टेलर, रिचर्ड एल. : (१९ मे १९६२ )
ब्रिटीश-अमेरिकन गणिती टेलर यांचा जन्म इंग्लंडमधील केंब्रिज आणि शिक्षण तेथील क्लेअर (Clare) विद्यापीठातझाले. अमेरिकेतील प्रिन्सटन (Princeton) विद्यापीठातून अँड्रूवाईल्स (Andrew Wiles) यांच्या मार्गदर्शनाखाली ‘On Congruence’s between Modular Forms’ या प्रबंधावर त्यांना पीएच्.डी. मिळाली.
पॅरीसमधील Institut des Hautes Etudes Scientifiques आणि इंग्लंडमधील केंब्रिज तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठात अध्यापन केल्यानंतर ते हार्वर्ड (Harvard) विद्यापीठात गणिताचे हर्शल स्मिथ (Harchel Smith) प्राध्यापक म्हणून कार्यरत राहिले. सध्या ते अमेरिकेतील स्टॅनफोर्ड (Stanford) विद्यापीठात तसेच आय.ए.एस. (Institute of Advanced Study) या संस्थेत गणिताचे प्राध्यापक आहेत.
अंकशास्त्रातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण प्रमेय म्हणजे फर्माचे अंतिम प्रमेय (Fermat’s Last Theorem) – फ्रेंच गणिती पेरी दि फर्मा (Pierre de Fermat) यांनी १६३७मध्ये व्यक्त केलेली अटकळ, जी १९९५ साली टेलर यांचे मार्गदर्शक वाईल्स यांनी यशस्वीरीत्या सिद्ध केली. या महत्त्वपूर्ण कार्यात टेलर यांनी त्यांना मोलाचे सहाय्य केले आणि त्या शोधलेखात सहलेखनही केले.
वाईल्स यांनी ह्या सिद्धतेत, वर्गक्षेत्र सिद्धांतातील (Class-field theory) अर्धस्थायी विवृत्ती वक्रांसंबंधीचे (Semistable elliptic curves) The Modularity Theorem हे प्रमेयही सिद्ध केले होते. त्याचा वापर करून टेलर यांनी इतर गणितींच्या सहाय्याने हे सिद्ध केले की परिमेय संख्यांच्या क्षेत्रावरील विवृती वक्र हे एक मापांकी रूपांशी संबंधित आहेत. हे प्रमेय आधी तानियामा-शिमुराई अटकळ (Tanniyama–Shimurai Conjecture) म्हणून ओळखले जात होते. टेलर यांचे यासंदर्भातील संशोधन महत्त्वपूर्ण ठरले आहे.
टेलर यांनी इतर गणितींच्या सहाय्याने सान्त क्षेत्रांवरील विवृती वक्रांसंबंधीची (Elliptic curves over finite fields) साटो–टेट अटकळ देखील (Sato–Tate Conjecture) सिद्ध केली.
स्वतंत्रपणे व इतर गणितींबरोबर त्यांचे अठ्ठावीसहून अधिक शोधलेख आणि The Geometry and Cohomology of some Simple Shimura Varieties हे पुस्तकही प्रकाशित झाले. ड्यूक मॅथेमॅटिकल जर्नल (‘Duke Mathematical Journal’) या प्रतिष्ठित नियतकालिकाचे ते सध्या संपादक आहेत.
टेलर यांना एफ.आर.एस. (Fellow of the Royal Society) आणि फेलो ऑफ दि अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटी हे बहुमान मिळाले आहेत. त्यांना मिळालेले काही उल्लेखनीय पुरस्कार: व्हाईटहेड (Whitehead), ऑस्ट्रोवास्की (Ostrowski), कोल (Cole), शॉ (Shaw), क्ले रीसर्च (Clay Research) आणि ब्रेकथ्रू (Breakthrough).
संदर्भ :
समीक्षक : विवेक पाटकर