द्युव्ह, ख्रिस्तियान द : ( २ ऑक्टोबर, १९१७ – ४ मे, २०१३ )

ख्रिस्तियान रेने मारी द द्युव्ह (Christian René Marie Joseph, Viscount de Duve) यांचा जन्म ग्रेट ब्रिटनमधल्या सरे येथील थेम्स डिट्टन (Thames Ditton, Surrey, Great Britain) येथे झाला. ते बेल्जियन होते आणि त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य बेल्जियममध्ये व्यतीत केले. त्यांचे शिक्षण ओंझे लिव व्रोवे महाविद्यालय (Onze-Lieve-Vrouwe college) आणि लुवेनचे कॅथॉलिक विद्यापीठ (Catholic University of Leuven) येथे झाले. शाळेत ते नेहेमी आदर्श विद्यार्थी म्हणून गणले जात. कॅथोलिक विद्यापीठात त्यांनी औषधशास्त्राचा अभ्यास केला आणि एम.डी. पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी रसायनशास्त्रात संशोधनास सुरुवात केली आणि इन्सुलिनवर काम केले. ह्या कार्यासाठी त्यांना विद्यापीठातील पी. एचडी. पदवी मिळाली. पेनिसिलीन शुद्धीकरणाच्या संशोधनावर त्यांनी एम. एससी. पदवी मिळविली. त्यांनी लुवेनच्या कॅथॉलिक विद्यापीठातील औषधशास्त्र विभागात कामास सुरुवात केली. पुढे तेथे ते प्रोफेसर व निवृत्तीनंतर इमेरीटस प्रोफेसर झाले.

मानवी शरीर हे मुख्यतः अनेक पेशींपासून बनले आहे, ज्यांच्या आत सूक्ष्म अवयव आणि अनेक घटक असतात, ज्यांच्यामुळे शरीराचा सर्व कार्यभाग व्यवस्थित पार पडतो. विद्युत परमाणु सूक्ष्मदर्शकाच्या शोधामुळे द्युव्ह यांचे काम सुलभ झाले आणि त्यांनी पेशींचा सखोल अभ्यास केला. त्यांनी मुख्यत्वे पेशीमधल्या सूक्ष्म अवयवांचा (Cell organelles) अभ्यास केला. पेशींमधील अज्ञात असलेले दोन सूक्ष्म अवयव – पेरोकसिझोम आणि लायसोझोम (peroxisome and lysosome) त्यांनी प्रथमच शोधून काढले आणि ह्यासाठी त्यांना १९७४ साली नोबेल पुरस्कार मिळाला. पेरोकसिझोम ह्या पेशींच्या आतल्या जीव द्रवात असलेल्या रिक्तिका असतात ज्यांच्यात पेरोक्सैड नावाची रसायने बंदिस्त असतात तसेच लायसोझोम या पेशींच्या आतल्या जीवद्रवात असलेल्या रिक्तिका असतात ज्यांच्यात जीवाणूंना मारणारी लायसोझाइम नावाची विकरे बंदिस्त असतात. नको असलेल्या जीवाणूंना आणि वाया गेलेल्या किंवा वापरून झालेल्या पेशींमधील घटक नष्ट करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो.

द्युव्ह यांनी अनेक वैज्ञानिक संज्ञा जीवशास्त्र विषयात दिल्या, उदा., ऑटोफाजी (autophagy, नको असलेल्या आणि वाया गेलेल्या किंवा वापरून झालेल्या पेशींमधील घटकाना शिस्तबद्धपणे  नष्ट करण्याची नैसर्गिक प्रक्रिया), एन्डोसायटोसीस (Endocytosis, पेशीय प्रक्रिया ज्यामुळे पेशींच्या बाहेर असलेल्या पदार्थांना आत आणले जाते आणि पेशीपटलामध्ये गुंडाळून घेतले जाते) आणि एक्झोसायटोसीस (exocytosis, अतिशय सक्रिय अशी प्रथिने आणि संवेदना प्रेषकाना पेशी पटलातून बाहेर पाठविण्याची प्रक्रिया). ह्या संज्ञा त्यांनी तयार केल्या. त्यांचे जीवरसायनशास्त्राचे ज्ञान त्यांनी जीव निर्मितीच्या अभ्यासासाठी वापरले.

द्युव्ह यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. त्यात प्रामुख्याने फ्रान्क्वी पुरस्कार, गैर्डनर फाउंडेशन आंतरराष्ट्रीय पुरस्कार, जीवरसायनशास्त्र आणि जीवभौतिकशास्त्राचा डॉ. एच. पी. हयनेकेन पुरस्कार, १९७४ सालचा औषधशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार, ग्रेट ब्रिटनच्या जीवरसायनशास्त्र मंडळाचे हर्दन मेडल, अल्बानी वैद्यकीय महाविद्यालयाचा थिओबल्द स्मिथ पुरस्कार, फेलो ऑफ रॉयल सोसायटी पुरस्कार हे पुरस्कार प्रामुख्याने आहेत.

ब्रुसेल्स येथे १९७४ साली त्यांनी पेशी आणि परमाणु विकृतीशास्त्राच्या आंतरराष्ट्रीय संस्थेचा (International Institute of Cellular and Molecular Pathology in Brussels) पाया घातला, त्या संस्थेचे ते अध्यक्ष होते. १९९७ साली, त्यांच्या ८० व्या वाढदिवशी, संस्थेचे नामकरण ख्रिस्तियान द द्युव्ह संस्था (Christian de Duve Institute of Cellular Pathology) आणि २००५ साली ह्या संस्थेचे द द्युव्ह संस्था (de Duve Institute) असे नामकरण करण्यात आले. शास्त्र विषयातल्या संशोधनात प्राविण्य मिळवलेल्या स्त्रियांना दिल्या जाणाऱ्या ओरियाल युनेस्को पारितोषिक देणाऱ्या संस्थेचे ते (L’Oréal-UNESCO Awards for Women in Science)  संस्थापक अध्यक्ष होते.

ख्रिस्तियान द द्युव्ह यांनी अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केले. त्यांच्या जीवनावर, संशोधनाच्या कामावर, नोबेल पुरस्कारावर आणि जीवशास्त्र या विषयाच्या तळमळीवर Portrait of a Nobel Prize: Christian de Duve (Portrait de Nobel : Christian de Duve) हा चित्रपट तयार केला गेला.

औषधनिर्माणशास्त्र, संप्रेरकशास्त्र (Endocrinology), जीवरसायनशास्त्र, पेशीजीवशास्त्र या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केले.

द्युव्ह यांचा मृत्यू बेल्जियममधील ग्रेज दोइसिउ (Grez-Doiceau, Belgium) येथे त्यांच्या संपूर्ण कुटुंबा समोर, इच्छा मरणाने झाला.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे