‘ला काँझ’(‘LaCONES’), हैदराबाद : (स्थापना – २००७) हैदराबादमधील ‘सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलेक्युलर बायॉलॉजी’ ह्या संस्थेच्या पुढाकाराने ‘संकटग्रस्त जातींच्या पर्यावरणीय संवर्धनासाठीची ही प्रयोगशाळा’ स्थापन झाली. ‘ला काँझ’ या संस्थेच्या स्थापनेचा उद्देश मानवी हस्तक्षेपामुळे नष्ट किंवा नष्टप्राय होत असलेल्या सजीवांचे संरक्षण व संवर्धन जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यासाठी आहे.
प्रयोगशाळेच्या स्थापनेपूर्वी सुमारे दहा वर्षे, १९९८ मध्ये ‘ला काँझ’ प्रकल्प सुरू करण्यात आला होता. यासाठी भारत सरकारचे जैवतंत्रज्ञान खाते, केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण, तसेच ‘वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद’ CSIR (council for scientific and industrial research) ह्या दिल्लीतील संस्थांबरोबर तत्कालीन आंध्र प्रदेश राज्य सरकार ह्या सर्वांचे सहकार्य लाभले होते.
भारतीय जैवविविधतेतील अनेक वन्य सजीवांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. अशा सजीवांना विलोपन होण्याच्या मार्गावर असलेले सजीव (endangered Species) म्हणतात. अशा सजीवांची भारतातील उदाहरणे म्हणजे सिंहपुच्छ वानर (lion-tailed monkey) हा सस्तन प्राणी व तणमोर नावाचा पक्षी (lesser florican, Sypheotidesindica).
विलोपनाचे भय असलेल्या प्राण्यांचे बहुघा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात संवर्धन करण्याचे प्रयत्न केले जातात. ते शक्य झाले नाही तर त्या प्राण्यांसाठी बंदिस्त प्राणीसंग्रहालय किंवा अभयारण्यासारखा अधिवास निवडला जातो. त्यांचे नैसर्गिक पद्धतीने पुनरुत्पादन होऊन संख्यावाढ होईल अशी व्यवस्था केली जाते. दहा वर्षापूर्वी पिसोरी या भारतीय हरणांची संख्या अतिशय कमी झाली होती. या हरणाचे शास्त्रीय नाव (Moschiola Indica) मोश्चिओला इंडिका. माऊस डिअर या सामान्य नावाने सुद्धा याची ओळख आहे. या हरणाच्या मादीचे वैशिष्ट्ये म्हणजे पिलू जन्माला आल्याआल्या चार तासात तिच्या बीजाण्ड कोशातून अंड निर्मिती होते. लाजाळू व सहसा न आढळणार्या या हरणाच्या संप्रेरकांचा अभ्यास करणे हे अवघड काम ‘ला काँझ’ या संस्थेने २०१० साली पूर्ण केले. संस्थेच्या संरक्षित उद्यानात या हरणाच्या चार माद्या व दोन नर यांची कृत्रिम पैदास केली. ही सहा हरणे हैदराबाद येथील नेहरू प्राणिसंग्रहालयात वाढवली. पिसोरी हरणाची संख्या अजून धोक्याच्या कक्षेतच आहे. परंतु अशा धोक्यात असलेल्या प्राण्यांच्या विलोपनावर मात करता येऊ शकते याची खात्री झाली. आता या हरणाच्या प्रजातीची संख्या दोनशे झाली आहे. तेलंगणातील अमराबाद अरण्यात आता त्यांची संख्या वाढत आहे. आता सिंहपुच्छ माकड (lion-tailed monkey) व तणमोर या आणखी दोन संकटग्रस्त प्राण्यांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत. पांढर्या चोचीच्या गिधाडाची संख्या पूर्ववत करण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारतीय वन्य प्राणी व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या सहकार्याने आता ‘ला काँझ’ने चालू केला आहे.
भारतातील एकमेव ‘वन्यजीव जनुकीय संसाधन बँक’ (The Wildlife Genetic Resource Bank) ‘ला काँझ’ मध्ये आहे.‘ला काँझ’ कडे आजपर्यंत १७,००० कुप्यांतून प्राण्यांचे रक्त, वीर्य, अंडी, ऊती, युग्मके आवश्यकतेनुसार अतिशीत तापमानाला (–७०0से. पर्यंत) साठवण्याची सोय केली आहे. तेवीस वन्य प्राणीजातींचे जनुकीय नमुने ‘ला काँझ’ कडे साठविलेले आहेत. भविष्यात ही क्षमता आणखी वाढविण्याची योजना आहे.
वन्यजीव हत्या व अधिक गंभीर म्हणजे विलोपनाचा धोका असणाऱ्या जातीच्या प्राणीहत्या करण्याच्या गुन्हयांच्या शोधात ‘ला काँझ’ ची डी. एन. ए. अन्वेषण चाचणी उपयोगी पडते. मांस, रक्त, दंतमज्जा, अस्थिमज्जा , त्वचा, केस, खवले, पिसे, विष्ठा, प्राणी कापायला वापरलेली हत्यारे, मांस शिजवण्यासाठीची भांडी इ. तपासून ‘ला काँझ’ ची न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा सबळ पुराव्यांनिशी गुन्हेगाराला शिक्षा करुन तुरुंगात पाठवायला मदत करते. हे काम किचकट असते, काळजीपूर्वक करावे लागते. पुढे असे गुन्हे घडू नयेत ह्यासाठी हे अत्यावश्यक असते. वन्यजीव विकणे, विकत घेणे, पाळणे हा गुन्हा असूनही दुर्दैवाने सामाजिक जाणीव नसणाऱ्या लोकांकडून असे गुन्हे घडत आहेत. ‘ला काँझ’ सारख्या संस्था वन्यजीव संवर्धन व संरक्षणासाठी आशेचा किरण ठरत आहेत.
संदर्भ :
- Prater, H., The book of Indian Animals, BNHS, Oxford University Press, 1971.
- www.ccmb.res.in/laconis/
- https://www.ccmb.res.in › lacones
समीक्षक : मोहन मद्वाण्णा