साबिन, अल्बर्ट : ( २६ ऑगस्ट, १९०६ – ३ मार्च, १९९३)

पोलंड देशातील बियालीस्टॉक (Bialystock) या गावी एका ज्यू कुटुंबात अलबर्ट साबिन यांचा जन्म  झाला. ज्यू विरुद्ध त्या काळात वातावरण चांगलेच तापले होते त्यामुळे अल्बर्टच्या आई वडिलांनी इ. स. १९२१ मध्ये पोलंड सोडून सर्व कुटुंबियांसह अमेरिकेचा आश्रय घेतला. १९२८ मध्ये त्यांना अमेरिकन नागरिकत्व प्राप्त झाले आणि त्यांनी सेपरस्टीन ह्या नावाऐवजी साबिन असे सुटसुटीत नाव स्वीकारले. १९३१ मध्ये आलबेल साबिन यांना न्यूयॉर्क विद्यापीठाची डॉक्टर ऑफ मेडिसीन ही पदवी प्राप्त झाली आणि त्यांनी मानवी पोलिओमायलिटीस या रोगावर आपले संशोधन कार्य  सुरू केले.

साबिन यांनी जेंव्हा हे काम सुरू केले त्यावेळी पोलिओने उग्र स्वरूप धारण करण्यास सुरुवात केली होती आणि त्याच्या साथी येण्यास सुरुवात झाली होती. एक प्रकारच्या विषाणूंमुळे होणाऱ्या या रोगात रुग्ण अर्धांगवायूने अपंग होतो किंवा दगावतो. विशेषतः बालवयात झालेल्या या रोगाने अनेक उमलत्या कळ्या अकाली खुडल्या जातात. त्यामुळे या रोगाच्या साथीत भितीदायक वातावरण समाजात निर्माण होत असे. इ. स. १९३५ मध्ये न्यूयॉर्कच्या रॉकफेलर संस्थेत त्यांनी आपले संशोधन कार्य सुरु केले. तेथे काम करीत असतांना त्यांना संसर्गजन्य रोगांवर काम करण्यात रस निर्माण झाला, चार वर्षांनी सिनसिनाटी येथील मुलांच्या इस्पितळात हे कार्य पुढे नेण्यास सुरुवात केली. परंतु त्याच सुमारास दुसरे महायुद्ध अमेरिकेपर्यंत पोहोचले होते आणि त्यांनी सैन्यात दाखल होण्याचे ठरविले. तिथे त्यांना जपानी एनसेफॅलिटीस  या विषाणुंनी होणाऱ्या रोगावर प्रतिबंधक लस तयार करण्याची संधी मिळाली. १९४६ मध्ये युद्ध संपल्यावर त्यांनी सिनसिनाटी येथील बालरुग्णालयाशी असलेले नाते अबाधितठेवून सिनसिनाटी विद्यापीठातील बालरुग्ण विभागाचे ते प्रमुख झाले.

पोलिओमायलिटीस  या रोगावर त्यांनी प्रतिबंधक लस निर्माण करण्याचे ठरविले. त्यावेळी साक हेही ही लस तयार करण्याच्या प्रयत्नात होते. परंतु दोघांच्या लस तयार करण्याच्या पद्धतीत फरक होता.  साबिन यांनी रोगनिर्माणक्षमता कमी केलेल्या जिवंत पण ज्यांच्या रोगबाधा करण्याच्या क्षमतेचं खच्चीकरण केलं आहे अशा विषाणूंचा वापर लसीसाठी केला होता तर साक मात्र संपूर्णपणे मृत विषाणूंपासून लस तयार करता येईल का यांच्या चाचण्या घेत होते. साबिन यांची लस तोंडावाटे दिली जाते तर साक यांची लस मात्र शरीरात टोचावी लागते. म्हणजे या लशींचा मार्ग अगदीच भिन्न होता. १९५५ मध्ये साक यांची लस बाजारात उपलब्ध झाली होती.

साबिन यांची लस मुलांना देण्यास सोपी होती कारण हा डोस त्यांना पाजायचा असतो.  त्यांनी पोलिओमायलिटीसच्या विषाणूच्या माहिती असलेल्या तीन उपजातींचा वापर ही लस तयार करताना केला होता त्यामुळे कोणत्याही  प्रकारच्या या विषाणूंच्या हल्ल्याला शरीराला तोंड देता यावे. त्यांनी आपल्या लसीच्या चाचण्या १९५४ च्या शेवटी सुरु केल्या आणि पुढची ४ ते ५ वर्षे आपल्या रशियन सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी हे काम सुरु ठेवले होते. त्यांची लस तोंडावाटे लहान आतडयापर्यंत पोहोचत होती आणि पोलिओच्या विषाणूंचा रक्तात जाण्याचा मार्ग बंद करण्यात यशस्वी होत होती. साबिन यांच्या संशोधनातं असे आढळून आले होते की या विषाणूंचे प्रजनन मुख्यत्वे लहान आतडयात होते. या चर्चेवरून तोंडावाटे दिलेली लस जर जठरातील आम्ल वातावरणात सुरक्षित राहिली तर ती अधिक प्रभावशाली असेल असे साबिन यांना वाटत होते आणि म्हणून त्यांचे प्रयत्न तोंडावाटे दिल्या जाणाऱ्या लसीच्या निर्मितीत चालले होते. साक यांची लस देखील प्रभावी होती परंतु लस देण्यापूर्वी जर लहान आतडयात विषाणू पोहोचलेले असले तर ती परिणामकारक ठरत नव्हती. शिवाय ती सुरक्षित नाही असे साबिन यांचे स्पष्ट मत होते.

इ. स. १९५५ ते १९६१ च्या दरम्यान सिंगापूर, हॉलंड, पूर्व युरोपातील देश आणि संयुक्त रशियन प्रजासत्ताकांमधील जवळजवळ १० कोटी लोकांना साबिन यांची लस देण्यात आली होती. या लसीचे मोठया प्रमाणावर उत्पादन करण्याची जबाबदारी मिखाईल चुमाकेव् या सोव्हिएत शास्त्रज्ञाने घेतली होती. इ.स. १९६० मध्ये सिनसिनाटीमधील १,८०,००० शालेय विद्यार्थ्यांना त्यामुळे ही लस सहजपणे देता आली. त्यावेळी आपल्या काही निष्ठावान सहकाऱ्यांना बरोबर घेऊन कल्पकतेने त्यांनी हे मोठया प्रमाणावरील लसीकरण अल्पावधीत करून दाखविले होते. संयुक्त प्रजासत्ताकाने  या लशींचे लाखो डोसेस जपान आणि पूर्वेकडील देशांमध्ये पाठवून मानवतावादी काम केले.

साबिन इस्रायलच्या रेहोवथ येथील वाईझमान इन्स्टिट्यूट या विज्ञान संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांनतर ते अमेरिकन राष्ट्रीय कर्करोग संस्थेचे सल्लागार म्हणून नियुक्त झाले. त्यांनी साऊथ कॅरोलिना विद्यापीठात जैविक औषध विभागात प्राध्यापक म्हणून काम केले. नंतर चार वर्षे त्यांनी आरोग्य विज्ञानातील प्रगत अभ्यासासाठीच्या आंतरराष्ट्रीय संस्थेत तज्ञ ज्येष्ठ सल्लागार म्हणून कार्य केले.

संदर्भ :

  • Moreno Barry (4 October, 2017) ‘Elis Islands Famous Immigrants’ Arcade Publishing Retrieved 4 October, 2017 via Goggles Book
  • ‘The legacy of Albert B.Sabin’ – Sabin sabin.org Retrieved 4 October, 2017

 समीक्षक : रंजन गर्गे