बालसुब्रमनियन, दोराइराजन : ( २८ ऑगस्ट १९३९ )
प्रा. डी. बालू म्हणून लोकप्रिय असणारे दोराइराजन बालसुब्रमनियन भारतीय जीवरसायन वैज्ञानिक आणि नेत्र जीवरसायनतज्ञ आहेत. इंडियन अकॅडेमी ऑफ सायन्सेसचे ते माजी अध्यक्ष असून सध्या हैद्राबादच्या एल. व्ही. प्रसाद आय इन्स्टिस्ट्यूट संशोधन संस्थेचे प्रमुख आहेत. फ्रान्स देशाकडून त्यांना नॅशनल ऑर्डर ऑफ मेरीट हा बहुमान लाभलेला आहे. बालसुब्रमनियन यांना भारत सरकारने २००२ साली पद्मश्री हा सन्मान दिला आहे.
डी. बालसुब्रमनियन यांचा जन्म तमिळनाडूत झाला. शालेय शिक्षण तिथेच पार पडले. त्यांनी मद्रास विद्यापीठातून रसायन विज्ञानातील पदवी घेतली (१९५७). नंतर दोन वर्षानी त्यांनी राजस्थानच्या पिलानी विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून जैवभौतिकी रसायन विज्ञानात डॉक्टरेट मिळवली (१९६५). भारतात परतल्यानंतर ते आयआयटी कानपुरमध्ये व्याख्यात्याच्या पदावर रुजू झाले. तेथेच त्यांची प्राध्यापक पदावर पदोन्नती झाली. हैद्राबाद येथील सेंटर फॉर सेल्यूलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB) या संस्थेच्या उपसंचालक पदावर त्यांची नियुक्ती झाली (१९८२). या संस्थेचे संचालक म्हणून ते निवृत्त झाले (१९८८). निवृत्तीनंतर ते हैदराबादच्या एल. व्ही. प्रसाद नेत्र संस्थेत प्रोफेसर ब्रायन होल्डेन नेत्र केंद्राचे संशोधक संचालक म्हणून धुरा वाहत आहेत.
डी. बालसुब्रमनियन यांचे प्राथमिक संशोधन प्रथिने आणि पेप्टाइड यांची संरचना आणि कार्य व उष्मागतिकी विश्लेषणातून त्यांच्या स्थिरतेसंबंधीचे आहे. त्यांनी आपल्या संशोधनाचा कल त्यानंतर नेत्रविज्ञान शाखेकडे वळवला. नेत्रभिंगाचे मोतिबिंदूमध्ये रूपांतर कसे होते यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. भिंगाची पारदर्शीता कमी होऊ नये किंवा मोतीबिंदू होण्याची प्रक्रिया मंद कशी करता येईल या साठीही त्यांनी संशोधन केले. सुमारे ४८ टक्के लोकात सहजगत्या मोतीबिंदू होतो आणि त्यामुळे तात्पुरते अंधत्व येते. मोतीबिंदू होण्याची क्रिया सावकाश होण्यासाठी चहामधील पॉलिफेनॉल्स, तसेच जिंको व अश्वगंधा या वनस्पतींच्या अर्काचा उपाय त्यांनी सुचविला. यातील प्रतिऑक्सिडिकारके व पेशीसंरक्षक घटकांमुळे मोतीबिंदू होण्याची क्रिया मंदावते असे प्राण्यावरील केलेल्या प्रयोगातून त्यांना आढळून आले. सन २००० सालापासून डी. बालसुब्रमनियन आणि त्यांच्या सहकार्यांनी डोळ्यांचे आनुवंशिक विकार यावर संशोधन सुरू केले. काचबिंदू झालेल्या ४०० कुटुंबातील व्यक्तींच्या अभ्यासातून सीवायपी१बी१ जनुकात १५ उत्परिवर्तने झाल्याने काचबिंदू होतो याची नोंद घ्यावी लागली. या नोंदीतून निघालेले निष्कर्ष अंधत्व रोखण्यासाठी केल्या जाणार्या वैद्यकीय उपचारासाठी उपयोगी पडण्याची शक्यता आहे. डी. बालसुब्रमनियन आता मूळपेशी उपचारावर संशोधन करून दृष्टी पुनर्स्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांनी श्वेतपटलाच्या कडेमधून वेगळ्या केलेल्या मूळपेशींचे संवर्धन करून त्या दृष्टी गमावलेल्या व्यक्तीच्या डोळ्यांत पुनर्प्रस्थापित केल्या. अशा रुग्णांची दृष्टी २०/२० स्तरापर्यंत सुधारल्याचे लक्षात आले. मानवी उपचारपद्धती मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे हे जगातील पहिले उदाहरण आहे.
बालसुब्रमनियन यांनी लिहिलेल्या ६ पुस्तकांपैकी दोन वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झाली आहेत. आजपर्यंत त्यांचे ४५० वैद्यकीय लेख आणि १७० शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. हिंदू वर्तमानपत्रातील त्यांचे विज्ञानावरील सदर लोकप्रिय असते. विज्ञान प्रसारातील त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रीय परितोषिकही प्राप्त झाला आहे. १६ विद्यार्थ्यांना त्यांनी पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले आहे.
बालसुब्रमनियन यूनेस्को आणि नेत्रविज्ञानाशी निगडीत संशोधन करणार्या अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांच्या कार्यकारिणीवर सदस्य आहेत. त्यांनी भारतभर आणि विदेशात अनेक स्मृति व्याख्याने आणि पुरस्कार व्याख्याने दिली आहेत. त्यांना विज्ञानप्रसारासाठी असलेला आंतरराष्ट्रीय कलिंग पुरस्कार मिळाला आहे.
समीक्षक : मोहन मद्वाण्णा