जर्मनीच्या नाझी पक्षाचा अध्यक्ष व जर्मनीचा हुकूमशाह ॲडॉल्फ हिटलर (१८८९–१९४५) याचे आत्मचरित्र. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीत निर्माण झालेल्या दुरवस्थेच्या पार्श्वभूमीवर या ग्रंथाचे लेखन झाले.
पहिल्या महायुद्धात जर्मनीचा नामुष्कीजनक पराभव झाला. त्यामुळे जर्मनीत राजेशाही नष्ट होऊन वायमर प्रजासत्ताकाची स्थापना करण्यात आली. या प्रजासत्ताकाच्या प्रतिनिधींना अपमानकारक व्हर्सायचा तह स्वीकारावा लागला. एकूणच युद्धातील पराभव व जर्मनीवर लादलेल्या प्रचंड युद्ध खंडणीमुळे जर्मनीची अर्थव्यवस्था ढासळली. परिणामतः वायमर प्रजासत्ताकास लोकांचा विरोध होऊ लागला. या परिस्थितीचा फायदा घेऊन वायमर प्रजासत्ताक उलथवण्यासाठी लोकशाही विरोधक व हुकूमशाहीवर विश्वास असणाऱ्या हिटलरने ८ नोव्हेंबर १९२३ रोजी उठाव केला. मात्र तो फसल्यामुळे त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली. तुरुंगात असताना ११ नोव्हेंबर १९२३ ते २० डिसेंबर १९२४ या काळात त्याने या ग्रंथाचा पहिला भाग लिहिला व तो १२ प्रकरणांत विभागला आहे. तर दुसरा खंड १५ प्रकरणांत विभागला असून हा खंड त्याने तुरुंगातून सुटल्यावर लिहिला. या दोन्ही भागांचे एकत्रित रीत्या ग्रंथरूपात प्रकाशन १८ जुलै १९२५ रोजी करण्यात आले. प्रकाशनापूर्वी या ग्रंथाचे नाव ‘असत्य, मूर्खता आणि भीरुता यांविरुद्ध साडेचार वर्षे झगडा’ (Four and half years of struggle against Lies, Stupidity and Cowardice) असे होते, मात्र हे नाव खूपच लांबलचक वाटल्याने प्रकाशक मैक अमान यांनी हिटलरच्या परवानगीने हे नाव बदलून ‘माझा लढा’ (My Struggle / Mein Kamph) असे केले. हिटलरने हा ग्रंथ ८ नोव्हेंबर १९२३ च्या उठावातील १८ हुतात्म्यांना अर्पण केला आहे. या अर्पणपत्रिकेत तो म्हणतो ‘एकत्रित दफनही ज्यांना लाभू शकले नाही, त्यांना मी माझा हा ग्रंथ अर्पण करतो.ʼ दुसऱ्या खंडाच्या समारोपात हिटलर पुन्हा या वीरांच्या बलिदानाची आठवण करून त्यांच्या ऋणात राहणे पसंत करतो.
प्रस्तुत ग्रंथात हिटलरने आपले बालपण, वडिलांचा स्वभाव, आईचा मृत्यू, त्याची जगण्यासाठी धडपड, शिक्षण व नोकरीसाठी केलेला संघर्ष व शेवटी पहिल्या जागतिक महायुद्धाची सुरुवात होऊन सैनिकी नोकरी मिळाल्याचा आनंद या सर्व घटना मांडल्या आहेत. नोकरी करताना ‘जर्मन वर्कर्स पार्टी’ या राजकीय चळवळीच्या कामाबाबत गुप्त माहिती मिळवण्यासाठी सरकारने त्याला नियुक्त केले. यामुळे तो या पार्टीच्या संपर्कात आला आणि पुढे जाऊन तो पार्टीचा नेता बनला. पार्टीचे नाव अपुरे वाटू लागल्याने त्याने १ एप्रिल १९२० रोजी ते बदलून ‘नॅशनल सोशॅलिस्ट जर्मन पार्टी’ (National Socialist German Workers Party – ‘NAZI’) किंवा ‘नाझी’ असे ठेवले. या पार्टीच्या माध्यमातून ‘नाझीवाद’ या तत्त्वज्ञानाचा प्रसार व प्रचार केला. त्यामुळेच हा ग्रंथ नाझीवादाची आचारसंहिता मानली जाते. या ग्रंथात त्याने सर्वप्रथम ‘वंश शुद्धतेचा सिद्धांत’ मांडला, तो म्हणतो एकवेळ अन्नाची भेसळ परवडेल, मात्र रक्ताची भेसळ ‘राष्ट्राला’ मारते. त्यामुळे जे शुद्ध आर्य वंशाचे नाहीत, त्यांना जर्मनीत राहण्याचा अधिकार नाही. कारण इतर वंशीयांना जर्मन राष्ट्रवादाचे सोयरसुतक नाही, ते जर्मन जीवनाशी एकरूप राहू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना येथे राहण्याचा अधिकार नाही. हिटलरचा रोष विशेषतः ज्यू धर्मीयांबद्दल होता, कारण त्याच्या मते जर्मनीच्या पहिल्या महायुद्धातील पराभवाला ज्यू जबाबदार आहेत, ते जर्मनीचे रक्त शोषणाऱ्या जळवा आहेत, त्यांचे जीवन बांडगुळासारखे असून ते सैतान आहेत. त्यामुळे त्यांची कत्तल केली पाहिजे. अशी ‘वंशविद्वेषी’ विचारसरणीची मांडणी हिटलरने या ग्रंथात केली आहे.
हिटलरने या ग्रंथामध्ये कामगार वर्ग व त्यांच्या चळवळीवर सडकून टीका केली आहे. त्याच्या मते कामगारांना राष्ट्रवाद नको, कायदा नको, धर्म नको व चारित्र्यही नको. त्यामुळे या लोकांची घृणा येत सून यांच्यासाठी आपण परिश्रम व त्याग करण्यात काहीच अर्थ नाही. अशी माणसे केवळ संख्यात्मक आहेत, ती देशासाठी लायक नाहीत, त्यांचे देशाशी इमान नाही.
राजकारणाविषयी मत व्यक्त करताना तो म्हणतो, सर्वसामान्य माणसाने वयाच्या तिशीपर्यंत राजकारणात भाग घेऊ नये. कारण त्याच्यामध्ये बौद्धिक विकास, स्वतःचे मत व एखाद्या विषयाचा ठामपणा निर्माण झालेला नसतो. मात्र जे राजकारणात असामान्यता दाखवतात, ते या विचाराला अपवाद असल्याचे तो मान्य करतो. हिटलरच्या मते, माणसातील कमकुवतपणा ज्याला स्वत:च्या फायद्यासाठी वापरता येतो त्यालाच नेतृत्व माळ घालते. हिटलरला लोकशाहीचा तिटकारा होता. त्याच्या मते, लोकशाहीच्या डबक्यात साम्यवादाचे जंतू वाढतात. त्यामुळे अशी डबकी तयार होऊ नयेत याची काळजी घ्यावी. लोकशाहीच्या गप्पा मारणारे ढोंगी असतात, लोकशाहीतील बहुमताचे निर्णय हे खेळखंडोबा करणारे व विषासमान असतात. त्यामुळे देश विनाशाकडे जातो. म्हणून राज्य हे एकाच कर्त्या माणसाने चालवावे, त्याला सल्ला देण्यासाठी इतर असावीत, मात्र अंतिम निर्णय कर्त्या माणसाचेच असावेत.
या ग्रंथामध्ये हिटलरने जर्मनीच्या भविष्यातील योजना स्पष्ट केल्या आहेत. त्याच्या मते, फ्रान्स हा जर्मनीचा प्रमुख शत्रू असून आपण सर्वप्रथम त्याचा कायमचा बंदोबस्त करणार आहे. तसेच शुद्ध आर्य वंशासाठी अधिक भूभाग मिळविण्यासाठी रशियाची भूमी घेण्याची तयारीही तो दाखवतो. याबरोबरच यूरोपातील जर्मन वंशाचे लोक ज्या प्रदेशात आहेत ते ऑस्ट्रीया, झेकोस्लोव्हाकिया, सुडेटनलँड व पोलंडचा पश्चिम भाग हे प्रदेश जर्मनीला जोडण्याचा मनोदय तो करतो. यासाठी कितीही संहार करण्याची तयारी तो दर्शवितो. तो म्हणतो,‘ज्यांना जगायचे आहे, त्यांना झगडा करावा लागेल, ज्यांची झगड्याची तयारी नसेल, त्यांची जगण्याची लायकी नाही, हे सर्व भयंकर वाटेल; परंतु जग हे असेच आहे.’
एकूणच तत्कालीन काळात संपूर्ण जगात खळबळ माजविणाऱ्या या ग्रंथावर जर्मनीमध्येच बंदी घालण्यात आली. पुढे ही बंदी उठविण्यात आली. ग्रंथाचे वाचन करून जगातील विविध अभ्यासकांनी व तज्ज्ञांनी या ग्रंथाबाबत सकारात्मक व नकारात्मक मते नोंदविलेली आहेत. नाझीवादी विचारसरणी समजून घेण्यासाठी हा ग्रंथ महत्त्वाचा मानला जातो.
संदर्भ :
- James, V. M. Trans., Mein Kampf / My Struggle : Two Volumes in One, Luxembourg, 2017.
- Hitler, Adolf , Mein Kampf, London, 1939.
- ढवळीकर, श्रीराम, अनु., माझा लढा, पुणे, २००८.
समीक्षक : अरुण भोसले