मिस्त्री, पेस्तनजी बोमनजी : (१ ऑगस्ट १८५१ – सप्टेंबर १९३८). प्रसिद्ध भारतीय पारशी व्यक्तिचित्रकार. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांच्या आईचे नाव अवाबाई. पेस्तनजींचे शालेय शिक्षण एल्फिस्टन हायस्कूल, मुंबई येथे झाले. अभ्यासात त्यांचे मन फारसे रमले नाही. शाळेत असल्यापासूनच त्यांना चित्रे काढायची आवड होती. वर्गातील मुले, शिक्षक यांची चित्रे ते चितारत. त्यामुळे अनेकदा त्यांना शिक्षकांचा रोषही पत्करावा लागे. कलेचा वारसा पेस्तनजींना वडिलांकडून मिळाला. कलेचे शिस्तबद्ध शिक्षण घेण्यासाठी वडिलांनी त्यांना वयाच्या तेराव्या वर्षी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थेमध्ये दाखल केले (१८६४). त्यांनी पहिल्यांदा सर जॉन लॉक वुड किपलिंग यांच्याकडे शिल्पकलेेचे धडे घेतले. पुढे किपलिंग लाहोरला गेल्यानंतर हे शिक्षण थांबले. म्हणून मग त्यांनी जॉन ग्रिफीथ्स यांच्याकडे चित्रकलेचे शिक्षण घेतले. चित्रकलेच्या शिक्षणात आधी घेतलेल्या शिल्पकलेच्या शिक्षणाचा त्यांना फायदा झाला.

फिडिंग द पॅरट
सेल्फ पोर्ट्रेट पेस्तनजी बोमनजी

इंग्रज सरकारने ग्रिफीथ्स यांच्या मार्गदर्शनाखाली १८७२ पासून अजिंठ्याच्या गुंफांमधील भित्तिचित्रांच्या प्रतिकृती करण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला. हे काम १२ वर्षे सुरू होते. कलाशाळेत शिकून तयार झालेल्या व शिकणाऱ्या निष्णात विद्यार्थ्यांची या योजनेसाठी निवड करण्यात आली. सुरुवातीस सात विद्यार्थी या योजनेअंतर्गत काम करू लागले व त्यांचे नेतृत्व ग्रिफीथ्स यांच्या गैरहजेरीत पेस्तनजींना सोपविण्यात आले. गुंफेत काळोख असल्याने त्याकाळी रॉकेलचे दिवे लावून त्यामागे आरसे लावून जास्तीत जास्त प्रकाश वाढवून आरेखनाचे (Tracing) काम केले जाई. पण हे काम अत्यंत अवघड होते. या काळात चित्रकारांची राहण्याची व्यवस्था जवळच असलेल्या गावात केली होती. पाण्याचा तुटवडा, जीवनावश्यक वस्तूंसाठी खूप पायपीट या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे सर्व काम या तरुण कलावंतांनी मोठ्या जिद्दीने पूर्ण केले. पुढे या सर्व प्रतिकृती लंडन येथे पाठविल्या गेल्या व ‘क्रीस्टल पॅलेस’मध्ये प्रदर्शित करण्यात आल्या. अजिंठ्याच्या या प्रतिकृतींचे दुर्दैव असे की, त्याच दरम्यान लागलेल्या आगीत या प्रतिकृती जळून गेल्या; परंतु अंजिठा येथील वास्तव्यात पेस्तनजींच्या शैलीला परिपक्वता आली. पेस्तनजींच्या फीडिंग द पॅरेट या गाजलेल्या चित्राची निर्मिती येथे झाली. त्यांच्या पत्नी जीलूबाई त्याकाळी मुंबईहून अजिंठ्यास वास्तव्यास येत असत. या चित्रातील प्रमुख व्यक्तिरेखा त्यांची पत्नी आहे. फीडिंग द पॅरेट या चित्रात पार्श्वभूमीवर अजिंठ्याच्या चित्राची आरेखने दिसतात. १८७६ मध्ये महाराणी व्हिक्टोरिया यांचे खास चित्रकार व्हॅलेंटाईन प्रिन्सेप यांना मदतनिसाची गरज होती. त्यावेळी ग्रिफीथ्स यांनी पेस्तनजींचे नाव त्यांना सुचविले. प्रिन्सेप यांच्या हाताखाली पेस्तनजींना अनेक तांत्रिक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांच्या शैलीवर प्रिन्सेप यांचा प्रभाव पडला. प्रिन्सेप यांच्याकडील नोकरीतून बाहेर पडल्यानंतर मात्र पेस्तनजींनी स्वत:चा व्यवसाय करायचे ठरविले. त्याप्रमाणे तो सुरू केला आणि सोबतीने चित्रकला शिकवण्याचे कामही ते करू लागले (१८७७). त्यांच्या वर्गात मिसेस मकफोर्लेन, मिसेस ग्रांट यांसारख्या तत्कालीन प्रतिष्ठित इंग्रज व्यक्तींचा समावेश होता. पुढे सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थेत ते चित्रकलेचे शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यानंतर तेथे संस्थेचे उपप्राचार्य म्हणून त्यांनी काही कालावधीकरिता कामही पाहिले (१८९४).

पारसी गर्ल

व्यक्तिचित्रणावर हुकूमत असलेल्या पेस्तनजींनी आपल्या सभोवतालच्या तत्कालीन पारशी समाजाच्या भावविश्वाचे चित्रण आपल्या चित्रांमधून समर्थपणे केले. त्यांचे दैनंदिन जीवन, धार्मिक संदर्भ यांचे यथार्थदर्शन घडविले. त्यांच्या चित्रांमधील व्यक्ती या बहुतांशी त्यांच्या घरच्याच असत. पत्नी, मुलगा, भाऊ, मुले इत्यादी; पण प्रत्येक चित्रातील वस्तू, परिसर यांचे बारीक रेखाटन, संयमित पद्धतीचे रंगलेपन फारच प्रभावी असे. त्यामुळेच त्यांची चित्रे आजही जिवंत वाटतात. फिडिंग द पॅरेट या चित्रामध्ये व्यक्तिरेखेच्या चेहऱ्यावरील विचारमग्न उदासीचे भाव जाणवतात. त्यांनी परिधान केलेली पारशी पद्धतीची साडी, त्यावरील नक्षी, लांब बाह्यांचे पोलके, त्यांची केस बांधण्याची पद्धत, उभी राहण्याची ढब इत्यादींतून तत्कालीन पारशी स्त्रियांचे एकंदर राहणीमान बारीक तपशीलांतून दिसून येते. त्यांचे पारसी गर्ल हे चित्र त्यांच्याच मुलीचे आहे. मुलीच्या अंगातील भरजरी नक्षीदार कुर्ता, जरीची किनार असलेला पायजमा आणि मुलीच्या चेहऱ्यावरचे बाळबोध भाव अप्रतिम चितारलेले आहेत. सोबतीला ती निर्देशित करीत असलेले बालचित्र या निरागस भावाला अधिकच गहिरे करते. अशा विविध वैशिष्ट्यांनी संपृक्त असलेली त्यांची चित्रे अधिक परिणामकारक ठरतात व त्याचबरोबर ती सार्वकालिकही आहेत. त्यांची ही चित्रे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात आहेत.

पेस्तनजींनी अनेक चित्रप्रदर्शनात भाग घेतला. कोलकाता येथे भरलेल्या चित्रप्रदर्शनात पारितोषिक मिळविणारे ते पहिले भारतीय चित्रकार होते. १८८३-८४ मधील चित्रप्रदर्शनात त्यांच्या पारसी लेडी स्यूईंग या चित्राला ५०० रुपयांचे बक्षीस मिळाले होते. बॉम्बे आर्ट सोसायटीच्या पहिल्या प्रदर्शनात पारसी टायगर स्लेअर हे चित्र सर्वोत्कृष्ट ठरले. पारसी गर्ल  (१८८७) हे चित्र प्रथम बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात ठेवले होते. १८९८ मध्ये त्यांच्या स्वत:च्या व्यक्तिचित्राला व्हाईसरॉय सुवर्णपदक मिळाले होते. १९०५ मध्ये त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाच्या अल्बमसाठी प्रिन्स आणि प्रिन्सेस ऑफ वेल्स (किंग जॉर्ज आणि क्वीन मेरी), तत्कालीन गव्हर्नर, संस्थानिक यांची चित्रे रंगविली होती. भारतीय विषय आणि त्यास पाश्चात्त्य सौंदर्यशास्त्राची जोड देऊन त्यांनी स्वत:ची खास तंत्रशैली विकसित केली. पेस्तनजींच्या शैलीची तुलना प्रसिद्ध डच चित्रकार रेम्ब्रँट यांच्याशी केली जाते. त्यांना ‘भारतीय रेम्ब्रँट’ असेही म्हटले जात असे.

पेस्तनजींना तीन मुली आणि दोन मुले अशी पाच अपत्ये होती. त्यांपैकी एक मुलगा एरूक्शा बोमनजी आणि त्यांचा मुलगा दादी एरूक्शा हे ही मान्यताप्राप्त चित्रकार म्हणून प्रसिद्ध झाले. कोकणातील देवरूख येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या संग्रहात दादी एरूक्शा यांची चित्रे पहावयास मिळतात.

संदर्भ :

  • संपा. बहुलकर, सुहास; घारे, दीपक, शिल्पकार चरित्रकोश :दृश्यकला, मुंबई, २०१३.

समीक्षक : स्मिता गीध