बुद्धवंस : गौतमबुद्ध व त्याच्या आधीचे चोवीसबुद्ध यांच्या चरित्राचे वर्णन करणारा पाली भाषेतील ग्रंथ. विनयपिटक आणि दिघनिकायामधे लिहिल्याप्रमाणे गौतमबुद्धाच्या आधी सहा बुद्ध होऊन गेले, पण बौद्धसिद्धांत विकसित होऊन प्रस्थापित होईपर्यंत आणि बौद्ध धार्मिक ग्रंथ संपूर्ण होईपर्यंत एकंदर चोवीस बुद्ध होऊन गेले.या चोवीसबुद्धांचे चरित्र हे दीपंकर या बुद्धापासून सुरू होते.त्याने सुमेध हा भविष्यातील बुद्ध असेल असे भाकीत केले. त्यानंतर गौतमबुद्धाच्या आयुष्यापर्यंतचा सर्व प्रवास या ग्रंथात वर्णन केला आहे.
पकिण्णककथा हा बुद्धवंसाच्या कथाभागामधील संमिश्र कथाभाग आहे. त्यानंतर परत पूर्वबौद्धांचा उल्लेख येऊन तण्हंकर, मेधंकर आणि सरणंकर ह्या तीन बुद्धांचा उल्लेख येतो. शेवटी मैतेय ह्या भविष्यातील बुद्धाचा उल्लेख केलेला दिसून येतो. ह्या ग्रंथाची सुरूवात उत्कृष्टरत्नमार्गाच्या वर्णनाने होते. याला रत्नचंकम असे म्हणतात. असे म्हटले जाते की गौतम जेव्हा बौद्धत्वाला पोहोचला तेव्हा हा आकाशमार्ग त्याने रचला आणि त्यावर प्रथम पाऊल ठेवले. सारीपुत्त बुद्धाला त्यावेळी तो आपल्या पाचशे अर्हंतांसह भेटला. त्यावेळी सारीपुत्ताने बुद्धाला बौद्धत्त्व मिळविण्यासाठी काय करावे? असा प्रश्न केला असता बुद्धाने त्यास उत्तरादाखल त्याच्या पूर्वी झालेल्या चोवीसबुद्धांचे चरित्रवर्णन केले. बोधिसत्त्व म्हणून त्याने प्रत्येक बुद्धाच्या मार्गदर्शनाखाली काय काय केले ह्या बद्दल सारीपुत्ताला सांगितले. ऐतिहासिकदृष्ट्या हा ग्रंथ त्या चोवीस बुद्धांच्या चरित्रासह गौतमबुद्धाचाही इतिहास स्पष्ट करतो. या चोवीस बुद्धांची नावे पुढीलप्रमाणे : दीपङ्कर, पदुम, नारद, पदुमुत्तर, सुमेध, सुजात, पियदस्सि, अत्थदस्सि, धम्मदस्सि, सिद्धत्थ, तिस्स, फुस्स, विपस्सि, शिखि, वेस्सभु, ककुसन्ध, कोणागमन, आणि कस्सप. कस्सपा नंतर गौतम आणि भविष्यातील बुद्ध मैत्तेय्य. या पैकी दिघनिकायामधे ज्या सहा बुद्धांचा उल्लेख येतो ते म्हणजे विपस्सि, सिखि, वेस्सभु, ककुसन्ध, कोणागमन आणि कस्सप. ह्यांचा उल्लेख हा महापधानसुत्त आणि आटानाटियसुत्तामधे आलेला आढळतो. याशिवाय मज्झिमनिकायातील मारतज्जनीयसुत्तामधे ककुसन्ध आणि त्यांचा शिष्य संजीवाचा उल्लेख येतो. तर अरुणवति सुत्तामधे सिखि आणि त्यांचे दोन शिष्य अभिभु व संभव ह्यांचा उल्लेख सापडतो. महापधानसुत्तामधे विपस्सिचा इतिहास आला आहे ; परंतु त्यामधील कथाभाग हा बुद्धवंशातील गौतमाच्या कथेशी साधर्म्य दाखवतो. यामुळे प्रो. ओल्डेनबर्ग यांच्या मते ह्या कथा गौतमाच्या इतिहासाशी संबधित नाहीत तर त्या प्राचीन बुद्धांविषयी असून बुद्धाच्या उत्तराधिकार्यांचे चरित्र प्रकाशित करण्यासाठी जोडल्या गेल्या आहेत.
बौद्धसिद्धांतामधे काही भाग उशिरा विकसित झालेला दिसतो. परंपरेत असे मानले जाते की सत्ताविसाव्या विभागातील अठरा श्लोक ही संगीतीकारांनी घातलेली भर आहे. ते मूळ पारंपरिक ग्रंथाचा भाग नाहीत. याचा पुरावा किंवा ह्याला पुष्टी देणारी गोष्ट म्हणजे दीपंकाराच्या आधी ज्या तीन बुद्धांचा उल्लेख येतो त्यांचा गौतमाने ज्या बुद्धांकडून मार्गदर्शन घेतले त्यामध्ये समावेश दिसत नाही. संगीतीकारांनी भर घातली असतानाही वस्तुतः बुद्धवंसाची समाप्ती ह्याच ठिकाणी ह्वावयास हवी होती पण उपलब्ध ग्रंथामधे पुढे आणखी दोन श्लोक येतात ज्यामध्ये बुद्ध, स्वतःचा आणि मैत्तेयाचा उल्लेख करतो. अठ्ठावीसाव्या भागात बुद्धाच्या अवशेषांच्या वाटणीविषयी वर्णन आढळते. जे दिघनिकायाच्या महापरिनिर्वाणसुत्ताच्या वर्णनावर आधारीत आहे. बुद्धवंसावरील टीकाग्रंथात ह्या विषयी उल्लेख सापडत नाही.
बुद्धवंसाच्या रचनेमागची भूमिका स्पष्ट करताना प्रा.नॉर्मन म्हणतात की ह्या ग्रंथामधे गौतमाच्या बुद्ध होण्यापर्यंतच्या प्रवासासाठी त्याच्या पूर्वबुद्धांचा इतिहास स्पष्ट करण्याची गरज होती, ज्यामुळे बुद्धत्वाच्या प्रवासात बोधिसत्त्वाने अलौकिक व अनैसर्गिक असा प्रवास केलेला नाही हा संदेश देता आला असता. बोधिसत्त्वाने प्राप्त केलेले बौद्धत्त्व ही त्याच्या अनेक पूर्वजन्मातून साधलेली पूर्तता आहे हा सिद्धान्त या ग्रंथातून मांडण्यात आणि प्रस्थापित करण्यात आला आहे. जो अभिधम्मासारख्या ग्रंथातून ही विकसित झालेला दिसत नाही. हा संपूर्ण ग्रंथ श्लोक छंदामधे लिहिलेला असून ह्याचा धार्मिकग्रंथामधे समावेश कालांतराने झाला असे आढळते.प्रा.हिनबर असे मत मांडतात की सहा बुद्धांचा उल्लेख दिघनिकायामधे आहे पण चोवीस ही संख्या कदाचित जैन तीर्थंकरांच्या संख्येशी साधर्म्य साधण्यासाठी स्वीकारली असावी.
संदर्भ :
- Morris,Richard, (The Rev.), The Buddhavamsa, Pali Text Society, Oxford University Press, London, 1882.
समीक्षक : तृप्ती तायडे