जेफ्रीस, ॲलेक जॉन : ( ९ जानेवारी, १९५० )
ब्रिटीश जनुकतज्ज्ञ ॲलेक जॉन जेफ्रीस यांचा जन्म ऑक्सफर्ड, इंग्लंड येथे झाला. ८ व्या वर्षी वडीलांकडून रसायनशास्त्रातील उपकरणांचा संच रसायने, सल्फ्युरिक आम्लाची एक बाटली पितळेचा एक व्हिक्टोरिअन सूक्ष्मदर्शक बक्षीस मिळाल्यानंतर त्यांच्या संशोधनाला एक नवीन दिशा मिळाली. १२ व्या वर्षी त्यांनी स्वतः विच्छेदन संच बनविला आणि मांजर आणि मधमाशीचे शव विच्छेदन करुन त्यांचा अभ्यास केला. त्यांचे शिक्षण ल्युटोन ग्रामर स्कूल आणि ल्युटोन सिक्स्थ फोरम महाविद्यालयात झाले. त्यांनी मेरटन महाविद्यालयात ऑक्सफर्ड येथून जीवरसायनशास्त्रातील पदवी, पहिल्या वर्गात मिळवली. विसाव्या शतकात त्यांनी एक खूप महत्त्वाचे डीएनए फिंगर प्रिंटींग प्रोफायलिंगसाठीचे नवीन तंत्र शोधून काढले, जे आता जगभर, न्याय वैद्यकशास्त्रात ( फोरेन्सिक सायन्स), पोलीस तपासासाठी, पितृत्व शोधून काढण्यासाठी वापरले जात आहे. त्या पूर्वीच्या तंत्राने केवळ संशयित गुन्हेगाराची ओळख पटवता येत असे. (खऱ्या गुन्हेगाराची नव्हे)
त्यांनी लायकेस्टर विद्यापीठात (Leicester ) जनुकशास्त्र विषयात प्रोफेसर म्हणून काम केले तसेच जनुकशास्त्राच्या प्रयोगशाळेत, स्तनधारी प्राण्यांच्या पेशींमधील मायटोकॉड्रियावर काम करून डी. फील. ही पदवी मिळवली. त्यानंतर ते ॲमस्टरडॅम विद्यापीठात रिसर्च फेलो म्हणून स्तनधारी प्राण्यांच्या जनुकांवर काम करू लागले. तिथे त्यांनी जनुकांचे तुकडे पडताळून त्यांची तुलना करावयाची एक पद्धत शोधून काढली ज्यामुळे व्यक्ती व्यक्तीच्या जनुकांमधील फरक काढता येऊ लागला. त्यांनी अनुवांशिक जनुकीय फिंगरप्रिंटिंग (genetic fingerprinting ) पद्धतीचा विकास केला ज्यायोगे व्यक्तीची ओळख पटू शकायला मदत झाली. वेगवेगळ्या व्यक्तींमधील ग्लोबीन जनुकांचे नमुने शोधून काढण्यासाठी त्यांनी रिस्ट्रिकशन फ्रेगमेंट लेन्थ पॉलिमोर्फिसम (RFLPs) हे तुकडे वापरले. ह्या तंत्रावर आणखी काम करून त्यांनी शोधनिबंध प्रसिद्ध केले. रिस्ट्रिकशन फ्रेगमेंट लेन्थ पॉलिमोर्फिसम तयार करण्यासाठी त्यांनी डी.एन.ए. च्या साखळीतून विशिष्ट न्यूक्लिक आम्ल वेगळे केले आणि त्यांचा वापर शोधाग्र अथवा प्रोब (probe) म्हणून केला. रिस्ट्रिकशन संप्रेरक (RcoRI) चा वापर करून त्यांनी डी.एन.ए. ला एका साखळीत ग्वानीन आणि एडीनीन आणि त्याच्या विरुद्ध साखळीत एडीनीन आणि ग्वानीनमध्ये शोधाग्राच्या मदतीने तोडले. त्यांच्या प्रयोगांमध्ये त्यांनी विशिष्ट क्रम असलेल्या डी.एन.ए. ला शोधाग्राच्या निशाण्यावर ठेवले. शोधाग्र आणि त्याच्याशी जुळलेला डी.एन.ए. वेगळा केल्यानंतर, इलेक्ट्रोफोरेसीसच्या सहाय्याने दोन्हीचे क्रमवार कितपत जुळतात हे पाहून त्यांच्यातील साधर्म्य शोधायचे तंत्र त्यांनी विकसित केले. जेफ्रीस यांनी डी.एन.ए. प्रोफायलिंग वर काम केले आणि प्रथमच त्यांनी short tandem repeats (STRs) ही चाचणी पद्धत वापरली. खरे तर त्यांनी कवकांमधील पेशींच्या रचनेवर संशोधन करायचे ठरविले होते, परंतु त्यांचे सहकारी रिचर्ड फ्लेवेल यांनी त्यांना एका प्रकल्पावर नेमले ज्यात स्तनधारी प्राण्यांमधील जनुकाना ओळखून त्यांच्यातून एक प्रतिकृती तयार करावयाची होती. ह्यात खास करून सश्यांमधील बीटा ग्लोबीन जनुकाच्या प्रतिकृतीवर काम करावयाचे होते. ह्या जनुकाचे काम स्तनधारी प्राण्यांमध्ये हिमोग्लोबीन प्रथिने तयार करावयाचे असते, ज्यातून रक्तात ऑक्सिजनचे प्रसरण केले जाते. ह्या प्रकल्पादरम्यान त्यांनी ग्लोबीन जनुक ओळखण्याच तंत्र शोधून काढले. ह्या शोधादरम्यान, त्यांच्या लक्षात आले की जनुकांमधले काही भाग शेवटी स्वतःला व्यक्त करीत नाहीत आणि बाकीच्या प्रथिनांच्या रुपात व्यक्त होणाऱ्या जनुकांमध्ये ते असतात, ह्या शोधाचे श्रेय त्यांना मिळाले. अव्यक्त जनुकांचे नंतर इनट्रोन् (intron) असे नामकरण केले गेले. मानवी आणि इतर प्राण्यांमधील हिमोग्लोबीन जनुकांवर काम करून न्यूक्लीअर डी.एन.ए. च्या उत्क्रांती संबंधी शोधनिबंध प्रसिद्ध केले. प्रथिने न तयार करणाऱ्या डी.एन.ए. वर देखील त्यांनी काम केले. मानवी जनुकांच्या शोधावरचे त्यांचे काम महत्त्वाचे ठरले, त्या साखळ्यांच्या क्रमवारीतील साधर्म्याचा उपयोग काही गुन्हेगार शोधण्यात झाला.
त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. त्यात फेलो ऑफ रॉयल सोसायटी (FRS), प्रेस रेडियो टिव्हीचा मिडलेनडर ऑफ द इयर पुरस्कार, रॉयल सोसायटी रिसर्च म्हणून नियुक्ती, ऑनररी फ्रीमन ऑफ लायकेस्टरचा मान, अल्बर्ट आइनस्टइन जागतिकशास्त्र पुरस्कार, ऑस्ट्रेलिया पुरस्कार इत्यादी आहेत.
संदर्भ :
- Evans, Colin (2010). Evidence. New York: Chelsea House. p. 77. ISBN978-1604136159. Retrieved 3 April 2015.
- Jeffreys, A. J. (2013). ’The man behind the DNA fingerprints: An interview with Professor Sir Alec Jeffreys.’‘Investigative Genetics.’ 4(1): 21. PMC 3831583 . PMID 24245655. doi:1186/2041-2223-4-21.
- Johnson, Paul; Williams, Robin (22 March 2006). DNA and Crime Investigation: Scotland and the ‘UK National DNA Database ‘The Scottish journal of criminal justice studies : the journal of the Scottish Association for the Study of Delinquency.’ 10: nihms6806. PMC 1408072 . PMID 16557290.
- Newton, Giles (4 February 2004). Discovering DNA fingerprinting: Sir Alec Jeffreys describes its development. Wellcome Trust. Archived from the originalon 15 November 2010. Retrieved 23 December 2007.
- Zagorski, N. (2006). Profile of Alec J. Jeffreys.Proceedings of the National Academy of Sciences. 103 (24): 8918 8920. PMC 1482540 . PMID 16754883. doi:1073/pnas.0603953103.
- https://alchetron.com/Alec-Jeffreys
समीक्षक : रंजन गर्गे