ग्राबार, पिते : (१८९८ – १९८६)
पिते ग्राबार यांचा जन्म कीवमध्ये झाला. मुळात ते एक रशियन नागरिक होते. त्यांनी फ्रांसमध्ये जीवरसायनशास्त्रज्ञ आणि रोगप्रतिकारशक्तीचे अभ्यासक म्हणून आयुष्यभर काम केले. आपला भाऊ, आंद्रे ग्राबार यांचे बरोबर, ऑक्टोबर क्रांती नंतरच्या काळात, रशियन सिव्हिल युद्धाच्या दरम्यान ते फ्रांसला गेले. त्यांनी रसायन अभियांत्रिकीची पदवी घेतली.
काही काळ व्यवसाय केल्यानंतर स्ट्रासबोर्ग विद्यापीठात (University of Strasbourg) त्यांनी वैद्यकीय संशोधनास प्रारंभ केला. युरेमिया हा मिठाच्या कमतरतेमुळे होतो हे त्यांनी सिद्ध केले आणि किडनी संबंधित केलेल्या संशोधनावर पीएच.डी. मिळविली. ते पाश्चर इन्स्टिट्यूट (Pasteur Institute) येथील प्रयोगशाळेचे प्रमुख झाले आणि पुढे ते सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख झाले. १९४२ साली त्यांनी सोर्बोन (Sorbonne) येथे अल्ट्राफिल्टरेशन अँड देअर ॲप्लीकेशनस ह्या विषयावर दुसरी डॉक्टरेटची पदवी मिळविली. १९३७ सालापासून ते पाश्चर इन्स्टिट्यूट या जागतिक कीर्तीच्या रोगप्रतिकारशक्ती संबंधित रसायन शास्त्राच्या संस्थेत प्रमुख होते. यानंतर त्यांनी विलेजुएफ येथील कर्करोग संशोधन केंद्राचे (Cancer Research Institute of the CNRS in Villejuif) संचालक म्हणून काम पहिले. त्यांनी पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये आपले संशोधनाचे काम त्या दरम्यान सुरुच ठेवले. नंतर त्यांनी अमेरिकन शास्त्रज्ञ कर्टीस विलियम्स (Curtis Williams) यांच्या बरोबर इम्युनोइलेक्ट्रो फोरेसीस हे नवीन तंत्र शोधून काढले, ज्याच्यात इलेक्ट्रो फोरेसीस आणि इम्युनोलॉजीकल (रोग प्रतिकार शक्तीशी संबंधित अर्थात अँटीजन आणि अँटीबॉडीस च्या प्रक्रियेशी संबंधित) तंत्रांचे एकत्रीकरण होते. ह्या शोधाने खूप बदल घडून आला. ऑटोइम्युनिटी (अर्थात स्वतःच्या शरीराने स्वतःच्या पेशी विरुद्ध प्रतिजैविके तयार करण्याची परिस्थिती जी निरोगीपणाचे लक्षण नाही) आणि ऑटो अँटीबॉडीस (अर्थात स्वतःच्या शरीराने स्वतःच्या पेशी विरुद्ध तयार केलेली प्रतिजैविके) हे अनैसर्गिक वाटणारे संशोधन, आज वास्तवात खरे आहे हे निदर्शनाला आले आहे.
त्यांना प्रिक्स जान्सेन पुरस्कार, गैर्डनर फाउंडेशन आंतरराष्ट्रीय पुरस्कार, प्रिक्स जांफे पुरस्कार, एमिल फॉन बेह्रिंग पुरस्कार आणि रॉबर्ट कोच मेडल यांनी सन्मानित केले गेले. ते लिओपोल्दिनचे सदस्य होते.
त्यांच्या प्रयत्नामुळे फ्रेंच सोसायटी ऑफ इम्युनोलॉजीची स्थापन झाली.
संदर्भ :
- Obituary by H. Cleve, Natural Sciences, vol. 73, 1986, p. 728
- Grabar An old biologist remembers , Electrophoresis, vol. 3, 1982, p.1
समीक्षक : रंजन गर्गे