हक्स्ली, अँड्र्यू फिल्डिंग : ( २२ नोव्हेंबर १९१७ – ३० मे २०१२ )
अँड्र्यू हक्स्ली यांचा जन्म लंडनमध्ये झाला. त्यांचे आजोबा थॉमस हक्स्ली प्रख्यात लेखक व वैज्ञानिक होते. चार्ल्स डार्विनचे ते खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचा सावत्र भाऊ सर ज्यूलियन हक्स्ली जीववैज्ञानिक होता. सभोवती असलेले सर्व नातेवाईक विद्वान असल्याने अँड्र्यू हक्स्ली यांना भौतिकी आणि यांत्रिकीची आवड निर्माण झाली. ट्रिनिटी कॉलेजमध्ये त्यांनी रसायनशास्त्र, गणित आणि भौतिकविज्ञान असे विषय निवडले. चौथा विषय निवडणे अनिवार्य असल्याने त्यांनी शरीरक्रियाशास्त्र हा विषय निवडला. शरीरक्रियाशास्त्रात त्यांना आवड वाटू लागली. त्याच वेळी त्यांचे शिक्षक ॲलन हॉजकिन हे लोलिगो पेयलेई (Loligo pealeii) जातीच्या माखलीवर संशोधन करीत होते. माखली हा मृदुकाय प्राणी वर्गीकरणाच्या दृष्टीने ऑक्टोपसच्या जवळचा आहे. लोलिगो पेयलेई माखलीचे अक्षतंतू सुमारे एक मिमी जाड असतात. या अक्षतंतूमधून वाहणार्या विद्युत प्रवाहाच्या नोंदी करत असता दुसर्या महायुद्धामुळे त्यांच्या या प्रयोगात खंड पडला. त्याऐवजी त्यांनी युद्धास उपयोगी रडार, विमानविरोधी तोफा व बंदुका यावर संशोधन केले. युद्धानंतर त्यांनी पुन्हा आपल्या आवडत्या क्षेत्रावर प्रयोग करण्यास प्रारंभ केला. माखलीच्या चेतासंस्थेतील अक्षतंतू मोठ्या व्यासाचे असतात. त्याशिवाय अक्षतंतूभोवती मायलिन आवरण नसते. त्यामुळे सर अँड्र्यू हक्स्ली, सर ॲलन हॉज्किन, सर जॉन एकुल्झ यांनी माखलीच्या अक्षतंतूमध्ये सूक्ष्म विद्युततारांची टोके सोडून अक्षतंतूमधील विद्युत विभव मोजला. अक्षतंतू द्रवामधील सोडियम व पोटॅशियम आयनांचे प्रमाण मोजले. त्यांना असे आढळले की चेतापेशी विश्राम अवस्थेत असताना पेशी पटलाच्या बाहेरील पर्यावरणीय पृष्ठावर धन विद्युत भार असतो. विश्रामावास्थेतील चेतापेशी पटलातील आयनद्वारे बंद असतात आणि सोडियम आयनांचे चेतापेशीबाहेरील प्रमाण चेतापेशीअंतर्गत प्रमाणापेक्षा दसपटीने जास्त असते. अशा वेळी अक्षतंतूचा विश्राम विभव -७० मिलि व्होल्ट असतो. (पेशीच्या आतील बाजूस ऋण भार असतो) जेव्हा चेतापेशी उद्दीपित होते तेंव्हा अक्षतंतूच्या बाहेरील सोडियम आयने आयनद्वारातून वेगाने आत शिरतात. तसेच थोडी पोटॅशियम आयने चेतापेशीपटलातून बाहेर येतात. अशाने पेशीपटलाचा विद्युत विभव बदलून -७० मिलीव्होल्टपासून ऋणभार कमी होत होत शून्य आणि नंतर +३० ते +३५ मिलि व्होल्ट होतो. म्हणजे त्यात १०० किंवा किंचित मिलीव्होल्टचा फरक पडतो. यास क्रिया विभव म्हणतात. पुरेसा क्रिया विभव आल्याशिवाय आवेग चेतापेशीच्या एका भागाकडून दुसरीकडे वाहून नेलाजात नाही. पेशीच्या पृष्ठभागावरील विद्युत् भार निमिषार्ध बदलून मूळ पदावर येणे आणि अशी लहर त्या पेशीभर आणि अन्य पेशींमध्ये पुढे पुढे पसरणे ह्यालाच स्नायूपेशींमधील आणि चेतापेशींमधील आवेग निर्मिती आणि आवेग वहन म्हणतात. स्नायू व चेतापेशीमध्ये धृवीयता, वहनीयता आणि उत्तेजित होण्याची क्षमता असते.
स्नायूपेशी आणि चेतापेशींमधील आवेग निर्मिती आणि आवेग वहन या क्रिया एकमेकांना खेटून असलेल्या स्नायू व चेतापेशीं यांच्या संपर्क स्थानी (neuromuscular junction) सूक्ष्म प्रमाणात चेतासंप्रेरके स्रवतात. सर अँड्र्यू हक्स्ली, सर ॲलन हॉज्किन, सर जॉन एकुल्झ – या तीन वैज्ञानिकांना स्नायू व चेतापेशी यांच्या कार्यावरील संशोधनाबद्दल १९६३ सालचा शरीरक्रिया विज्ञान व वैद्यक शास्त्र विषयातील नोबेल पुरस्कार देण्यात आला. अॅलन हॉज्किन यांनी त्यातील गणितीय आणि प्रायोगिक भाग सिद्ध केला तर सर जॉन १९६३ सालचा नोबेल पुरस्कार, स्नायूआकुंचन, स्नायूआवेग, चेतापेशीआवेग, स्क्विड- महाकाय चेताअक्षतंतू, एकुल्झ यांनी संपर्क स्थानातील संप्रेरकावर काम केले होते. इंग्लंडमधील ग्रॅन्टचेस्टर येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- https://www.nobelprize.org/nobel_prizes/medicine/laureates/1963/
- https://www.nobelprize.org/nobel_prizes/medicine/laureates/1963/huxley-bio.html
- https://www.britannica.com/biography/Andrew-Fielding-Huxley
- https://www.britannica.com/science/action-potential#ref321456
- https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3547259/
समीक्षक : मोहन मद्वाण्णा