द सिंथेटिक अँड आर्ट सिल्क मिल्स रिसर्च अॅसोसिएशन : ( स्थापना – १२ जानेवारी, १९५०)
भारतातल्या काही रेशीम उत्पादकांनी १९३९ साली एक स्वतंत्र, मर्यादित स्वरूपाची कंपनी स्थापन केली होती. या कंपनीचे नैसर्गिक व कृत्रिम रेशीम (व्हिस्कॉस व अन्य रेयॉन ) तयार करणार्या उद्योजकांना मोठ्या प्रमाणात सहाय्यभूत ठरणार्या संस्थेत रूपांतर करावे ही कल्पना श्री. धिरजलाल श्रॉफ या गृहस्थाच्या मनात आली आणि १२ जानेवारी १९५० रोजी कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याच्या अखत्यारीत असलेल्या मान्यतेनंतर सस्मिराची स्थापना झाली. कालांतराने ही संस्था केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाशी जोडली गेली. संस्थेचे सुरुवातीचे कार्यालय रेशम भवन या वरळी हिलजवळ बांधण्यात आलेल्या वास्तूत होते. त्यानंतर १२००० चौरस मीटरच्या भव्य जागेत सस्मिराची देखणी इमारत १९५८ साली बांधण्यात आली. संस्थेचा सर्व कारभार वरळीच्या कार्यालयातून चालतो.
रेशम भवनातील वास्तव्यात नैसर्गिक रेशमाचे विविधांगांनी विश्लेषण करून ह्या सहकारी संस्थेने आपल्या कार्यास प्रारंभ केला. दरम्यान वस्त्रोद्योगात आवश्यक काही यंत्रे इथे निर्माण करण्यात आली. अशा तर्हेने भारतीय रेशमाचा व्यवसाय विकसित व्हावा, त्याची निर्यात व्हावी म्हणून प्रयत्नशील असलेल्या सस्मिराने कालानुरूप कृत्रिम तंतूंच्या क्षेत्रात प्रवेश केला. त्या तंतूंचे धागे, कापड, रंग, रसायने यांसंबंधीच्या समस्यावर उपाय शोधण्यास सुरुवात केली. कृत्रिम तंतूच्या व्यवसायात अशा प्रकारची सेवा देणारी ही देशातील महत्त्वाची सहकारी संस्था होय. सस्मिराला आपल्या संशोधन कार्याच्या बळावर आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थात मानाचे स्थान मिळाले. कृत्रिम तंतूसंबधी प्रमाणके (स्टँडंडर्स) ठरविणार्या ‘द इंटर नॅशनल ब्यूरो ऑफ स्टँडर्डडायझेशन ऑफ मॅनमेड फायबर्स’ ( BISFA) या जागतिक संस्थेने सस्मिराला विविध प्रमाणके तपासण्यासाठी मान्यता दिलेली आहे.
वस्त्रोद्योगाच्या क्षेत्रात लागणार्या उपकरणांच्या निर्मिती बाबतीत देखील सस्मिराने सिंहाचा वाटा उचलला. स्वस्त, सुटसुटीत परंतु कार्यक्षम अशी विविध प्रकारची उपकरणे आणि साधने सस्मिराच्या तंत्रज्ञानी तयार केली आहेत. सस्मिरानिर्मित शास्त्रीय उपकरणांनी अनेक प्रशस्तिपत्रके पटकाविली आहेत. तंतू, धागे, कापडयांच्या विश्लेषणासाठी लागणार्या उपकरणांनी सस्मिराची प्रयोगशाळा सज्ज आहे. कृत्रिम तंतूवर विविध प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया करून त्याची गुणवत्ता विविधांगांनी वाढविण्यासाठी, तसेच सामान्य लोक, लष्करातील सैनिक यांच्यासाठी या मानवनिर्मित तंतूंपासून निर्माण केलेले कपडे स्वस्त आणि आगीपासून सुरक्षित कसे होतील याबाबत सस्मिरातील शास्त्रज्ञ काम करत आहेत.
याचबरोबर संस्थेने संशोधन आणि विकास या क्षेत्रातील कामाचा फायदा विकेंद्रित अशा यंत्रमाग व वस्त्रोद्योगातील अन्य उद्योगांना मिळवून दिला. तसेच पर्यावरणस्नेही पद्धती विकसित करणे आणि वाया जाणाऱ्या वस्तूंचा पुनर्वापर करणे याबाबतही सास्मिराने काम केले आहे. आयात पर्यायी पद्धती विकसित करून देशाचे परकीय चलन वाचवण्यात सास्मिराचा वाटा आहे. त्यामुळे सास्मिराला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे आणि काही एकस्वे (पेटंट) मिळवण्यात सस्मिरा यशस्वी झाली आहे. इतकेच नव्हे तर गेल्या पंचवीस वर्षात पुढे आलेल्या तांत्रिक वस्त्रक्षेत्रातही (टेक्निकल टेक्सटाईल) सस्मिरा कार्यरत असून भूतंत्र वस्त्रे (जिओ टेक्सटाइल) मोटार उद्योगातील वस्त्रे, शेतीतील वस्त्रे, वैद्यकीय क्षेत्रातील वस्त्रे, बांधकामातील वस्त्रे अशा विविध क्षेत्रात सास्मिराने आपला ठसा उमटविला आहे.
आपल्या संस्थेत विकसित होणार्या कृत्रिम तंतूविषयीचे ज्ञान, तंत्रज्ञान तरुण पदवीधरांना देण्यासाठी सस्मिरा निरनिराळ्या पदविका अभ्यासक्रमांचे आयोजन करते. कृत्रिम तंतूंच्या निर्मितीपासून त्याचे कापड रंगविण्यापर्यंत विविध विषयांचा त्यात समावेश आहे. मुंबई विद्यापीठातर्फे सेंद्रीय रसायनशास्त्र या विषयात एम.एस्सी. व पीएच्.डी. हे पदव्युत्तर शिक्षण देण्याची सस्मिराला मान्यता दिलेली आहे. याशिवाय, सस्मिरात भिन्न क्षेत्रातील कामगारांना वस्त्रनिर्मितीच्या विषयावर प्रशिक्षण देण्याचे शिक्षणकार्य देखील जोमात सुरू असते.
संदर्भ :
- तुस्कानो, जोसेफ; संशोधन विश्वात, विद्याविकास प्रकाशन, नागपूर.
समीक्षक: दिलीप हेर्लेकर