मसोजी, विनायक शिवराम : (२४ जानेवारी १८९७ – २९ एप्रिल १९७७). विख्यात मराठी चित्रकार. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे एका ख्रिस्ती कुटुंबात झाला. त्यांचे वडील रेव्हरंड शिवराम मसोजी हे स्थानिक चर्चमध्ये काम करीत. विनायक सहा वर्षांचे असतानाच त्यांच्या आई रामकुंवरबाई यांचे निधन झाले. त्यांचे शालेय शिक्षण कोल्हापूर येथे झाले. चित्रकला व क्रीडा या दोन्ही क्षेत्रांत ते बालपणापासूनच हुशार होते.
विनायक यांच्या वडिलांनी आपल्या मुलाचा चित्रकलेतील कल लक्षात घेऊन त्यांना मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थेमध्ये शिक्षण घेण्यास पाठविले; परंतु तेथील पाश्चिमात्त्य ब्रिटिश पठडीतले व वास्तवदर्शनावर भर देणारे शिक्षण मसोजी यांना रुचले नाही. १९१९ ते १९२१ पर्यंत तेथे शिक्षण घेतल्यावर त्यांनी बंगालमध्ये गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापित केलेल्या शांतिनिकेतन येथील कला भवनात सुप्रसिद्ध चित्रकार नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली कलाशिक्षण पूर्ण केले. मसोजी यांच्या शांतिनिकेतन येथे जाण्याच्या निर्णयात त्यांचे मुंबईचे स्नेही सॅम्युअल जोशी व कॅनन जोशी यांचा मोठा वाटा होता. दीनबंधू अँड्र्यूज यांचेही त्यांना मोलाचे सहकार्य लाभले. शिक्षणखर्च व इतर आर्थिक बाजू त्यांचे थोरले बंधू यशवंत यांनी सांभाळली.
मसोजींनी वॉश शैलीत प्रावीण्य मिळविले. चित्रकलेव्यतिरिक्त शांतिनिकेतन येथे त्यांनी धातुकला (metal art), चर्मपत्रावरील कोरीव काम (embossing), काष्ठशिल्पकला (wood sculpture art) अशा व विभिन्न कलाही आत्मसात केल्या. येथे ते इसराज हे वाद्य वाजविण्यास शिकले. शांतिनिकेतनमध्ये संपन्न होत असलेल्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांत ते इसराज वाजवून साथ देत असत. विद्यार्थिदशेतून बाहेर पडल्यावर त्यांची शांतिनिकेतनच्या कलाभवनात कलाशिक्षक म्हणून नेमणूक झाली (१९२८).
मसोजी यांनी ग्रामीण विषयांवरील चित्रे, बायबलवर आधारित धार्मिक चित्रे, शांतिनिकेतन व इतर स्थळांची निसर्गचित्रे, राजकीय प्रसंगांवरील चित्रे अशा विविध प्रकारांची चित्रे काढली. महात्मा गांधी यांना १९२९ मध्ये साबरमती आश्रमात झालेल्या अटकेवर आधारित त्यांनी काढलेले मिडनाइट अरेस्ट हे त्यांचे चित्र खूप गाजले. जलरंग, ग्वाश, काळी शाई, पेन्सिल अशा निरनिराळ्या माध्यमांचा अवलंब करून मोजक्या रेषा व सीमित रंगछटा वापरून ते परिणाम साधत. काष्ठठसा (Woodcut) माध्यमाला शांतिनिकेतनमध्ये सर्जनात्मक भावाविष्काराचे एक प्रमुख माध्यम म्हणून महत्त्व होतेच; परंतु १९२३ मध्ये फ्रेंच प्रिंटमेकर मॅडम अँद्रे कार्पेलेस यांच्या शांतिनिकेतन भेटीनंतर त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले. मसोजींनी या माध्यमात प्रावीण्य मिळवून कागदावर व रेशमी वस्त्रावर महात्मा गांधी, येशू ख्रिस्त, विनोबा भावे इ. व्यक्तिरेखा साकारल्या. मसोजी यांचे कलाशिक्षक नंदलाल बोस व विनोद बिहारी मुखर्जी जपानभेटीहून परतल्यावर तेथील निसर्गचित्रणाचा व ब्रशतंत्राचा प्रभाव त्यांच्यावर होता. साहजिकच मसोजी यांच्यावरही हा प्रभाव पडलेला जाणवतो. मांडणी व ब्रशतंत्राव्यतिरिक्त मसोजींसह बंगाल स्कूलचे अनेक चित्रकार पौर्वात्य जपानी पद्धतीची मुद्रा (seal) ही सहीव्यतिरिक्त कलाकृतीच्या कोपऱ्यात उमटवू लागले.
मसोजी यांनी जपानी छायाचित्रकार हासेगावा ह्यांच्यासमवेत गुरुदेव रवींद्रनाथ यांच्या सूचनेनुसार १९२९ मध्ये हिमालयभ्रमण केले व पोस्टकार्ड आकारात कैलास पर्वत व इतर हिमशिखरांची चित्रे काढली. त्यांनी नंदलाल बोस यांना बडोद्याच्या कीर्ती मंदिरातील भित्तिचित्र करण्यास साहाय्य केले. फैजपूरच्या काँग्रेस अधिवेशनासाठी त्यांनी सजावट केली. गं. दे. खानोलकर यांच्या ग्रंथांसाठीही त्यांनी चित्रे रेखाटली आहेत. १९३६ ते ४० च्या दरम्यान मसोजी अहमदाबादला अंबालाल साराभाई कुटुंबाकडे काही काळ वास्तव्यास होते. तेथे त्यांच्या मुलांची शिकवणी व मोझॅक माध्यमात कल्पक गृहसजावटही त्यांनी केली.
शांतिनिकेतनमध्ये मसोजी तीन दशके राहिले. विद्यार्थी, कलाशिक्षक व नंतर उपप्राचार्य म्हणून तिथे त्यांची कारकीर्द बहरली. त्यांनी नंदलाल बोस व प्रभात मोहन बंदोपाध्याय यांच्यासमवेत शांतिनिकेतनच्या जवळच जमीन खरेदी करून ‘कारू संघ’ स्थापित केला. या कलाकार संघात मसोजींसह राम किंकर, सुधीर खास्तगीर इ. मंडळी होती. ग्रंथ सजावट, भित्तीचित्रे बनविणे अशी विविध तऱ्हेची कामे ही मंडळी करीत असत.
१९५१ मध्ये अवनींद्रनाथ टागोर यांच्या मृत्यूपश्चात टागोर यांनी रूपाकार दिलेले शांतिनिकेतन व पुढे झालेले बदल यांत तफावत होती. अंतर्गत मतभेदांना कंटाळून मसोजी यांनी शांतिनिकेतन सोडले व ते नागपूरला स्थायिक झाले. तदनंतर कलासाधनेत त्यांनी स्वत:ला झोकून दिले. निसर्गदृश्ये तसेच बायबलवरील अनेक चित्रे त्यांनी तेथे काढली. या चित्रांमध्ये त्यांना आंतरिक प्रेरणा देणाऱ्या येशू ख्रिस्त व इतर व्यक्तिरेखांना मसोजींनी धोतर-कुडता व उपरणे अशा भारतीय वेषात सादर केले आहे. ही चित्रे भारताबरोबरच विदेशातही नावाजली गेली. नागपूरच्या ऑल सेंट्स कॅथीड्रलमध्ये असलेले बायबलवर आधारित लास्ट सपर हे चित्र त्यांनी काढलेल्या उत्कृष्ट चित्रांत गणले जाते. काष्ठठसा माध्यमातील विनोबा भावे यांचे त्यांनी काढलेले डिलाईट विदिन हे चित्रही वैशिष्ट्यपूर्ण आहे. ध्यानस्थ मुद्रेतील विनोबांच्या चेहऱ्यावरील शांत भाव त्यांनी काळ्यापांढऱ्या रंगरेषांमधून सूक्ष्म परिणाम साधत व्यक्त केले आहेत. शांतिनिकेतन (१९३२) या चित्रामध्ये रवींद्रनाथ टागोर एका वृक्षाखाली बसलेले आहेत आणि त्यासोबत शांतिनिकेतनचा आजूबाजूचा परिसरही दाखविलेला आहे. या परिसरात अनेक आकृत्या आहेत. रेषांचे सौंदर्य या चित्राचे बलस्थान आहे. या चित्रामध्ये इतर अनेक आकृत्यांच्या पार्श्वभूमीवर रवींद्रनाथांची आकृती चित्राचा केंद्रबिंदू ठरेल अशी त्याची रचना आहे.
मसोजींचा नागपूरमध्ये मृत्यू झाला. ते अविवाहित होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्याचवर्षी महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात मसोजींची चित्रे श्रद्धांजलीच्या रूपात सादर करण्यात आली. १९९० मध्ये जागतिक मराठी परिषदेतर्फे मुंबईत श्रेष्ठ चित्रकार आबालाल रहिमान व विनायक मसोजी या द्वयीच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले व त्या निमित्ताने तपस्वी ही चित्रपुस्तिका प्रकाशित करण्यात आली. डॉ. भानजीभाई पाटणकरलिखित विनायक मसोजी : एक समर्पित कला जीवन हे चरित्रही प्रकाशित झाले. वर्ल्ड एन्काउंटर व इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया या मासिकांच्या मुखपृष्ठांवरही त्यांची चित्रे छापली गेली. राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय, नवी दिल्ली समवेत अनेक महत्त्वाच्या संग्रहालयांत मसोजी यांची चित्रे आहेत.
समीक्षक : मनीषा पोळ