कँडेला, फेलिक्स : (२७ जानेवारी, १९१० ते ७ डिसेंबर, १९९७) फेलिक्स कँडेला या मूळच्या स्पॅनिश वास्तुशास्त्रज्ञाचा जन्म स्पेनमधील माद्रिद या शहरात झाला. तेथीलच आर्किटेक्चर स्कूलमधून त्यांनी १९३६ साली वास्तुकलेची पदवी घेतली. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी मिळालेली शिष्यवृत्ती घेऊन ते जर्मनीला गेले. पण काही काळातच स्पेनमध्ये चालू झालेल्या यादवी युद्धात जनरल फ्रँकोच्या विरुद्ध लढण्यासाठी त्यांनी रिपब्लिकन सैन्यात प्रवेश केला. त्यामुळे १९३९ साली फ्रँकोची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर त्यांना फ्रान्समध्ये चार महिने कारावासात काढावे लागले. याचवेळी स्पेनमधील अनेक बुद्धिवादी मंडळी, कलाकार वगैरेंनी स्वदेश सोडून मेक्सिकोला पलायन केले. कँडेलादेखील असेच फ्रान्समधून अंगावर असलेल्या कपडयानिशी मेक्सिकोला निघून गेले.
मेक्सिकोला गेल्यावर तेथे त्यावेळी विशेषत्वाने हाताळल्या जात असलेल्या पर्यावरण आणि पुनर्बांधणी या विषयाकडे कँडेलांची दृष्टी वळली. त्या दृष्टीने त्यांनी प्रथम स्पॅनिश वसाहत या प्रकल्पासाठी एका कंपनीत नोकरी पत्करली. पण ती कंपनी काही काळातच बंद पडली आणि कँडेला यांनी दुस-या ठिकाणी ड्राफ्ट्समन म्हणून नोकरी घेतली. या सर्व काळात त्यांनी वास्तुकला व अभियांत्रिकी या विषयांवरील अनेक मासिके आणि प्रकाशने यांतील लेख आवडीने आणि अभ्यासपूर्वक वाचले. त्यातूनच निरनिराळे आकृतीबंध (Forms) आणि आकार (Shapes) असलेल्या अपारंपारिक संरचना कशा निर्माण करता येतील यावर त्यांचे सर्व लक्ष केंद्रित झाले. त्यातच स्विस संरचनात्मक अभियंता रॉबर्ट मेलार्ट(Robert Maillart) यांनी अभिकल्पलेल्या निरनिराळया कमानी संरचना आणि तुळईविरहित (Beamless) संरचना यांच्या अभ्यासामुळे त्यांना विशेषच स्फूर्ती मिळाली. कागद जसा विविध आकारात दुमडता-वळविता येतो, तसे काँक्रीटही करता आले पाहिजे, असा त्यांचा ध्यास होता. या सर्व अभ्यासाच्या आणि विचारांच्या आधारावर कँडेलांच्या मनात एक त्रिसूत्री पक्की होऊन गेली. एक म्हणजे कोणतीही संरचना कमीत कमी मालाचा वापर करुन नैसर्गिक संपत्तीची बचत केली पाहिजे, दुसरे म्हणजे अभिकल्प आणि प्रत्यक्ष बांधकाम यांची सांगड अशी पाहिजे की त्यामुळे कमीत कमी खर्चात संरचना झाल्या पाहिजेत आणि तिसरे म्हणजे कोणत्याही संरचनेत अलौकिक सौंदर्य निर्माण झालेच पाहिजे. हे सर्व साध्य करण्यासाठी संरचनात्मक अभियांत्रिकीचा विशेष अभ्यास आवश्यक असतो. पण कँडेलांचे अभियांत्रिकीचे औपचारिक शिक्षण सुद्धा झाले नव्हते आणि गुंतागुंतीची गणिती आकडेमोड (Calculations) तर त्यांना माहीतच नव्हती. तथापि कँडेला हे एक स्वशिक्षित विलक्षण आणि असामान्य अभियांत्रिकी रसायन होते. काँक्रीटची ताण (Tension) घेण्याची क्षमता अतिशय मर्यादित असते हे मूलतत्व माहीत असल्याने काँक्रीटचा आकार आणि आकृतीबंध कसे असल्याने त्यात ताण जवळजवळ निर्माण होणारच नाही आणि सर्व संरचना अगदी सुरक्षित असेल याचे सम्यक ज्ञान कँडेलांना आकडेमोडीच्या जंजाळात न जाता मनःपटलांवर स्पष्ट असायचे. त्यानुसार त्यांनी अत्यंत कमी जाडीच्या काँक्रीटच्या संरचनावर अनेक प्रयोग केले आणि त्या जोरावर शेकडो कवची संरचनांचे अभिकल्प करुन सौंदर्यपूर्ण रचना साकार केल्या.
ऑफीसमध्ये ड्राफ्ट्समनपासून प्रत्यक्ष कामावर फोरमन (Foreman) म्हणून अनुभव घेतलेल्या कँडेलांनी वयाच्या ४० व्या वर्षी १९५० मध्ये काही भागीदार बरोबर घेऊन स्वतःची क्युबिएटस आला (Cubietus Ala) या नावाने कंपनी काढली. या नावाचा अर्थ म्हणजे पक्ष्यांच्या पसरलेल्या पंखाच्या आकाराचे छत. कॅडेलांनी अनेक संरचनांमध्ये हायपरबोलिक पॅराबोलाईड-‘हायपार’ (Hyperbolic paraboloid–Hypar) या भूमितीतील गुंतागुंतीच्या आकाराचा विविधप्रकारे उपयोग करुन असंख्य वक्राकार कवची संरचना केल्या. त्यामुळे त्यांना शेल-बिल्डर (Shell-Builder)असे संबोधत असत.
कवची छत : त्यांच्या पुष्कळशा संरचना त्यांच्या आकृतीबंधामुळे छत्रीच्या संरचना(Umbrella Structure) म्हणून ओळखल्या जायच्या. १९५१ साली मेक्सिकोतील राष्ट्रीय विद्यापीठात बांधलेल्या कॉस्मिक किरण प्रयोगशाळेच्या अभिकल्पाचे काम कँडेलांनी केले. यातील काँक्रीट छताची जास्तीत जास्त जाडी ५० मिमी. होती. तर कमीत कमी १६ मिमी. या प्रकल्पामुळे कँडेलांना जगभर प्रसिद्धी मिळाली. १९५३-५५ या काळात त्यांनी आवरलेडी ऑफ दि मिरॅक्युलस मेडल या चर्चचे अभिकल्प केले. यात फक्त १.२७ सेंमी. जाडीच्या कॉंक्रीटच्या फळया (Boards) पाचरीने (Wedges) जोडून फक्त ४ सेंमी. जाड काँक्रीटचे कवची छत अशी वैशिष्टयपूर्ण रचना केली.
त्यानंतर १९५८ मध्ये क्यूएर्नावासा (Cuernavasa) येथे चॅपेल लोमसयाची संरचनाकेली. २१ मी. उंच असलेल्या चॅपेलसाठी वापरलेले काँक्रीट बहुतांशी फक्त ४० मिमी. जाड आहे. झोशेमिली, लेमॅनँशिलिए येथील रेस्टोंरंटच्या (Restaurant Les Manantiales at Xochemilea) या संरचनेत परस्परांना छेदणारे चार हायपार असूनही ही संरचना एखाद्या तरंगत्या कमलपुष्पासारखी आहे म्हणून त्याला ‘ला फ्लॉर’ (La Flor) असे संबोधतात. या संरचनेच्या काँक्रीट भिंती फक्त ३८मिमी. जाडीच्या आहेत.
या आणि अशा शेकडो संरचनांचे अभिकल्प कँडेलानी केले. त्याचप्रमाणे ज्याठिकाणी जमिनीची धारणशक्ती फार मर्यादित असेल तर पायासाठी कमी जाडीची काँक्रीटची उलटी छत्री वापरली तर बराच खर्च कमी होतो हे कँडेला यांनी दाखवून दिले.
अत्यंत त्रोटक अशी गणिती आकडेमोड पण त्याचवेळी अतिशय अनाकलनीय आकृतीबंध आणि आकार हा एक अभ्यासाचा विषय होऊन गेला आणि कँडेलांच्या मृत्यूनंतर अत्यंत आधुनिक गणिती पद्धतीने संगणकाद्वारे त्यांच्या काही संरचनांचा अभ्यास केल्यानंतर त्या संरचना कितीही धाडसी असल्यातरी त्या वजनाने अगदी हलक्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने कोठेही कमतरता नसणाऱ्या होत्या हे दिसून आले. १९५० ते १९७० या काळात अनेक संरचनांचे अभिकल्प केल्यानंतर कँडेलानी आपल्या व्यवसायातील सक्रिय सहभाग काढून घेतला आणि लिखाण, व्याख्याने देणे आणि शिकविणे यांवर सर्व लक्ष वळविले. १९७१ ते १९७८ मध्ये वास्तुकलेचे प्राध्यापक म्हणून त्यांनी शिकागोमधील इलिऑनिस विद्यापीठात काम केले आणि नंतर १९७९ साली अमेरिकेचे नागरिकत्व पत्करुन तेथेच मृत्यूपर्यंत वास्तव्य केले. मृत्युपूर्वी काही महिनेआधी त्यांच्या पोएटिक स्ट्रक्चर्स (‘Poetic Structures’) ह्या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते.
कँडेलांना त्यांच्या कार्याबद्दल १९६१ सालीच ऑगस्ते पेरे पारितोषिक (Auguste Perret Prize) मिळाले. ते विद्यालयीन शिक्षणाने अभियंता नव्हते. पण त्यांची व्यवसायिक कारकीर्द इतकी लक्षणीय होती की त्यांना इन्स्टिटयूट ऑफ स्ट्रक्चरल इंजिनिअर’ या संस्थेने सुवर्णपदक बहाल केले होते.
संदर्भ:
- ArchDaily
- Britannica Encyclopedia
समीक्षक : प्र. शं. अंबिके