बेल्जियममधील ल्येझ प्रांतातील एक शहर. लोकसंख्या ६५,२७२ (२०२० अंदाज). हे पूर्व बेल्जियममध्ये, ल्येझपासून नैर्ऋत्येस १० किमी. वर, म्यूज नदीच्या काठावर वसले आहे. या शहराला फार मोठा औद्योगिक वारसा लाभला आहे. लोह, पोलाद व यंत्रनिर्मिती या अवजड उद्योगांचे हे प्रमुख केंद्र आहे. येथील कॉकरील हे पोलाद व रेल्वे एंजिन (लोकोमोटिव्ह) निर्मिती केंद्र विशेष महत्त्वाचे आहे. या उद्योगाची स्थापना इ. स. १८१७ मध्ये जॉन कॉकरील या ब्रिटिश उद्योजकाने केली. या कारखान्यातून १८३५ मध्ये यूरोपातील पहिले वाफेचे रेल्वे एंजिन तयार करण्यात आले. १९५५ मध्ये अस्तित्वात आलेल्या कॉकरील–ऊगे कंपनीचे प्रधान कार्यालय सध्या ल्येझच्या बिशप वास्तूत आहे. या कंपनीचा विस्तार २०० हेक्टर परिसरात आहे. १९७९ मध्ये बेल्जियम शासन या कंपनीचे भागीदार बनले. शहरालगतच्या ॲबीमधील व्हाल सेंट-लँबर्ट हे यूरोपातील सर्वांत मोठ्या काचसामान निर्मिती केंद्रांपैकी एक आहे. शहरात अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत. शहराच्या परिसरात कोळसा खाणकाम व्यवसाय चालतो. कारखानदारीमुळे येथे आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय व नागरी समस्या निर्माण झाल्या आहेत.
समीक्षक : ना. स. गाडे