मिन्कोवस्की, हर्मन : (२२ जून १८६४–१२ जानेवारी १९०९)
मिन्कोवस्की यांनी कोनिग्जबर्ग (Königsberg) येथील विद्यापीठातून पदवी घेतली. १८८५ मध्ये त्यांनी लिंडेमन (Lindemann) यांच्या मार्गदर्शनात डॉक्टरेट मिळवली. १८८३ मध्ये विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना क्वाड्रॅटिक फॉर्मसवरच्या (Quadratic forms) संशोधनपर लिखाणासाठी फ्रेंच ॲकॅडेमी ऑफ सायन्सचा पुरस्कार मिळाला. मिन्कोवस्की यांनी १८८७ ते १८९४ वॉन, १८९४ ते १८९६ कोनिग्जबर्ग, १८९६ ते १९०२ झुरिक आणि १९०२ते १९०९ गॉटींजेन (Göttingen) येथील विद्यापीठांत अध्यापन केले.
क्वाड्रॅटीक फॉर्मसवर संशोधन करताना पुढे त्यांना उच्च मितींच्या भूमितीचा अभ्यास करण्याची गरज भासली. त्या अभ्यासातूनच १८९६ मध्ये त्यांनी अंकाची भूमिती ही नवी गणिती शाखा प्रस्थापित केली. या भूमितीमुळे अंकशास्त्रातील समस्यांसाठी भूमितीमधील पद्धती वापरणे शक्य झाले. १९०२ मध्ये ते गॉर्टिजेन विद्यापीठात काम करू लागल्यावर तिथे कार्यरत असलेल्या सुप्रसिद्ध गणिती डेव्हिड हिल्बर्ट (David Hilbert) यांच्याशी होणाऱ्या चर्चेतून अनेक नव्या फलदायी कल्पनांचा जन्म झाला. १९०७ मध्ये त्यांनी आईनस्टाईन यांच्या विशिष्ट सापेक्षतावादाला गणिती चौकटीत बसवण्याचे महत्त्वाचे काम केले. त्यासाठी त्यांनी अवकाश-काळाची चतुर्मितीची भूमितीचौकट वापरली. या संदर्भात २१ सप्टेंबर १९०८ रोजी जर्मन नॅचरल सायण्टीस्टस् आणि फिजिशिअन्सच्या ८० व्या सभेमध्ये मिन्कोवस्की यांनी केलेले भाषण विज्ञानाच्या इतिहासात अतिशय प्रसिद्ध आहे. यापुढे अवकाश आणि काळ यांच्या स्वतंत्र अस्तित्वाची कल्पना विरून जाईल आणि अवकाश-काळाचे एकत्रित सायुज्य हेच अंतिम सत्य उरेल असे प्रतिपादन त्यांनी केले. अवकाश-काळाची चतुर्मिती भूमिती त्यांनी अधिक विकसित केली. या भूमितीमध्ये पहिल्या तीन मिती या यूक्लिडच्या भूमितीमधील अवकाशीय मिती व चौथी मिती ही काळ निर्देशक मिती मानली जाते. ही भूमिती त्यांनी मॅक्सवेलच्या (Maxwell) विद्युत-चुंबकीय समीकरणांसाठी बनवली होती, पण विशिष्ट सापेक्षतावादाच्या गृहितकांना ती अचूक लागू पडते. या भूमितीत दोन घटनांमधील अवकाश-कालांतर हे जडत्वीय संदर्भ चौकटीवर (inertial frame of reference) अवलंबून नसते. त्या संदर्भात १९०८ मध्ये मिन्कोवस्की यांनी दिलेली आकृती मिन्कोवस्की आकृती (Minkowski diagram) म्हणून प्रसिद्ध आहे. या आकृतीत काळाचे प्रसरण (time dilation) आणि लांबीचे आकुंचन (length contraction) हे विशिष्ट सापेक्षतावादाचे दोन्ही परिणाम सहज पडताळता येतात.
सुरुवातीच्या काळात खुद्द आईनस्टाईन यांना मिन्कोवस्की यांची अवकाश-काळ भूमिती ही एक गणिती कसरत वाटली, परंतु लवकरच त्यांनी तिचे महत्त्व ओळखून तिचा स्वीकार केला. व्यापक सापेक्षता सिद्धांत मांडण्यासाठी या भूमितीचा आईनस्टाईन यांना पुढे खूप उपयोग झाला.
गणितामधील मिन्कोवस्की सौसेज (Minkowski Sausage) आणि मिनकोवस्की कव्हर (Minkowski Cover) या संकल्पनांचे ते जनक आहेत. मिनकोवस्की प्रश्नचिन्ह फल (Minkowski question mark function), मिन्कोवस्की अवकाश (Minkowski space) यांसारख्या इतर अनेक गणिती संकल्पनाही मिन्कोवस्की यांच्या नावाने ओळखल्या जातात.
मिन्कोवस्की यांचे निवडक शोधनिबंध आणि ग्रंथ :
- Das Relativitätsprinzip,Annalen der Physik, १९०७.
- Die Grundgleichungenfür die elektromagnetischenVorgänge in bewegtenKörpern,Nachrichten von der Gesellschaft der WissenschaftenzuGöttingen, Mathematisch-PhysikalischeKlasse, १९०८.
- Raum und Zeit,Jahresbericht der DeutschenMathematiker-Vereinigung, १९०९.
- The Principle of Relativity: A Collection of Original Memoirs. १९५२.
संदर्भ :
- https://www.britannica.com/biography/Hermann-Minkowski
- https://www.thefamouspeople.com/profiles/hermann-minkowski-3334.php
समीक्षक: विवेक पाटकर