लोव्हाकियाच्या संरक्षणार्थ त्याने त्रिपक्षीय युती (लिटल एन्तांत) तयार केली. १९२७—३८ दरम्यान तो राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीचा अध्यक्ष होता.

मासारिकनंतर बेनेशची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली (१९३५). या पदावर तो १९३५-३८ व १९४०—४८ यांदरम्यान होता. याच काळात जर्मनीत हिटलरचा उदय झाला व बड्या राष्ट्रांनी त्याच्याशी केलेल्या म्युनिक करारामुळे चेकोस्लोव्हाकियाचा सूदेतन लँड हा भाग जर्मनीला मिळाला व बेनेशचे प्रजासत्ताक धोक्यात आले. बेनेशने आपल्या पदाचा राजीनामा दिला. जर्मनीने दुसऱ्या महायुद्धास सुरुवात केली. तेव्हा बेनेशने प्रथम पॅरिस व नंतर लंडन येथे आश्रय घेतला. लंडनमध्ये त्याने राष्ट्रीय समिती स्थापन करून प्रतिसरकारही स्थापिले (१९४०). इंग्लडने त्यास १९४२ साली मान्यता दिली. या सुमारास त्याने अमेरिकेस भेट देऊन अध्यक्ष फ्रँक्लीन रुझवेल्टशी चर्चा केली. पुढे १९४३ साली तो रशियाला गेला आणि त्याने स्टालिनबरोबर मैत्री व सहकार्य यांबाबत परस्परांत करार केला. मे १९४६ साली त्याची अध्यक्ष म्हणून पुन्हा निवड झाली; पण या काळात चेकोस्लोव्हाकियात कम्युनिस्टांचे वर्चस्व वाढले होते. परिणामतः त्याला कम्युनिस्ट पक्षाचा पुढारी क्लेमन्ट गोटव्हाल्ड याची पंतप्रधानपदी निवड करावी लागली. १९४८ साली कम्युनिस्ट पक्षाने दोन तृतीयांश बहुमत मिळविले. बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे बेनेशने आपल्या पदाचा राजीनामा दिला (७ जून १९४८). काही दिवसानी तो सेझीमॉब्हो ऊस्ट्यी येथे मरण पावला.

बेनेशने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण केले. आंतरराष्ट्रीय सहकार्य व सामूहिक संरक्षणाची तत्त्वे जोपासण्यासाठी कम्युनिस्ट व कम्युनिस्टेतर देशांबरोबर मैत्री प्रस्थापित करणे व टॉमाश मासारिकने घालून दिलेल्या प्रजासत्ताक लोकशाही तत्त्वज्ञानाचा अवलंब करणे, हे त्याच्या परराष्ट्रीय धोरणाचे मुख्य सूत्र होते.

बेनेशने माय वॉर मेम्वार्स (इं. भा. १९२८), डेमॉक्रसी : टुडे अँड टुमारो (इं. भा. १९३९), चेकोस्लोव्हाक पॉलिसी फॉर व्हिक्टरी अँड पीस (इं. भा. १९४४), चेकोस्लोव्हाक्स सेकंड स्ट्रगल फॉर फ्रीडम (इं. भा. १९४४) आणि मेम्वार्स : फ्रॉम म्यूनिक टू न्यू वॉर अँड न्यू व्हिक्टरी (इं. भा. १९५४ अपूर्ण) ही पुस्तके लिहिली. त्याने वृत्तपत्रातूनही स्फुटलेखन केले.

संदर्भ :

  • Benes, Eduard, Memoirs of Dr. Eduard Benes, New York, 1972.
  • Mackonzie, Compton, Dr. Benes, Toronto, 1946.