हार्पर, जॉन लांडर : (२७ मे, १९२५ – २२ मार्च, २००९) इंग्लंडमधील कृषिप्रधान रग्बी परगण्यात वाढलेला जॉन लहानपणापासून स्थानिक शेती-कुरणांचे निरीक्षण करत असे. वयाच्या तेराव्या वर्षी परिसरातील चराऊ कुरणात वाढणाऱ्या बटरकप या वनस्पती पाहिल्या असता, त्या वनस्पतीच्या जाती जमिनीच्या उंचसखल बदलाबरोबर बदलत असल्याचे त्यांने पाहिले. त्याचे उच्च शिक्षण ऑक्सफर्डच्या मागडालिन महाविद्यालयात झाले. एम.एस्. झाल्यावर त्यांनी कृषिशास्त्राचे अध्यापन केले. अमेरिकेतील रॉकफेलर फाउंडेशन फेलो म्हणून त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठात डेव्हिस येथे संशोधन केले. ब्रिटनमध्ये परतल्यावर ते वेल्स विद्यापीठाच्या बंगोर (Bangor) येथील महाविद्यालयात रुजू झाले आणि कृषी-वनस्पतिशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख म्हणून निवृत्त होईपर्यंत तेथेच अध्यापन आणि संशोधन केले.
हार्पर यांनी वनस्पतिशास्त्र संशोधनाला एक नवीच दिशा दिली, आणि वनस्पती पारिस्थितीकीशास्त्रात क्रांती घडवून आणली. झाडे-झुडपांचे समूह स्थिर नसून गतिशील असतात. त्यातील निरनिराळ्या वनस्पती प्रकारांच्या समूहात सतत बदल होत असतात. हे बदल बाह्य कारणांमुळे तर होतातच, परंतु एकेक वनस्पती घटकाचा जन्म, वाढ, मृत्यू यांमुळेही होत असतात. बाह्य कारणे अनेक असू शकतात, जसे – जमीन-मातीचे गुण, पाण्याची उपलब्धता, हवामान, वारा-वादळे, आग-वणवे, रोग, परजीवींचे अस्तित्व, भक्षक, इत्यादी. प्राण्यांच्या संख्याबदलाचे शास्त्र सन १९३० पासून अस्तित्वात होते, परंतु वनस्पतींतील संख्याबदलाचे शास्त्र हार्पर यांनी १९६० च्या दशकात अमलात आणले. वनस्पतींची वाढ आणि संख्यावाढ, वनस्पतीतील ऊर्जेचे वाटप आणि त्याचा वाढीवर होणारा परिणाम, रोग, परजीवींची भक्षणाची पद्धत, या सर्वांमुळे होणारे वनस्पती-संख्येतील बदल या विषयातील संशोधन व शिक्षणाचा एकहाती प्रसार केला. बीज निर्मिती, बियांचे आकार, रंग-रूप, सुप्तावस्था, शेजार, इत्यादींचे परिसंस्थेतील वनस्पती संख्यावाढीवर होणारे परिणाम हेही अभ्यासले. प्राण्यांच्या मानाने वनस्पती एका जागी स्थिर असल्यामुळे असे संशोधन सुगम होते. या संशोधनात प्रायोगिक पारिस्थितीकीचा अभ्यास जरुरीचा ठरतो. अशा संशोधनामुळे वनस्पती-समूहातील संख्याबदल, अनुकूलनामुळे होणाऱ्या बदलाची नैसर्गिक निवड आणि उत्क्रांती यावर प्रकाश पडला. हार्पर यांचे ‘Darwin : The Greatest Ecologist’ हे ब्रिटीश इकॉलॉजीकल सोसायटीपुढे केलेले भाषण, Darwinian Approach to Plant Ecology हा जर्नल ऑफ इकॉलॉजीमधील शोधनिबंध यामुळे वनस्पतीसंख्यापारिस्थितीकीशास्त्राच्या जागतिक संशोधनाची मुहूर्तमेढ रचली. त्यांनी प्रसिद्ध केलेले Population Biology of Plants हे या विषयातले पुस्तक प्रसिद्ध केले.
हार्पर जगातील अग्रेसर असलेल्या ब्रिटीश इकॉलॉजीकल सोसायटीचे अध्यक्ष होते. फेलो ऑफ रॉयल सोसायटी हा बहुमान त्यांना प्राप्त झाला. कमांडर्स ऑफ द ब्रिटीश एम्पायर (CBE) त्यांना प्रदान झाला. डार्विन पदक, मिलेनियम बॉटनी पुरस्कार आणि ब्रिटीश इकॉलॉजीकल सोसायटीचा मार्श इकलॉजी पुरस्कार हे सन्मानही त्यांना मिळाले. ते यूरोपियन सोसायटी फॉर इव्होल्यूशनरी बायालॉजी या संस्थेचे अध्यक्ष होते.
चराऊ कुरणातील भक्षक, पिके आणि तण, लवके आणि रोग यांच्यामुळे होणारा पिकांच्या उत्पादानावरचा परिणाम यावरील संशोधनाचा हार्पर यांच्या विद्यार्थ्यांनी अमेरिका, यूरोप, मेक्सिको, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, भारत इत्यादी देशात स्थानिक समस्यांवर संशोधन करून प्रसार केला.
संदर्भ :
- Chaphekar, S.B. 1977. Personal Interaction as a Commonwealth Academic Staff Fellow at the University of Wales, Bangor.
- Turkington, Roy 2009. Obituary – Prof. John L.Harper, F.R.S., C.B.E., 1925-2009. J.Ecol. 97: 835-837.
समीक्षक : चंद्रकांत लट्टू