हॉजकिन, थॉमस : ( १७ ऑगस्ट, १७९८ – ५ एप्रिल, १८६६ )
थॉमस हॉजकिन यांचा जन्म इंग्लंडमधील पेंटोव्हिल गावात झाला. सुरुवातीचे त्यांचे शिक्षण त्यांच्या घरीच झाले होते. त्यांनी लंडन येथील सेंट थॉमस आणि गाय वैद्यकीय संस्थेत प्रवेश घेतला आणि वर्षभर तिथल्या रुग्ण कक्षांमध्ये निरीक्षण करीत विविध प्राध्यापकांची व्याख्याने ऐकली. त्यानंतर त्यांनी एडिंबरा विद्यापीठात आपला अभ्यासपुढे सुरू ठेवला. प्लिहेच्या (spleen) अभ्यासावर त्यांनी आपला पहिला शोध निबंध प्रसिद्ध केला. इ. स. १८२१ मध्ये त्यांनी फ्रान्सला अभ्यासासाठी भेट दिली. त्यावेळी स्टेथॉस्कोपचा शोध नुकताच लागला होता आणि त्यांनी त्याचा वापर कसा करतात हे त्या भेटीत स्टेथॉस्कोपचे जनक रेने लेनक यांच्याकडून शिकून घेतले. इ. स.१८२६ मध्ये त्यांची याच संस्थेत शरीरविकृतीशास्त्राचे अध्यापक आणि तेथील शरीरशास्त्र संग्रहालयाचे नियंत्रक म्हणून नेमणूक झाली. त्यानंतरची १२ वर्षे त्यांनी या संस्थेत कार्य केले.
त्यांनी शोषक ग्रंथी (Absorbent gland) आणि प्लिहेच्या व्याधिग्रस्त अवस्था या विषयावर अर्काईव्हज ऑफ मेडिकल अँड सर्जिकल ट्रांझॅक्शन्स या नियतकालिकात एक निबंध प्रसिद्ध केला यात त्यांनी सात रुग्ण अभ्यासले होते. साधारणपणे क्षयरोगात असते तशी अवस्था या रोग्याची होती. ह्या सर्वांच्या मृत्यू नंतर त्याचे शवविच्छेदन करून त्यात त्या मृत शरीरांमधील प्लिहा आणि शोषक ग्रंथींचे निरीक्षण त्यांनी केले होते. या अवस्थेला हॉजकिन लिम्फोमाचा (लसिकाग्रंथी) कर्करोग असे संबोधले जाऊ लागले या सात रुग्णांपैकी दोघांना हॉजकिन लिंफोमा होता तर तिसऱ्याला मात्र हॉजकिन लिम्फोमा लक्षणांशी संबंधित नसलेला कर्करोग आहे असे त्यानंतर सिद्ध झाले. त्यामुळे डॉक्टर थॉमस हॉजकिन यांचे नाव या दोन्ही अवस्थांशी जोडले जाऊ लागले. आपल्या अनुभवावर आधारित विकृतीशास्त्रावर त्यांनी गाय संस्थेत अभ्यासपूर्ण व्याख्याने देण्यास सुरुवात केली. गाय संस्थेत त्यांनी स्टेथॉस्कोपचा प्रथम वापर केला.
डॉक्टर थॉमस हॉजकिन यांना मानववंशशास्त्रात रुची होती. गाय वैद्यकीय संस्थेत संग्रहालय नियंत्रकाचे काम करीत असतांना त्यांना आपला हा छंद जोपासण्यासाठी वेळ आणि साहित्य दोन्ही मिळाले. त्यांनी जगाच्या विविध भागांमधून या अभ्यासाला पूरक ठरतील अशा निरनिराळ्या वस्तू गोळा करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी आपल्या अभ्यासावरून संस्कृती विषयावरचा आपला पहिला शोधनिबंध लिहिला. त्यांनी आदिवासी संरक्षक संस्थेची स्थापना केली होती. जगाच्या पाठीवर बोलल्या जाणाऱ्या भाषा या भाषा रचनाशास्त्राच्या माध्यमातून मानववंशाच्या इतिहासाबद्दल मोलाची माहिती देतात म्हणून विशेषतः ज्या भाषा लयाच्या मार्गावर आहेत त्यांचे संरक्षण केले पाहिजे असे त्यांना मनापासून वाटत होते आणि त्या अभ्यासासाठी त्यांनी ही संस्था स्थापन केली होती. इ.स १८३९ मध्ये पॅरिसमध्ये एडवर्ड या स्थानिक तज्ञाच्या मदतीने त्यांनी तेथील आदिवासींच्या भाषा रक्षणासाठी संस्था स्थापन केली. इ. स. १८४३ मध्ये लंडन मध्ये देखील याच धर्तीवर भाषा आणि आदिवासी संरक्षक संस्था स्थापन केली.
त्यांचा मृत्यू पॅलेस्टाईनमधील जाफना येथे झाला.
संदर्भ :
- Nuland, B., ‘The lymphatic contiguity of Hodgkin’s disease: a historical study.’, Bull N Y Acad Med.1981 Nov; 57(9):776-86.
- Stone, J.; ‘Hodgkin, Thomas Medical immortal and uncompromising idealist’ Proc (Bayl Univ Med Cent). 2005 Oct; 18(4): 368–375.
समीक्षक : रंजन गर्गे