वनस्पतींच्या निरोगी वाढीवर हानीकारक परिणाम करणारे विविध प्रकारचे जैविक घटक (कीटक, अळ्या, जीवाणू व बुरशी) अन्नप्राप्ती करीत असताना आढळतात आणि त्यांच्या प्रतिकारासाठी वनस्पतीसुद्धा अनेक प्रकारची रासायनिक द्रव्ये तयार करीत असतात. वनस्पतींच्या संरक्षण प्रणालीमधील असेच एक महत्त्वाचे द्रव्य म्हणजे सॅलिसायलीक अम्ल. वनस्पतींची काळजी घेण्याचे महत्त्वाचे कार्य हे अम्ल करते. सॅलिक्सच्या (Salix alba) वृक्षाची साल आणि पाने चघळली, की ताप उतरतो ह्या गोष्टीचे ज्ञान अमेरिकेतील मूळ निवासी रेड इंडियन जमातीला कोलंबसच्या आगमनापूर्वीपासूनच होते. ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात हिपॉक्राटीझ (Hippocrates) हे ग्रीक वैद्य वेदना शमविण्यासाठी सॅलिक्सची पाने रुग्णांना औषध म्हणून देत असत असा त्या वेळेच्या वैद्यकीय ग्रंथांमध्ये उल्लेख आढळतो. या संदर्भाची दखल घेऊन फ्रान्स व जर्मनीमधील शास्त्रज्ञांनी सॅलिक्समधील रोगप्रतिबंधक द्रव्याचा शोध घेण्यासाठी संशोधनास सुरुवात केली. १८२८ साली सॅलिक्सच्या सालीपासून ‘सॅलिसीन’(Salicin) हे द्रव्य काढण्यात जर्मन शास्त्रज्ञ बुक्नर (Buckner) यांना यश आले. सॅलिक्सपासून हे रासायनिक द्रव्य प्रथम हस्तगत करण्यात आल्यामुळे राफेले पिरिया (Raffaele Piria) यांनी त्याचे नाव सॅलिसायलीक अम्ल असे ठेवले. या अम्लाचे ॲसिटील सॅलिसायलीक अम्लात रूपांतरीत करून ते ॲस्पिरीन (Aspirin) या नावाने इ.स. १८९८ मध्ये जर्मनीतील बायर (Bayer) कंपनीने प्रथम बाजारात आणले. ॲस्पिरीन केवळ तापहारी आणि वेदनाशामक म्हणूनच उपयुक्त नसून रक्तक्लथनातही (Blood clotting) त्याचा परिणामकारक सहभाग आहे असे आढळून आल्यामुळे हे औषध वैद्यकीय क्षेत्रात क्रांतिकारक ठरले आहे.
अलीकडील काही वर्षाँत वनस्पतिशास्त्रज्ञांच्या असे निदर्शनास आले आहे की, सॅलिसायलीक अम्लाचा प्रभाव केवळ मनुष्यापर्यंतच मर्यादित नाही तर वनस्पतींच्या आयुष्यातही ते महत्त्वाची भूमिका बजावते. भात, सोयाबीन, बार्ली इ. वनस्पतींमध्ये सॅलिसायलीक अम्लाचे प्रमाण लक्षणीय आहे. वनस्पतीच्या पेशीमधील फिनाईल ॲलेनीन (Phenyl Alanine) या ॲमिनो अम्लापासून सॅलिसायलीक अम्लाची निर्मिती होते. ॲस्पिरीनने वनस्पतींच्या पेशीमध्ये प्रवेश केला की, ॲसिटील एस्टरेज (Acetyl Esterase) या विकराची (Enzyme) क्रिया होऊन ॲसिटील गट वेगळा होतो आणि सॅलिसायलीक अम्ल तयार होते. सॅलिसायलीक अम्ल वनस्पतींच्या वेगवेगळ्या अवयवात परिकाष्ठ ऊतकाद्वारे (Phloem tissue) प्रवाही राहते. ॲस्पिरीनची अर्धी गोळी फुलदाणीतील पाण्यात टाकली की, फुले अधिक काळ ताजीतवानी राहतात. कारण एथिलीन हे वायुमय वनस्पती संप्रेरक पाने – फुले कोमेजण्यास मुख्यत: कारणीभूत असते. ॲस्पिरीनमधील सॅलिसायलीक अम्लामुळे एथिलीनची निर्मिती मंदावते आणि फुले ताजी – टवटवीत राहतात. लेम्ना (Lemna), वोल्फिया (Wolffia), स्पिरोडेला (Spirodela) या पाण वनस्पतींना (Aquatic plants) सॅलिसायलीक अम्ल पाण्यातून दिले असता, त्यांना अल्पावधीतच फुले येतात. अळूच्या ॲरॉइडी कुलामधील वनस्पतींचा पुष्पछद (Floral bract) त्यांच्या दांड्यासारखा अक्षावर बोटीच्या आकाराच्या छेदामध्ये विकसित होतो.
या पुष्पबंधाचे (Inflorescence) एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे तापमान हे आजूबाजूच्या वातावरणाच्या तुलनेत १०० से.ने अधिक असल्यामुळे अशा तप्त फुलातून काही वायुरूप रसायने बाहेर पडतात व आसमंतात असह्य असा दुर्गंध पसरतो. काही कीटक अशा दुर्गंधामुळेच या फुलाकडे आकर्षित होतात व परिणामी परागीभवन सुलभ होते. या फुलामध्ये सॅलिसायलीक अम्ल विपुल प्रमाणात आढळते. ते अम्ल पर्यायी ऑक्सिडेज (Altenate Oxidase) नावाच्या विकराच्या निर्मितीस चालना देते आणि पर्यायी विकर श्वसन क्रियेमध्ये महत्त्वाचा बदल घडवून आणते; त्यामुळे ए.टी.पी (Adenosine Triphosphate) या ऊर्जा संयुगाची निर्मिती मंदावून, श्वसनातून निर्माण झालेली ऊर्जा पेशीचे तापमान वाढविण्यास कारणीभूत ठरते.
काही वनस्पती आपल्या शेजारी वाढणाऱ्या अन्य कुलामधील वनस्पतींना वाढू देत नाहीत, त्यालासुद्धा मुळाद्वारे जमिनीमध्ये सोडलेले सॅलिसायलीक अम्लच जबाबदार असते असे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. सॅलिसायलीक अम्लामुळे विशिष्ट प्रकारची संरक्षित प्रथिने (Protective proteins) वनस्पतींच्या पेशीमध्ये तयार होतात. ही प्रथिने बुरशी, जीवाणू यांचा प्रतिकार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. वनस्पती जेव्हा बुरशी अथवा जीवाणुजन्य रोगाने त्रस्त होतात तेव्हा त्यांची प्रतिकारक्षमता वाढते आणि त्या अशा संसर्गाचा समर्थपणे प्रतिकार करू लागतात. त्यांच्या या गुणधर्मास कायिक संपादित प्रतिरोध (Systemic Acquired Resistance) असे संबोधिले जाते. या घटनाक्रमात सॅलिसायलीक अम्ल आणि त्याचे वायुरूप साधित ‘मिथिल सॅलिसायलेट’(Methyl Salicylate) अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. वनस्पतींच्या रोगग्रस्त भागात तयार झालेले सॅलिसायलीक अम्ल परिकाष्ठ ऊतकाद्वारे (Phloem tissue) अन्य निरोगी अवयवात सहजगत्या जाते, तर मिथिल सॅलिसायलीक हे वायुरूप रसायन हवेच्या माध्यमातून त्या वनस्पतीच्या अन्य अवयवाबरोबर शेजारच्या वनस्पतीपर्यंतही पोहचते. ही दोन्ही रसायने निरोगी वनस्पतींच्या अवयवात जैवरासायनिक बदल (Biochemical changes) घडवून आणतात आणि बुरशी अथवा जीवाणूंचा नवा हल्ला निष्फळ ठरतो. एका अर्थी सॅलिसायलीक अम्ल वनस्पतीमध्ये संभाव्य रोगांचा इशारा देण्याचे आणि त्यावर शक्य ती उपाययोजना आधीच करणार्या संरक्षकाचेच काम करते. ऑक्झिन (Auxin), जिबरलीन (Gibberlline), सायटोकायनिन (Cytokinin), एथिलीन (Ethylene) व ॲबसिसिक अम्ल (Abscissic Acid) या वनस्पती संप्रेरकांच्या उपयुक्त यादीमध्ये आता वनस्पतींच्या आरोग्याची काळजी वाहणार्या सॅलिसायलीक अम्लासही समाविष्ट केले आहे.
संदर्भ:
- Hayat, S and Ahmad, A Salicilyc acid A plant Hormone. Springer publication. ISBNI-4020-5183-2. 2007.
- Jeffreys,Diarmuid “Aspirin: The remarkable story of a wonder drug”,2015.
- Bloomsbury publication, New York. pp 38-40. ISBN 978-1-58234-600-7
- Salicyclic acid: https//www.youtube.com/watch?V=laC64yQLk5A. समीक्षक : नागेश टेकाळे