ब्रॉक, थॉमस डेल : ( १० सप्टेंबर, १९२६ )
थॉमस डेल ब्रॉक यांचा जन्म क्लिव्हलंड ओहायो येथे झाला. वयाच्या १० व्या वर्षी रसायनशास्त्राच्या अभ्यासासाठी उपयुक्त अशी उपकरणांची पेटी त्यांना ख्रिसमसची भेट म्हणून मिळाली. मुलाची आवड पाहून वडलांनी त्यांना घराच्या तळघरात एक प्रयोगशाळा बांधून दिली. शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी अमेरिकन नौदलात प्रवेश घेतला. तेथील इलेक्ट्रॉनिक्स प्रोग्राम विभागामध्ये त्यांचा बराच वेळ जात असे. १९४९ साली त्यांनी रसायनशास्त्र आणि सामान्य शास्त्र या विषयात बी.एससी पदवी प्राप्त केली आणि १९५० साली ते एम.एससी. झाले. वनस्पतीशास्त्रात बुरशी व किण्व यांवर खास संशोधन करून १९५२ साली त्यांनी पीएच.डी. मिळवली. डॉक्टरेट मिळाल्यानंतर ब्रॉक अपजॉन कंपनीमध्ये (कालामाझु, मिशिगन) प्रतिजैविकांच्या संशोधन विभागात काम करू लागले. तेथे सूक्ष्मजीवशास्त्रात स्वत: अभ्यास करून सहा शोधनिबंध प्रकाशित केले. ते अमेरिकन बॅक्टेरियालॉजी सोसायटीचे सभासद झाले. १९५७ मध्ये ते वेस्टर्न रिझर्व विद्यापीठात वनस्पतीशास्त्र विद्याशाखेत रुजू झाले. १९६० साली सहायक प्राध्यापक या पदावर इंडियाना विद्यापीठात गेले व तेथे १९६४ साली पूर्ण वेळ प्राध्यापक या नात्याने सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे काम पाहू लागले.
ब्रॉक यांना १९६३ साली विस्कॉन्सिन विद्यापीठातील फ्रायडे हार्बर प्रयोगशाळेत सागरी सूक्ष्मजीवशास्त्र या विषयात काम करण्याची संधी मिळाली. तेथे त्यांची कारकीर्द इतकी वैशिष्ट्यपूर्ण ठरली की सायन्स या संशोधन पत्रिकेची ती मुखपृष्ठ कथा बनली आणि न्यूयॉर्क टाइम्सने देखील त्याची दाखल घेतली. यातूनच त्यांना सल्फरच्या झऱ्यातील जीवाणूंचा अधिवास या विषयावरती संशोधन करण्याची प्रेरणा मिळाली. १९६५ ते १९७५ या कालावधीत ब्रॉक यांनी सल्फरच्या झऱ्यातील उच्चतापमान सहनक्षम सूक्ष्मजंतूंचे यलोस्टोन पार्क संशोधन प्रयोगशाळेत संशोधन केले. ल्युकोथ्रीक्स म्यूकर या सूक्ष्मजीवाचा अभ्यास केला. या जंतूच्या वाढीदरम्यान तयार होणारी गाठी सारखी रचना (Knots) ही या संशोधनासाठी नॅशनल सायन्स फाउंडेशनने अनुदान दिले. मशरुम स्प्रिंगमधून गोळा केलेल्या गुलाबी सूक्ष्मजंतूंच्या नमून्यातून ७० अंश सेल्सिअस तापमानाला भरभराटीस आलेला सूक्ष्म थर्मस ॲक्वाटिकस जीव त्यांनी वेगळा करून दाखविला. विशेष म्हणजे हा जीवाणू १०० अंश सेल्सिअस तापमानाला प्रजोत्पादन करू शकतो हे त्यांनी दाखून दिले. या संशोधनात त्यांचा विद्यार्थी हडसन फ्रीज याने मोलाचे सहकार्य केले. त्यांनी त्या जीवाला नाव दिले थर्मस ॲक्वाटिकस (thermos aquaticus). हा शोधला गेलेला पहिला आर्किबॅक्टेरिया (Archaebacteria) म्हणजेच अतिपुरातन जीव म्हणून नोंदवला गेला. थर्मस ॲक्वाटिकस या जीवाणूचा शोध हा सूक्ष्मजीवाशास्त्राच्या इतिहासातील मैलाचा दगड मनाला जातो. ज्या उच्चतापमान सहन करणाऱ्या सूक्ष्मजंतुंचा त्यांनी शोध लावला त्याचे नाव नंतर थर्मोएरोबॅक्टर ब्रोकाइ ठेवण्यात आले.
ब्रॉक यांनी या जीवाणूच्या गुणधर्मांचा अभ्यास केला आणि जैवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात त्याची उपयोजिता सिद्ध केली. उच्च तापमान सहन करण्याच्या त्याच्या गुणधर्मास याचे विकर कारणीभूत असल्याचे त्याने सिद्ध केले. याच विकरांचा उपयोग भविष्यात पॉलिमरेज साखळी प्रक्रियेत (PCR) होऊ लागला. जीवाणूकडून मिळणाऱ्या या विकरामुळे जनुकांच्या प्रतिकृती वेगाने तयार करता येतात. ही प्रक्रिया कॅरी म्युलीस याने भविष्यात शोधली आणि तो नोबेल पारितोषकाचा मानकरी झाला.
१९९९ साली त्यांनी १५४६ ते १९४० या कालखंडात सूक्ष्मजीवशास्त्रावर जे लेख लिहीले गेले ते अनुवादित व संपादित केले. रॉबर्ट कॉख यांचे चरित्र लिहून त्यांनी प्रसिद्ध केले. ब्रॉक यांना विज्ञान व शिक्षण यावरील लिखाणासाठी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना पाश्चर मेडल, बर्गीज अवार्ड, वॉक्समन पारितोषिक इत्यादी सन्मान मिळाले.
ब्रॉक सध्या विस्कॉन्सिन विद्यापीठातील इ बी फ्रेड अध्यासनाचे इमेरिटस प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.
संदर्भ :
- Brock, Thomas D. (March 1998). “Early days in Yellowstone microbiology” (pdf). ASM news. American society for microbiology. 64 (3): 137–140.
- Brock, Thomas D. (November 24, 1967). “Life at high temperatures.” science. 158: 1012-1019.
- Brock, Thomas D. (October 1995). “The road to Yellowstone – and beyond”. Annual review of microbiology. 49 (1): 1–29. doi:10.1146
- Snyder, Brian (October 2007). “Why the nsf biology budget should be doubled”. Bioscience. American institute of biological sciences. 57 (9): 727–728. Doi: 10.1641/b570902. ISSN 0006-3568. /annurev.mi.49.100195.000245. pmid 8561455.
- Meyer A. B., Bernard S. (1983). Botany at the Ohio state university: the first 100 years, College of Biological Sciences, Ohio state university. pp. 151–152. ISBN 9780867270969.
समीक्षक : रंजन गर्गे