बरुज, बेनॅसेरॅफ : ( २९ ऑक्टोबर, १९२० – २ ऑगस्ट, २०११ )

बरुज बेनॅसेरॅफ यांचा जन्म व्हेनेझुएलाची राजधानी कॅरॅकॅस येथे वंशात झाला. त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून बी.एस्सी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर वैद्यक व जीवशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी व्हर्जिनियाच्या वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी  वैद्यकशास्त्राचे शिक्षण पूर्ण केले. नंतर ते अमेरिकन सैन्यात युद्धकाळातील प्रशिक्षणासाठी रुजू झाले. न्यूयॉर्कमध्ये क्वीन्स जनरल इस्पितळात सहाय्यक डॉक्टर म्हणून त्यांनी कामास सुरुवात केली. १९४५ साली अमेरिकन सैन्य दलात काम करण्यासाठी त्यांची नियुक्ती झाली. रोगप्रतिकारकशक्ती आणि हायपरसेन्सिटिव्हिटी यांचे कार्य कसे चालते याचा शोध घ्यायला त्यांनी याचवेळी सुरुवात केली. एल्विन काबात यांच्याबरोबर त्यांनी संशोधन केले. एल्विन यांना त्यांना रोगप्रतिकारक क्षमतेच्या रासायनिक अंगाबाबत शिक्षण दिले. पॅरिसला ब्राउसाइस इस्पितळात बर्नार्ड हॉपर्न यांच्या प्रयोगशाळेत ते काम करु लागले. १९५६ मध्ये ते अमेरिकेस परतले आणि न्यूयॉर्क विद्यापीठाच्या वैद्यकशाळेत रोगनिदानशास्त्राचे सहायक अध्यापक म्हणून त्यांची  नियुक्ती झाली.

तेथे त्यांनी इतर शास्त्रज्ञांबरोबर ‘हायपरसेन्सिटिव्हिटीच्या आविष्कारातील पेशींचा सहभाग’ या विषयावर ५ वर्ष (१९५६-१९६१) अभ्यास केला. १९६८ साली बेथेस्डा येथे रोगप्रतिकारशास्त्रावर काम करणाऱ्या इन्स्टिटयूट ऑफ ॲलर्जी एन्ड इन्फेक्शस डिसीज या संस्थेत त्यांनी काम केले.

रोगप्रतिकारशक्तीचे मॉलिक्यूलर आणि सेल्युलर असे दोन अविष्कार आहेत. मॉलिक्यूलर इम्यून रिस्पॉन्स हा रेणूंच्या म्हणजे अँटीबॉडीच्या माध्यमातून साकार होतो तर सेल्युलर हा प्रक्रियेत पेशींच्यामार्फत होतो. रोगप्रतिकार हा शरीराचा गुणधर्म आहे. तो पेशीमार्फत होत असला तरी पेशीचा अविष्कार म्हणता येणार नाही. हायपरसेन्सिटिव्हिटी हा रोगप्रतिकारशक्तिचा एक पैलू आहे. लिम्फ पेशींच्या विशिष्ट प्रतिसादामुळे ती उत्पन्न होते. अशा परिस्थितीत रोगप्रतिकारक शक्ती माणसाला रोगांपासून सुरक्षा देण्याऐवजी ती रोगकारक बनते. अशा प्रकारच्या विशिष्ट प्रतिसादामुळे एखाद्या सामान्य अन्नपदार्थाचे  सेवन केल्यावर व्यक्तीचे शरीर त्याला शरीरात सामावून न घेता तेच अन्न रोगकारक ठरू शकते. यालाच अँलर्जी असे म्हणतात. बऱ्याच वेळा व्यक्तीचे शरीर स्वतःच्याच अँटीबॉडीच्या प्रथिनांना परके समजून त्यांच्या विरोधात लढा उभारते. याला ऑटोइम्यून रोग असे म्हणतात.

प्रतिजन शरीरात प्रविष्ट झाल्यावर विशिष्ट प्रतीपिंडांशी त्यांचा संयोग होतो. हे प्रतिजन-प्रतिपिंड संयुग रक्तातील मास्ट श्वेतपेशींशी संयोग पावून या मास्ट पेशीतून हिस्टमीन आणि हेपारीन ही रसायने रक्तात स्त्रवतात. या प्रतिसादाला हायपरसेन्सिटिव्हिटी असे म्हणतात.

त्यांच्या संशोधनात त्यांना असे आढळून आले की सहजगत्या वाढलेल्या प्राण्यामध्ये मर्यादीत प्रमाणात भिन्नता असलेली प्रतिजने टोचल्यास त्यांचे दोन गट  पडतात एक म्हणजे प्रतिक्रिया देणारे आणि दुसरा न देणारे. प्रतिक्रिया देणाऱ्या गटात प्रभावी ऑटोसोमल जनुक कार्यरत असते व ते ही प्रतिक्रिया  नियंत्रित करते हे त्यांनी दाखवून दिले. या जनुकालाच ‘Ir’ जनुक असे त्यांनी  संबोधले. प्रभावी ऑटोसोमल जनुकाला, (Dominant Autosomal gene) प्रतिकारक शक्तीला प्रतिसाद देणारी जनुके (Immune Response Genes) असे म्हणतात. शास्त्रीय परिभाषेत या जनुकांना ‘Ir’ (Immune Response) जनुके असे म्हणतात. या त्यांच्या शोधामुळे ते जीनडोसेट, जॉर्ज डेव्हिसस्नेल यांच्याबरोबर १९८० सालच्या वैद्यकशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरले. या त्यांच्या मूलभूत संशोधनामुळे अशी ३० ‘Ir’ (आयआर) जनुके शोधली गेली. यालाच प्रमुख पेशिसहस्वता जनुक समूह (प्रमुख हिस्टोकॉमपेटेबिलिटी कॉम्प्लेक्स) असे म्हणतात. आपल्या शरीरात स्व-प्रथिन आणि पर-प्रथिन यांच्यातील फरक जाणून घेण्याची, प्रमुख हिस्टोकॉमपेटेबिलिटी कॉम्प्लेक्समध्ये क्षमता असते. माणसाच्या प्रतिकारकशक्तीचा संबंध याच जनुक समूहाशी असतो. यातूनच पुढे ऑटोइम्यूनरोगासंबंधी डीएनएचाच एक जनुकीय संशोधन सुरु झाले. या संशोधनामुळे मल्टीपल स्केरोसिस आणि सांधेदुखीचा आजार या ऑटोइम्यून रोगांचे कारण नीट कळू शकले.

अमेरिकन असोसिएशनच्या जीवशास्त्र, वैद्यकशास्त्र व रोगप्रतिकारशास्त्र या सर्व संस्थांचे अध्यक्ष होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. जागतिक रोगप्रतिकार व कर्करोगासंबंधित संस्थेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. टी. डकेट जोन्स मेमोरियल ॲवॉर्ड ऑफ द हेलेन या व्हिटनी फाऊंडेशनच्या पारितोषिकाने त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांनी ३०० पेक्षा जास्त लेख व पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांनी आपले आत्मचरित्र सुद्धा लिहिले आहे.

जमैका येथे न्यूमोनियाने त्यांचा मृत्यू झाला.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे