भोजनकुतूहल : भोजनकुतूहल हा एक संकलित ग्रंथ असून श्रीरघुनाथसूरी हे ह्या ग्रंथाचे कर्ते होत. हा ग्रंथ साधारण सतराव्या शतकात लिहिला गेला. रघुनाथसुरी ह्यांनी संस्कृतमध्येच नाही तर मराठीतही ग्रंथ लिहिले. त्यांच्या संस्कृत रचनांपैकी दोन ग्रंथ उपलब्ध आहेत – धर्मामृतमहोदधी आणि भोजनकुतूहल. मराठीमध्ये नरकवर्णन  नावाचा ग्रंथ मिळतो. यापैकी प.कृ.गोडे यांच्या मते धर्मामृतमहोदधी हा ग्रंथ १७०१ मध्ये रचला गेला तर नरकवर्णन  हा ग्रंथ साधारणपणे १७०१ ते १७१२ यादरम्यान रचला गेला असावा. भोजनकुतूहल  हा ग्रंथ या दोनही ग्रंथांच्या आधीचा असावा. के.एस्. महादेवशास्त्री यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे रघुनाथसुरी हे तंजावुर येथे वास्तव्यास असावेत. १६७८ मध्ये एकोजीराव महाराजांनी जेव्हा तंजावुरमधे मराठ्यांचे साम्राज्य प्रस्थापित केले तेव्हा त्यांच्या पत्नी राणी दिपांबिका यांचे संरक्षक म्हणून रघुनाथसुरी यांची नेमणुक केली होती. धर्मामृतमहोदधी हा ग्रंथ शके १६२३ अर्थात इ.स. १७०१मधे रचला गेला. यावरून रघुनाथसुरींचा लेखनकाळ १६५० ते १७१० मानता येऊ शकतो.

भोजनकुतूहल ह्या शीर्षकानुसार यामध्ये भोजनासंबंधी अनेक विषयांवर लेखन केलेले आहे. आहारशास्त्र आणि पाककलासंबंधी अभ्यास हा ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय आहे. यात विविध ग्रंथ तसेच लेखकांचे उल्लेख व त्यांच्या मतांची चर्चा आहे. त्यावरुन हा संकलितग्रंथ आहे हे दिसते. ह्या ग्रंथाचे तीन विभाग म्हणजेच परिच्छेद आहेत. प्रत्येक परिच्छेदात विविध प्रकरणे आहेत.

प्रथम परिच्छेद धान्यविषयक आहे. त्यामध्ये विविध धान्यांच्या गुणांची चर्चा, प्रभाव या विषयी लिहिले आहे. सिद्धान्न अर्थात  शिजवलेल्या अन्नाविषयी सखोल माहिती आहे. एकूण ४२ विविध विषय ह्या प्रकरणात चर्चिले आहेत. दुसऱ्या प्रकरणात विविध भाज्यांचे प्रकार, दूध व दुग्धजन्यपदार्थ, कडधान्य, तेल तसेच मधुर पदार्थ यांच्या सामान्य व विशेष गुणांची माहिती आली आहे. यामध्ये दिलेली विषबाधा झाल्याची लक्षणे वैशिष्टयपूर्ण आहेत. याव्यतिरिक्त अन्न शिजवण्याच्या विविध भांड्याबद्दल वर्णन आढळते. तसेच अन्नभक्षणासंबधी चांगल्या-वाईट सवयींची चर्चा येते. जलप्रकरण, दधिप्रकरण, क्षीरप्रकरणात विविध प्राण्यांचे दूध आणि त्यांचे गुणधर्म चर्चिले आहेत. एकूण आठ प्रकारच्या दुधांविषयी चर्चा केली आहे. त्याबरोबरच त्यांचे गुणधर्म केव्हा बदलतात त्यासंदर्भात क्षीरफेनप्रकरण किंवा दधिप्रकरण यात चर्चा आहे. जलप्रकरणात पाण्याचे गुण त्याचे भेद, नद्यांचे विशेष यासरख्या विविध विषयांचा विचार केला आहे.

भक्ष्याभक्ष्यप्रकरण या द्वितीय परिच्छेदात जेवणाच्या वेळा व त्यासंबधातील विविध गोष्टींवर चर्चा आढळते. या प्रकरणात स्मृती साहित्यातील मतांचा उल्लेख सपडतो. एकंदरीत अकरा विभागात हे प्रकरण विभागलेले आहे. खाण्यास योग्य काय व अयोग्य काय यापासून ते रात्रीच्या भोजनात निषिद्ध पदार्थांपर्यंत सर्व विषयांचा समावेश आहे. यात द्रव्यशुद्धी प्रकरण समाविष्ट आहे. याप्रकरणाविषयी विद्वत्जनांमधे मतभेद आहेत. काहींच्यामते हे प्रकरण नंतर समाविष्ट झाले असावे कारण परिच्छेदाचे शीर्षक भक्ष्याभक्ष्य प्रकरण असल्यामुळे द्रव्यशुद्धी हा विषय ह्याअंतर्गत येऊ शकत नाही असा मतप्रवाह आहे.

तृतीय परिच्छेदाचे शीर्षक विभावरीविलास आहे. यामध्ये अन्नपदार्थांशी थेट संबंध नसलेल्या विषयांचा समावेश केला आहे. मागील दोन परिच्छेदांप्रमाणेच याठिकाणीही विषयानुरूप विविध ग्रंथातील मतांचा उल्लेख आहे. त्यामध्ये मुहूर्ततत्त्वप्रकाश, याज्ञवल्क्यवचनव्याख्या, विज्ञानेश्वरीय त्याचबरोबर शिवरहस्य  या आणि विविध ग्रंथाचा समावेश होतो. या परिच्छेदामधे प्रकरणे उदाहरणार्थ दीपविधी ज्यामध्ये दिवे लावण्यासंबंधी, शयनव्यवस्था कशी असावी याविषयी चर्चा आहे. संध्याकाळी वापरण्याची सुगंधीद्रव्ये, कीटकांचा बंदोबस्त करणे याशिवाय स्त्रीधर्म, तिचे गुण, तसेच शरीरशास्त्राविषयी चर्चा केलेली दिसते. स्वप्नांबद्दल ही यात चर्चा आढळते.

आहारशास्त्रासंबंधी विविध मतांचा अभ्यास या ग्रंथाच्या मदतीने सहज शक्य आहे. ह्या ग्रंथातून महाराष्ट्रीय आणि तामिळनाडूमधील खाद्यसंस्कृतीबद्दल माहिती मिळते. त्याचबरोबर आज अन्नपद्धतीमधे झालेले बदल आणि शिजवण्याच्या पद्धती संबंधात तौलनिक अध्ययन करण्यासाठी हा ग्रंथ मोलाचा आहे. विषयांची मांडणी आणि त्यांचा क्रम ह्यामधून ग्रंथाची शास्त्रीय रचना ठळकपणे समोर येते. केवळ अन्न आणि ते शिजवणे ह्यावरच केन्द्रित न होता, त्याच्याशी संबंधित इतर विषयांचा केलेला समावेश वैद्यकशास्त्रीयदृष्ट्या देखील महत्त्वाचा आहे. अन्न, झोप, झोपण्याची जागा हे सर्व विषय त्यामुळे ह्या ग्रंथाचा भाग बनले आहेत. यावरुन लेखकाचा समग्र दृष्टिकोण समजतो आणि ह्या ग्रंथाचे महत्त्व द्विगुणित होते.

संदर्भ :

समीक्षक : गौरी मोघे