शहानी, खेम : (१ मार्च, १९२३ – ६ जुलै, २००१)

खेम शहानी यांनी १९४३ साली दुग्ध व अन्न तंत्रज्ञान आणि सूक्ष्मजीवशास्त्र या विषयात बी.एस्सी पदवी प्राप्त केली. १९४७ साली त्यांनी दुग्ध-रसायनशास्त्र विषयात मुंबई विद्यापीठाची एम.एस्सी पदवी मिळवली. १९५० साली ते विस्कॉन्सिंस विद्यापीठात पीएच.डी. झाले.

खेम यांनी १९५० ते १९५२ इलिनोइस विद्यापीठात आणि १९५३ ते १९५७ या कालावधीत कोलंबिया येथील ओहियो स्टेट विद्यापीठात अध्यापनाचे काम केले. १९५७ साली लिंकन येथे नेब्रेस्का विद्यापीठात दुग्ध विज्ञान विभागात ते रुजू झाले. १९९४ साली तेथून निवृत्त झाल्यावर पुढे २००० सालापर्यंत ते तेथेच अध्यापन आणि संशोधनात कार्यरत होते. जैविक प्रक्रिया केलेले अन्न, लॅक्टिक बॅक्टेरिया (प्रामुख्याने Lactobacillus acidophilus), अन्न सुरक्षा, अन्न किण्वन, दुधातील प्रथिने आणि वितंचके, ताकाची गुणवत्ता, अन्नातील प्रतिजैविके, जीवनसत्वे आणि विषारी पदार्थ त्यांच्या संशोधनाचे विषय होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १६ विद्यार्थ्यांनी पीएच.डी.चे प्रबंध सदर केले.

खेम शहानी हे त्यांच्या लॅक्टोबॅसिलस  सिडोफिलस ( Lactobacillus acidophilus) या जीवाणूच्या डी. डी. एस. – १  या प्रजातीच्या शोधासाठी जगभर प्रसिद्ध आहेत. १९५९ साली त्यांनी हे काम नेब्रेस्का विद्यापीठात पूर्ण केले. डी. डी. एस. – १  या प्रजातीचे पोषणमूल्य व स्थैर्य याचा शहानी यांनी सखोल अभ्यास केला. हा जीवाणू ‘प्रोबायोटीक’ म्हणून वापरला जाऊ लागला. जैविकांचा मानवी उपचारासाठी जेव्हा वापर केला जातो तेव्हा त्यास ‘प्रोबायोटीक’ असे म्हणतात. या जीवाणूचे विशेष गुणधर्म म्हणजे ते उदरातील आम्ल सहन करू शकतात आणि आतड्यावर त्यांचे यशस्वी रोपण होते. आतड्यावरती त्याची जनन क्षमता २०० पटीने वाढते. अशा गुणधर्मांनी युक्त अशा जीवाणूचे डी. डी. एस. – १ असे नामकरण करण्यात आले. ‘डिपार्टमेन्ट ऑफ डेअरी सायन्स नंबर १’ याचेच ते लघुरूप आहे. या जीवाणूच्या उपचार क्षमता कशा वाढविता येतील जेणेकरून माणसाच्या प्रकृतीवर त्याचे सकारात्मक परिणाम होतील या दृष्टीने शहानी यांनी आयुष्यभर संशोधन केले. जागतिक आरोग्य संघटनेत त्यांनी सल्लागाराची भूमिका बजावली आहे. त्यांच्या २०० शोधनिबंधांपैकी ८० निबंध हे  प्रोबायोटीक्सवरती होते.

त्यांनी १९८१ साली नेब्रेस्का कल्चर्स नावाची प्रोबायोटीक्स तयार करणारी कंपनी स्थापन केली. नेब्रेस्का येथील प्रोबायोटीक्स पुरविणारी जगातील ही फार मोठी कंपनी आज नावारूपाला आली आहे. जागतिक स्तरावर क्लेअर प्रयोगशाळा, नॅशनल एन्झाइम कंपनी, न्युट्रस्यूटीकल कॉर्पोरेशन, कोव्हाक, ट्वीन प्रयोगशाळा, अराइज अंड शाइन, सेल टेक, अमेरीकन बायोलोजीकल अशा अनेक कंपन्यांचे ते सल्लागार होते.

अमेरिकन दुग्ध संघटनेचे बोर्डेन पारितोषिक आणि गेमा-सिग्मा-डेल्टा हा आंतरराष्ट्रीय सन्मान त्यांना त्यांच्या शेती विषयक कार्यासाठी देण्यात आला. हा सन्मान मिळवणारे ते सर्वात तरुण शास्त्रज्ञ होते. त्यांना नेब्रेस्का विद्यापीठाने सिग्मा XI हा विशेष शास्त्रज्ञ म्हणून किताब बहाल केला. अमेरिकन दुग्ध संघटनेचा लॅक्टिक जीवाणू क्षेत्रात उत्तम संशोधन केल्याबद्दल फायझर पारितोषिकाने त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांची दुग्ध तंत्रज्ञान संस्थेचे सदस्य म्हणून निवड झाली. त्यांनी दोन अमेरिकन एकस्वे प्राप्त केली. Cultivate health from within: Dr.Shahani’s guide to Probiotics हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे.

इटलीमधील सिसिली येथे व्याख्यानासाठी जात असतांना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून नेब्रेस्का विद्यापीठात २००५ साली त्यांच्या नवे स्वतंत्र ‘प्रोफेसर चेयर’ निर्माण केली आहे.

समीक्षक : मोहन मद्वाण्णा