रॉबिन्स, फ्रेडेरिक चापमन : ( २५ ऑगस्ट, १९१६ –  ४ ऑगस्ट, २००३ )

फ्रेडेरिक चापमन रॉबिन्स यांचा जन्म औबर्न अलबामा (Auburn, Alabama) येथे झाला. रॉबिन्स यांनी मिसौरी युनिव्हर्सिटी (University of Missouri) मधून ए.बी. पदवी प्राप्त केली. नंतर बी. एस. पदवीसुद्धा प्राप्त केली. त्यानंतर हार्वर्ड मेडिकल स्कूलमधून ते पदवीधर झाले व सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ (बॅक्टेरियालॉजीस्ट) म्हणून मॅसेचुसेटस येथील चिल्ड्रेन्स हॉस्पिटल मेडिकल सेंटर बोस्टन येथे त्यांची नेमणूक झाली.

सैन्यात सेवा करत असताना त्यांची नेमणूक मेडिकल विभाग प्रमुख म्हणून झाली. तेथे ते विषाणू आणि रिकेटशीयामुळे (उवा व तत्सम कीटकात परजीवी असलेल्या सूक्ष्मजंतूंची प्रजाती असे कीटक, दंशाने सूक्ष्मजंतूंचा प्रसार करतात. ही जाती उवांच्या पचनमार्गात असते व टायफसची साथ पसरते.) होणाऱ्या रोगांचा अभ्यास करत होते. याचबरोबर युनायटेड स्टेट, उत्तर अफ्रिका आणि इटली या देशांत देखील ते विविध रोगांवर काम करत होते. त्यांचा सर्वात जास्त वेळ हा कावीळ, मुडदुसामुळे येणारा ताप (टायफस) आणि क्यू फीवर (गुरांमधील रोग दूषित दुधामुळे हा रोग माणसांनाही होतो) या रोगांवरील संशोधनात गेला. त्यांनी गालगुंडाच्या रोगप्रतीकारावर सुद्धा अभ्यास केला. १९४५ मध्ये ब्रोन्झे स्टार पदक देऊन त्यांचा सन्मान केला गेला आणि सैन्यात मेजर पदावर त्यांची निवड झाली.

नंतर ते राष्ट्रीय संशोधन अनुसंधान या संस्थेत  (National Research Council) सामील झाले आणि जोहन एफ एन्डर्स (John F. Enders) यांच्या सहकार्याने त्यांनी साथीच्या आजारांवर संशोधन केले. चिल्ड्रेन्स हॉस्पिटल मेडिकल स्कूलचे ते सदस्य होते. फ्रेडेरिक यांनी एन्डर्स आणि वेल्लर यांच्याबरोबर पोलिओमायलिटीस (मज्जारज्जूच्या करड्या रंगाच्या भागाचा तीव्र दाह) विषाणूच्या उतींमध्ये टिशू कल्चर तंत्राचा वापर करून वाढ करण्यात यश संपादन केले. फ्रेडेरिक यांनी गालगुंड, तोंडाभोवती येणारे पुरळ (हेर्पेस सिम्प्लेक्स) आणि व्हॅक्सीनिया  या विषाणूवर वर संशोधन केले. फ्रेडेरिक यांची हार्वर्ड मेडिकल स्कूल बोस्टोन येथे बालरोगतज्ज्ञ म्हणून निवड झाली.

फ्रेडेरिक रॉबिन्स यांनी बालसंसर्गजन्य आजार आणि सार्वजनिक आरोग्य यावर संशोधन केले त्यांच्या  पोलिओमायलिटीस  व्हायरसच्या कामगिरीमुळे त्यांना १९५४ मध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आला.

फ्रेडेरिक यांचा मृत्यु क्लेवलंड, ओहिओ येथे झाला. त्यांच्या सन्मानार्थ हार्वर्ड मेडिकल स्कूलचे नाव बदलून फ्रेडेरिक सी. रॉबिन्स असे करण्यांत आले.

समीक्षक : रंजन गर्गे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.