ब्रोटझ्, ज्यूसेप्पे : (२४ जानेवारी १८९५ ते ८ एप्रिल १९७६) ज्युसेप्पे ब्रोटझ् यांचा जन्म सार्दिनिया येथील ओरिस्टॅनो प्रांतातील घिलझारा येथे झाला. ते एक इटालियन औषध निर्माता व राजकारणी होते. १९१९ मध्ये कॅगलिथारी विद्यापीठातून त्यांनी पदवी प्राप्त केली. त्यांनी १९२२ मध्ये सिथीना विद्यापीठात आरोग्यशास्त्र (Hygiene) या विषयात विशेष प्राविण्य मिळविले. १९२५ मध्ये बोलोस्ना विद्यापीठाची औषध व शस्त्रक्रियेत (Medicine and Surgery) पदवी संपादन केली.
१९२२ मध्ये मोडेना व रेजिओ विद्यापीठात ते प्राध्यापक झाले. १९३९-४३ च्या दरम्यान ब्रोटझ् कॅम्लियारी विद्यापाठीचे संचालक झाले. १९३६-४५ या दरम्यान ब्रोट्झ् आरोग्यशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून कॅम्लियारी विद्यापीठात रूजू झाले. तेथेच त्यांनी शैक्षणिक संस्थेतील मुख्य अधिकारीपद भूषविले. सार्दिनिया येथील सार्वजनिक आरोग्यसंस्थेचे अधिक्षक असताना रॉकफेलर फाउंडेशनच्या आर्थिक मदतीने ब्रोटझ् यांनी मलेरिया निर्मूलनाची मोहीम सुरू केली.
दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी ब्रोटझ यांनी अतिशय महत्त्वाचे निरीक्षण केले. अनेक तरुण मुले गटाराच्या पाण्याने दूषित झालेल्या पाण्यात पोहत व त्यातील मासे कच्चे खात तरी सुद्धा त्यांना कोणताही आजार झाला नाही. त्याचवेळी टायफसची साथ सुरू होती. याचे कारण स्पष्ट करताना बोटझ् यांनी एक गृहितक घोषित केले. दूषित पाण्यामध्ये सालमोनेला टायफी या जीवाणूची वाढ रोखणारे जीव असावेत व तेच संसर्ग पसरविण्यास प्रतिबंध करीत असावेत. ब्रोटझ् हे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होते. त्यांना भाकित केलेल्या गृहितकास सिद्ध करण्याची आवश्यकता वाटली.
१९४८ मध्ये दूषित पाण्यातून सेफॅलोस्पोरियम ॲक्रोमोनियम नावाची बुरशी वेगळे करण्यात त्यांना यश आले. या बुरशीपासूनच तयार होणारी प्रतिजैविके सालमोनेला टायफी, व्हिब्रिओ कॉलरी, ब्रुसेला मेलिटेन्सीस अशा रोगकारक जीवाणूंविरुद्ध प्रभावी होती. त्या काळात ग्राम निगेटिव्ह रोगकारक जीवाणुंना मारणारे कोणतेही औषध नव्हते. ब्रोटझ् यांनी बुरशीपासून प्रतिजैवकीय तत्त्व शुद्ध स्वरूपात मिळविले. यालाच मायसेटिना असे म्हटले गेले. या प्रतिजैवकीय तत्त्वाचा मानवावर उपयोग करायचा असेल तर त्याची सिद्धता पडताळून पाहणे गरजेचे होते. त्यांनी हे तत्त्व स्थानिक तसेच शरीरात इंजेक्शनच्या रुपात टोचून पहिले. शस्त्रक्रियेदरम्यान जखमांना झालेला संसर्ग तसेच विषमज्वर, ब्रुसेलॉसिस या रोगांवरहे तत्त्व परिणामकारकरित्या काम करीत असलेले दिसले. शिवाय याचे कोणतेही दुष्परिणाम आढळले नाहीत.
आपल्या संशोधनाचे महत्त्व समजून सुद्धा ब्रोटझ् यांना आर्थिक पाठबळ व सुविधा यांच्या अभावामुळे बुरशीचा सखोल अभ्यास तसेच बुरशीने तयार केलेल्या पदार्थाचे सुरक्षित औषध म्हणून वापर करण्यात यश आले नाही.
पुढे ब्रोटझ् यांनी मायसेटिना चाचणीसाठी ऑक्सफर्ड स्कूल ऑफ पॅथॉलॉजी येथे पाठविले. हे केंद्र त्याकाळात प्रतिजैविकांचा अभ्यास करण्याचे महत्त्वाचे स्थान होते. याच संस्थेत फ्लोरी व चैनसारखे शास्त्रज्ञ संशोधन करीत होते. मायसेटिनामध्ये तीन प्रतिजैविके आढळली. ती सीफॅलोस्पोरित-पी, सीफलोस्पोरिन-एन आणि सीफॅलोस्पोरिन-सी ही ती तीन महत्त्वपूर्ण प्रतिजैविके होत.
ब्रोटझ् यांना १९७१ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाने मानद पदवी प्रदान केली तसेच नोबेल पारितोषकासाठी उमेदवारी जाहीर केली होती. १९५५ मध्ये ज्युसेप्पे ब्रोटझ् सार्दिनियाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. तसेच १९६९ मध्ये कॅम्लियारीचे महापौर होते.
संदर्भ :
- https://www.clinicalmicrobiologyandinfection.com/article/S1198-743X(15)30266-4/fulltext
- http://pacs.unica.it/brotzu/
- https://onlinelibrary.wiley.com/doi/pdf/10.1111/j.1469-0691.2000.tb02032.x
समीक्षक : रंजन गर्गे