अनेकार्थसमुच्चय : शाश्वतकोश. संस्कृत वाङ्मयातील एक महत्त्वाचा शब्दकोश.भट्टपुत्र शाश्वत नावाच्या विद्वानाची ही कृती म्हणून शाश्वतकोश या नावानेही ती ओळखली जाते. शाश्वताच्या काळाबद्दल विद्वानांमध्ये एकमत नाही ; मात्र सर्वसाधारणपणे अमरकोशाच्या थोड्या पुढच्या काळात ( इ.स. ६०० च्या आसपास ) त्याने हा ग्रंथ रचला असावा असे मानले जाते. कोशाचे स्वरूप त्याच्या अनेकार्थसमुच्चय या नावावरून स्पष्ट होते. एका शब्दाचे अनेक अर्थ एकत्रितपणे नोंदवणारे आणि भाषेतील एखादा शब्द किती मूर्त अगर अमूर्त गोष्टी वा संकल्पनांचा निर्देश करतो, किती विविध अर्थांनी, व्याकरणदृष्टया किती वेगवेगळ्या लिंग-वचनांत वापरला जाऊ शकतो ते दाखवणारे कोश म्हणजे नानार्थकोश होत.अनेकार्थसमुच्चय  हा कोशग्रंथ याप्रकारचा अनेकार्थकोश किंवा नानार्थकोश आहे. उदा.अब्ज या शब्दासाठी एकार्थकोशात कमल, पद्म, सरसीरुह असे समानार्थी शब्द येतील. साऱ्यांचा अर्थ ‘कमळ नावाचे फूल’ असाच असेल ; परंतु नानार्थकोशात अब्ज या शब्दापुढे कमल, शंख, संख्या असे वेगवेगळे अर्थ दाखवणारे शब्द नोंदवलेले दिसतील.

सुमारे आठशे श्लोकांचा समावेश असलेला हा कोशग्रंथ अनुष्टुप् छंदात असून एकूण सहा कांडांत विभागलेला आहे. प्रारंभी सात श्लोकांमध्ये  ग्रंथपरिचय दिला आहे. कोश कसा वाचावा, यासंबंधीचे मार्गदर्शन त्यात मिळत नाही. पहिले कांड सोडून इतर प्रत्येक कांडाच्या पहिल्या श्लोकात, त्या कांडात काय सांगितले आहे याची माहिती संक्षेपाने दिलेली आहे. पहिल्या तीन कांडांमध्ये सुमारे दीड हजाराहून अधिक शब्दांची उत्पत्ती, लिंग, वचन, रूढी इत्यादींनुसार होणारे वेगवेगळे अर्थ नोंदवलेले आहेत. त्यापैकी पहिल्या कांडाची रचना अशी आहे, की एका श्लोकात एकाच शब्दाचे निरनिराळे अर्थ एकत्रितपणे मिळतात. दुसऱ्या कांडात एका श्लोकार्धात, म्हणजे श्लोकाच्या एका ओळीत एका शब्दाचे अर्थ, याप्रमाणे एका श्लोकात एकूण दोन शब्दांचे अर्थ मिळतात. याच पद्धतीने तिसऱ्या कांडातील प्रत्येक श्लोकात चार शब्दांचे अर्थ मिळतात. चौथे कांड लहान असून पुरवणीवजा आहे. पहिल्या तीन कांडांत द्यायचे राहून गेलेले शब्दार्थ यात नोंदवले आहेत. पाचवे व सहावे कांडही लहान असून यांत भाषेतील अव्ययांचे निरनिराळे अर्थ सांगितले आहेत. यांची रचना अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या कांडासारखीच आहे. ग्रंथाचा उपसंहार शेवटी तीन श्लोकांनी होतो.

उपरोक्त तत्त्वांव्यतिरिक्त फार अधिक कोशशास्त्रीय तत्त्वे ह्या कोशात दिसत नाहीत. तसेच हा कोणत्याही विशिष्ट विषयाशी संबंधित कोश नसल्यामुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रांतील शब्द यामध्ये येतात. परंतु ज्या शब्दांचे अर्थ द्यायचे, त्यांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा वर्णानुक्रम यात पाळलेला नाही. त्यामुळे वाचकाला हवा असलेला विशिष्ट शब्द शोधणे अवघड जाते. त्याचप्रमाणे शब्दांचे लिंग, वचन वा इतर व्याकरण देताना सूचक संज्ञा ( उदा. पुम्, नरि, स्त्री, क्लीबे, त्रिषु इ. ) न वापरता थेट लिंग-वचन-विभक्तीनुसार होणारी रूपे ( उदा. कृष्ण या शब्दाची कृष्णः, कृष्णा, कृष्णम् इ. रूपे ) देण्यात आली आहेत. त्यामुळे नामे व विशेषणांतील फरक लक्षात येत नाही. मराठीतील महाराष्ट्र शब्दकोश या कोशाच्या प्रस्तावनेत शाश्वताच्या शैलीचे वर्णन पाल्हाळपद्धत असे केलेले आहे. परंतु खुद्द शाश्वताच्या म्हणण्यानुसार हा ग्रंथ विद्वानांसाठी नसून नव्याने अभ्यास करणाऱ्यांसाठी रचलेला असल्यामुळे त्यांना सहजगत्या आत्मसात्  होण्यासारखी सहज, सोपी भाषा यात वापरण्यात आली असावी, असे निरीक्षण सी. फ़ोगेल (C.Vogel) या विद्वानाने नोंदवले आहे.  तरीही कोशशास्त्रीयदृष्ट्या ह्या ग्रंथाला पूर्णत्व नसल्यामुळे हा पूर्ण कोश नसून खंडकोश आहे असे म्हटले जाते.

या कोशाची रचना करताना आपण तीन व्याकरणग्रंथ व पाच लिंगशास्त्रे यांचा आधार घेतल्याचे शाश्वताने नमूद केले आहे. मात्र, हे ग्रंथ नेमके कोणते असावेत याबद्दल खात्रीलायक संदर्भ उपलब्ध नाही. या कोशाच्या एका आवृत्तीचे संपादक ना.ना. कुलकर्णी यांच्या मतानुसार, यांतील एक नाव चंद्रगोमी या व्याकरणकाराच्या ग्रंथाचे असावे. तसेच शाश्वतकोश व अमरकोश या दोन्हींमध्ये अनेक ठिकाणी आढळणारे साम्य पाहता अमरकोशाचाही मोठा आधार शाश्वताने घेतला असावा, असे वाटते.याव्यतिरिक्त कोशरचनेमध्ये आपल्याला श्रीविद्याविलासाच्या दरबारातील महाबल, खुडुल व वराहासारख्या कवी व विद्वानांचे साहाय्य झाल्याचेही शाश्वताने नमूद केले आहे. यांपैकी पहिल्या तीन नावांबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही, तर वराह म्हणजे प्रसिद्ध शास्त्रज्ञ वराहमिहिर असावा, असे काही अभ्यासक मानतात.

खंडकोश म्हणून याला प्रसिद्धी असली, तरी वाङ्मयातील या ग्रंथाचे महत्त्व कमी होत नाही. या कोशावर भाष्य उपलब्ध नसले, तरी अमरकोशावरील क्षीरस्वामी, सर्वानंद, रायमुकुट इत्यादींच्या टीकांमध्ये त्यातील उद्धरणे आढळतात. मेदिनीकोश, मंखकोश, कोशकल्पतरूसारख्या ग्रंथांत संदर्भग्रंथांच्या यादीत शाश्वतकोशाचे नाव दिसते.अर्थविस्तारानुसार शब्दरचनेचे तत्त्व पुढे अनेकार्थध्वनिमंजरी, वाहारावली यासारख्या कोशांनी उपयोगात आणल्याचे दिसून येते. किंबहुना, या कोशाच्या रचनेचा काळ इ. स. ६०० च्या आसपास मानल्यास सध्या उपलब्ध असलेल्या व विशिष्ट विषयांना वाहिलेले कोश वगळता नानार्थकोशांपैकी हाच सर्वात पुरातन कोश ठरत असल्याने त्याचे महत्त्व अमरकोशाप्रमाणेच आहे असे म्हटले जाते.

संदर्भ :

  • Kulkarni, N.N. ( Ed.), The Anekārthasamuchchaya of Śāśvata, Oriental Book Agency,Poona,1929.
  • Oka, Krishnaji Govinda,  Nāmaliṅgānuśāsana of Amara ( Amarakoṣa ) with the commentary ( Amarakoṣodghāṭana ) of Kṣīrasvāmin, Poona,1913.
  • Zachariae, Theodor( Ed.), Anekāṛthasamuccaya of Śāśvata or Śāśvatakośa. Berlin,1882.