ऐतिहासिक दृष्ट्या प्रसिद्ध असलेला फ्रान्सचा ईशान्येकडील एक प्रदेश. क्षेत्रफळ १५,१८५ चौ.किमी. लोकसंख्या २५,०२,१४९ (१९६८). उत्तरेस लक्सेंबर्ग व जर्मनी, पूर्वेस जर्मनी व दक्षिणेस स्वित्झर्लंड या देशांनी तो सीमित झाला असून ऱ्हाईन नदीने ॲल्सेस जर्मनीपासून वेगळा केला आहे. त्याचे सध्या ओ-रँ, बा-रँ, मोझेल व बेलफॉर असे शासकीय विभाग आहेत. ॲल्सेस−लॉरेन या संयुक्त नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशातील ॲल्सेस हा मुख्यतः पठारी भाग आहे. लॉरेन हा भाग काहीसा डोंगराळ आहे. लोखंड, कोळसा, लाकूड यांमुळे हा प्रदेश संपन्न आहे. शेती हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय असला, तरी रसायने, नैसर्गिक तेल, वस्त्रनिर्मिती आणि लोखंड व पोलाद यांचे उद्योग हेही महत्त्वाचे आहेत. याशिवाय कापूस, कागद, मद्य, तंबाखू व इतर खाद्यपदार्थ यांसाठीही हा प्रदेश प्रसिद्ध आहे.

आठव्या शतकात शार्लमेनने (सु. ७४२—८१४) हा प्रदेश जिंकला. तेव्हापासून यास राजकीय व ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. तत्पूर्वी तो काही वर्षे रोमन साम्राज्याखाली व त्यानंतर ॲलिमॅनी व फ्रँक टोळ्या यांच्या वर्चस्वाखाली होता. शार्लमेनने हा प्रदेश पवित्र रोमन साम्राज्यात समाविष्ट केला. पुढे ८७० मधील मेर्सेनच्या तहाने पूर्व फ्रँकच्या राज्यात म्हणजेच जर्मनीत तो समाविष्ट करण्यात आला. १३ व्या शतकात येथील शहरे स्वतंत्र नगरराज्ये होती. चौदाव्या लुईने ही राज्ये आपल्या वर्चस्वाखाली आणली. यास १६९७ च्या रिझविकच्या तहाने स्पेन, इंग्‍लंड, जर्मनी, नेदर्लंड्स यांनी मान्यता दिली. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर नेपोलियनच्या कारकिर्दीत तो फ्रेंचांकडेच राहिला. परंतु फ्रान्स व जर्मनी यांच्यातील तो एक तंट्याचा विषय झाला. १८७० मध्ये फ्रान्स व प्रशिया यांच्या युद्धात फ्रान्सचा पराभव झाला. त्यानंतर १९७१ मध्ये झालेल्या तहानुसार बिस्मार्कने बेलफॉर सोडून सर्व ॲल्सेस व लॉरेन जर्मनीत समाविष्ट केला. जर्मनीच्या एकीकरणाच्या दृष्टीने या प्रदेशास अत्यंत महत्त्व होते. तथापि फ्रेंच संस्कृतीची छाप पडलेल्या प्रदेशातील लोकांनी जर्मन सत्तेस अनेकदा विरोध केला. सु. ५०,००० फ्रेंच लोक या प्रदेशातून फ्रान्सच्या इतर भागात गेले. लष्करी दृष्ट्या हा प्रदेश मोक्याचा असल्यामुळे १८७१ ते १९१४ या कालखंडातील फ्रान्सच्या लष्करी व परराष्ट्रीय धोरणावर त्याचा प्रभाव दिसतो. या प्रदेशाच्या आर्थिक शोषणामुळे फ्रान्समधील असंतोष वाढत गेला. ही परिस्थिती काही अंशी पहिल्या महायुद्धास कारणीभूत झाली असावी. १९१९ च्या व्हर्सायच्या तहाने हा प्रदेश पुन्हा फ्रान्सला मिळाला. तेव्हापासून दुसऱ्या महायुद्धातील चार वर्षे (१९४०—४४) वगळता तो फ्रान्सकडेच आहे.