कात्झ, सॅम्युअल : ( १९२७ )
सॅम्युअल कात्झ यांचा जन्म एका अमेरिकन कुटुंबात झाला. ते बालरोगतज्ज्ञ डॉक्टर होते तसेच ते विषाणूचे अभ्यासक होते. त्यांनी आपली कारकीर्द संसर्गजन्य रोगांच्या संशोधनावर खर्च केली. कात्झ डार्टमाउथ महाविद्यालयाचे आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलचे पदवीधर होते. त्यांनी बेथ इस्रायेल हॉस येथे वैद्यकीय उमेदवारी पूर्ण केल्यानंतर मॅसाच्यूसेटस जनरल हॉस्पिटल आणि बॉस्टन येथील लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये रेसिडन्सी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांना विषाणू शास्त्रातील आणि संसर्गजन्य रोगांवर काम करण्यासाठी संशोधन फेलोशिप मिळाली. त्यानंतर ते लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये, नोबेल पुरस्कार विजेते जॉन एन्डरस यांच्या बरोबर काम करू लागले. १२ वर्षे असे काम करीत असताना त्या दोघांनी एडमोनस्टोन (edmonston) गोवरच्या विषाणूंपासून लस तयार केली, जी आता जागतिक स्तरावर वापरली जाते. त्यांनी अन्य रोगजतुंवर तसेच संसर्गजन्य रोगांवरही संशोधन केले. व्हाक्सिनिया, पोलिओ, रुबेल्ला, इन्फ़्लुएन्झा, डांग्या खोकला, एचआयव्ही आणि हिमोफिलस इन्फ्लुएन्झा (Haemophilus influenzae b conjugates) यांच्यावर काम केले.
मिलोवानोविच (Milovanovic) आणि कात्झ यांनी कोंबडीच्या फलित अंड्यात एडमोनस्टोनगोवर लसीचा विषाणू वाढवण्यात यश मिळवले. त्यानंतर त्यांनी ट्रिप्सिनायझेशन प्रक्रियेद्वार म्हणजे ट्रिप्सीन हे विकर वापरून कोंबडीच्या भ्रूणपेशींतील प्रथिनांचे खंडन करून ऊतीसंवर्धन तंत्राने विषाणू पुनःपुन्हा पाच वेळा वाढवण्यात यश मिळवले. तीन वर्षाच्या कालावधीत त्यांनी मानवी वृक पेशींमधून २४ वेळा, अम्निओन पेशींमधून २८, कोंबडीच्या फलित अंड्यामधून ६ वेळा आणि कोंबडीच्या भ्रूणपेशीं वर १३ वेळा हा विषाणू पुनःपुन्हा यशस्वीरित्या वाढवल्यावर ही जिवंत लस (Attenuated vaccine) तयार झाली होती. या प्रक्रियेत विषाणू जिवंत जरी असला तरी त्याची रोगकारकक्षमता नष्ट झालेली असते. माकडात ही जिवंत लस टोचून चाचणी घेण्यात आली. माकडाच्या रक्तात या लसीला प्रतिसाद म्हणून मोठ्या प्रमाणात प्रतिपिंड तयार झाले होते. त्याला ताप आला नव्हता, अंगावर पुरळ आले नव्हते आणि जंतूसंसर्ग नव्हता (Viremia), याचा अर्थ लस उत्तम कार्य करत होती. माणसात चाचण्या घेण्याची वेळ आली तेव्हा मिलोवानोविच आणि कात्झ यांनी ती लस स्वतःलाच टोचून चाचणी घेतली. त्यांच्या रक्तात प्रतिपिंडाची पातळी वाढली होती. कुठलाही वाईट परिणाम दिसला नाही.
पहिली गोवराच्या लसीची चाचणी १५ ऑक्टोबर १९५८ रोजी बॉस्टनच्या प्रयोगशाळेत केली गेली. बॉस्टनच्या जवळच फेर्नाल्ड शाळेतील मतिमंद आणि अपंग मुलांवर ही चाचणी घेतली गेली. दररोज सकाळी आणि दुपारी कात्झ आणि त्यांचा सहकारी होलोवे हे शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करत. त्यांच्या घशाचे आणि रक्ताचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासणी करत. या नमुन्यात त्यांना कधीच विषाणू आढळून आला नाही. मुलांच्या रक्तात प्रतीपिंडांची पातळी वाढलेली होती. विशेष म्हणजे पुढे आलेल्या गोवराच्या साथीत फेर्नाल्ड शाळेतील सगळ्या मुलांना रोगापासून मुक्ती मिळाली होती. याचाच अर्थ या लसीमुळे त्यांना रोगप्रतिकारक शक्ती प्राप्त झाली होती.
कात्झ हे संक्रमित होणाऱ्या बालरोग अमेरिकन संस्थेच्या रेड बुक समितीचे अध्यक्ष होते आणि रोगनियंत्रण केंद्राच्या लसीकरण समितीचे सल्लागार होते. हस्ब्रो चिल्ड्रेन फौंडेशनवर त्यांनी काम केले. २००३ मध्ये त्यांना, त्यांच्या कारकिर्दीतील लसीसंबंधीच्या शोधांसाठी सबिन लस संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या अल्बर्ट सबिन सुवर्ण पदकाने सन्मानित केले गेले. त्यांनी ड्युक विद्यापीठाच्या बालरोग विभागाचे सन्माननीय प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. सन्माननीय शिक्षक पुरस्कार, ड्यूक मेडिकल स्कूल माजी विद्यार्थी संघटनेचा पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार त्यांना मिळाले.
संदर्भ :
- http://www.hamdanjournal.org/article.asp?issn=22272437;year=2014;volume=7;issue=3;spage=421;epage=424;aulast=Katz;type=0
- http://www.nfid.org/awards/katz.pdf
- http://pediatrics.aappublications.org/content/104/5/1123?download=true
- file:///C:/Users/GARGE/Downloads/full%20(1).pdf
समीक्षक : रंजन गर्गे