एककला प्रत्यावर्ती धारा विद्युत मंडलामधील शक्ती (P) खालील पद्धतीने दर्शविली जाते :
शक्ती (P)= V I cos Ø
येथे V = विद्युत दाब, I = विद्युत प्रवाह आणि cos Ø म्हणजे शक्तिगुणक होय. अशा प्रकारे विद्युत मंडलामध्ये अचूक विद्युत दाबमापक (Voltmeter), ॲमिटर आणि विद्युत शक्तिमापक वापरून, विद्युत दाब (V), विद्युत प्रवाह (I) आणि शक्तीचे (P) वाचन प्राप्त केले जाऊ शकते. त्यानंतर शक्तिगुणकाची गणना खालील पद्धतीने केली जाते :
परंतु ही पद्धत अचूक नाही. सर्व मापकांमधील त्रुटी एकत्रितपणे शक्तिगुणक गणनामध्ये त्रुटी निर्माण करतात. तसेच ज्या विद्युत मंडलामध्ये, विद्युत मंडलाच्या आणि भाराच्या परिस्थितीनुसार शक्तिगुणक बदलत असतो, अशा विद्युत मंडलासाठी ही पद्धत योग्य ठरत नाही. यावेळी अशा मापकाची आवश्यकता भासते की, ज्यामध्ये विद्युत मंडलाचा शक्तिगुणक थेट दर्शविला जाऊ शकतो. असे उपकरण जे विद्युत मंडलाचा त्वरित शक्तिगुणक सूचित करते त्याला ‘शक्तिगुणक मापक’ असे म्हणतात.
मूलभूत रचना : शक्तिगुणक मापकाची रचना ही विद्युत शक्तिमापकासारखीच असते. या उपकरणाला विद्युत प्रवाह कुंडल (Current coil) आणि विद्युत दाब कुंडल (Pressure coil) अशी दोन प्रकारची कुंडले असतात. ज्या विद्युत मंडलाचा शक्तिगुणक मोजायचा आहे, त्या विद्युत मंडलाचा विद्युत प्रवाह पूर्णपणे किंवा अंशत: विद्युत मंडलातून वाहतो. विद्युत दाब कुंडल हे प्रवर्तनी/प्रेरित (Inductive) आणि अप्रवर्तनी/प्रेरणहीन (Non-inductive) अशा दोन समांतर मार्गांमध्ये विभागली जाते. दोन मार्गांमधील विद्युत प्रवाह विद्युत मंडल विद्युत दाबाच्या प्रमाणात असतात. अशा प्रकारे विस्थापन हे मुख्य विद्युत प्रवाह विद्युत मंडलातील विद्युत प्रवाह आणि विद्युत दाब कुंडलांच्या दोन मार्गांमधील विद्युत प्रवाहाच्या कलांतरावर (Phase difference) म्हणजेच शक्तिगुणकावरती अवलंबून असते. शक्तिगुणक मापक हा एककला (Single phase) आणि त्रिकला (Three phase) प्रत्यावर्ती धारा विद्युत मंडलातील शक्तिगुणकाचे मापन करण्यासाठी वापरला जातो.
प्रकार : शक्तिगुणकाचे मुख्यत: खालील दोन प्रकार असतात :
१. गतिजमापी (Dynamometer) प्रकारचा शक्तिगुणक मापक : (अ) एककला शक्तिगुणक मापक आणि (ब) त्रिकला शक्तिगुणक मापक.
२. चल लोह (Moving iron) प्रकारचा शक्तिगुणक मापक : (अ) घूर्णी क्षेत्र (Rotating field) प्रकारचा शक्तिगुणक मापक आणि (ब) चल लोह (Moving iron) प्रकारचा शक्तिगुणक मापक.
पहा : गतिजमापी शक्तिगुणक मापक, चल लोह शक्तिगुणक मापक.
संदर्भ :
• Bakshi, A. V.; Bakshi, K. A.; Bakshi, U. A. Electrical Technology and Instruments, Technical Publications, Pune.
• Bakshi, A. V.; Bakshi, K. A.; Bakshi, U. A. Electronic Measurement System, Technical Publications, Pune.
• Godse, A. P. Electronics Engineering, Technical Publications, Pune.
• Swahney, A. K. Electrical and Electronic Measurements and Instrumentation, Dhanpat Rai and Co.
• वाघमारे, त्र्यंबक सुबोध विद्युतशास्त्र उज्ज्वल प्रकाशन.
समीक्षण : एस. डी. गोखले