अ‍ॅंम्पियर, आंद्रे मारी : ( २० जानेवारी १७७५ ते १० जून १८३६ )

अ‍ॅम्पियर ह्यांनी कुठल्याही प्रकारचे औपचारिक शिक्षण घेतले नाही. घरच्या वाचनालयात असलेल्या पुस्तकांच्याद्वारे त्यांनी ज्ञान संपादन केले. वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी गणिताच्या अभ्यासास सुरुवात केली. कलनशास्त्राच्या (कॅल्क्युलस) अभ्यासासाठी त्यांना अ‍ॅबॉट डाबुरॉन ह्यांचे मार्गदर्शन लाभले. ह्याच सुमारास त्यांनी भौतिकशात्राच्या अभ्यासासही सुरुवात केली. वयाच्या १८ व्या वर्षांपर्यंत ह्या दोन्ही विषयांत त्यांनी प्राविण्य मिळवले. ह्याखेरीज इतिहास तत्त्वज्ञान आणि नैसर्गिक विज्ञान ह्याविषयातही त्यांना रस होता.

त्यांनी १७९९ मध्ये गणिताचे शिक्षक म्हणून आपल्या कारकीर्दीस सुरुवात केली. त्यानंतर वर्षभरातच ते बूर्ग-आं-ब्रेस येथील इकल सेंट्राल, येथे भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजु झाले. ह्याकाळात त्यांनी गणितावर संशोधन करून ‘विद्युत् सिद्धांताचा विचार’ हा शोधनिबंध प्रसिद्ध केला ते १८०४ साली इकल पॉलिटेक्निक येथे अध्यापक म्हणून रुजु झाले. ह्या पदावर असताना त्यांनी केलेल्या उत्तम कामगिरीमुळे कुठलेही औपचारीक शिक्षण अथवा पदवी नसतानाही १८०९ साली त्यांची गणिताचे प्राध्यापक म्हणून नियुक्ति झाली. १८२८ पर्यंत ते ह्या पदावर कार्यरत होते. ह्या दरम्यान १८१४ साली ते फ्रेंच विज्ञान अकादमीवर निवडून आले.

अ‍ॅम्पियर ह्यांनी १८१९-२० ह्या काळात पॅरिस विद्यापीठांत तत्त्वज्ञान आणि खगोलशास्त्र हे विषयही शिकविले. १८२४ साली कॉलेज दी फ्रांसच्या भौतिकशास्त्राच्या अध्यासनावर अ‍ॅम्पियर ह्यांची निवड झाली. ओरस्टेड ह्यांनी विद्युतप्रवाह व चुंबकत्वांतील संबंध दाखवून दिल्यानंतर अ‍ॅम्पियर ह्यांना विद्युत् चुंबकत्व शाखेत रस निर्माण झाला. ओरस्टेड ह्यांचे काम पुढे चालू ठेवत अ‍ॅम्पियर ह्यांनी सखोल प्रयोगांद्वारे विद्युत् प्रवाह व चुंबकत्व ह्यातील संबंध शोधला. दोन समांतर तारांमधून वाहणाऱ्या विद्युत् प्रवाहाच्या परिणामाने ह्या तारा एकमेकींना आकर्षित किंवा प्रतिकर्षित करतात. जर दोन्ही तारांमधील प्रवाह एकाच दिशेने वाहत असतील तर ह्या तारा एकमेकींना आकर्षित करतात आणि जर हे प्रवाह विरुद्ध दिशेने वाहत असतील तर ह्या तारा एक्मेकींना प्रतिकर्षित करतात, असे अ‍ॅम्पियर ह्यांनी दाखवून दिले. आपल्या गणितातील प्राविण्याचा उपयोग करून त्यांनी प्रयोगांच्या निरिक्षणांना नियम स्वरूपात मांडले आणि त्यानियमांचे सामान्यीकरण (generalisation) केले. ॲम्पियरचा नियम ह्यातूनच तयार झाला. विद्युत् अणि चुंबकत्व ह्यातील संबंध भौतिकशास्त्रीय दृष्टीकोनातून समजून घेण्यासाठी अ‍ॅम्पियर ह्यांनी विद्युतगतिकीय इलेक्ट्रॉन ही सैद्धांतिक कल्पना मांडली. त्यांचे हे संशोधन Memoirs On The Mathematical Theory Of Electrodynamics ह्या नावाने प्रसिद्ध झाले. हे संशोधन विद्युतगतिकीसाठीचे मूलभूत संशोधन ठरले. ह्या शाखेचे विद्युत गतिकी हे नावही अ‍ॅम्पियर ह्यांच्या ह्या संशोधनपर कामामुळेच रुढ झाले. हे संशोधन विद्युतगतिकीसाठीचा मूलभूत संदर्भ ठरले.

अ‍ॅम्पीअरचा विद्युतबलाचा नियम: दोन समांतर तारांमधून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाच्या परिणामाने ह्या तारा एकमेकींना आकर्षित किंवा प्रतिकर्षित करतात. जर दोन्ही तारांमधील प्रवाह एकाच दिशेने वाहत असतील तर ह्या तारा एकमेकींना आकर्षित करतात आणि जर हे प्रवाह विरुद्ध दिशेने वाहत असतील तर ह्या तारा एकमेकींना प्रतिकर्षित करतात. आकर्षण किंवा प्रतिकर्षणाचे बल हे दोन्ही तारांमधुन वाहणाऱ्या विद्युतप्रवाहांच्या गुणाकाराच्या समप्रमाणात तर दोन्ही तारांमधील अंतराच्या व्यस्त प्रमाणात असते.

ॲम्पिअरचा परिपथीय नियम: विद्युत प्रवाह वाहत असलेल्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते. तारेला काटकोनात असलेल्या प्रतलातील लूप भोवती असणारे चुंबकीय क्षेत्र तारेमधील विद्युत प्रवाहाच्या समप्रमाणात असते, तर लूप आणि तार ह्यामधील अंतराच्या व्यस्त प्रमाणात असते.

अ‍ॅम्पियर ह्यांना अनेक सन्मान मिळाले. रॉयल सोसायटीचे परदेशी सदस्य आणि रॉयल स्विडीश अकादमीचे परदेशी सदस्य म्हणून अ‍ॅम्पियर निवडून आले. भौतिकशात्रातील त्यांच्या मोलाच्या योगदानाच्या सन्मानार्थ मापनाच्या एस आय पद्धतीमध्ये विद्युत प्रवाहाचे एकक अँपियर म्हणून ओळखले जाते. आयफेल मनोऱ्यावर कोरलेल्या ७२ नावांमधे ह्या महान शास्त्रज्ञाच्या नावाचा समावेश आहे.

संदर्भ :

समीक्षक : हेमचंद्र प्रधान