दमानिया, अर्देशिर : ( सप्टेंबर, १९४५ -) अर्देशिर दमानिया यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांनी मुंबईच्या विज्ञान संस्थेतून पारिस्थितीकी या विषयात एम.एस्सी. केले. नंतर इंग्लंडमधील बर्मिंगहॅम विद्यापीठातून १९७५ मध्ये परत एकदा एम.एस्सी. आणि १९९३ मध्ये पीएच्.डी. केली. यासाठी त्यांनी गहू, सातू यांची उत्पत्ती, वाढ आणि जनुकसंपत्ती गोळा करून ती साठवण्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले. जनुकसंपत्ती साठवण्याचे शिक्षण घेणाऱ्या काही मोजक्या भारतीयात त्यांची गणना होते.

रोममध्ये युनोच्या अन्न व कृषी संघटनेबरोबर काम करीत असताना दमानिया आफ्रिका, आशिया, यूरोप आणि अमेरिकेतील अनेक ठिकाणी फिरून अन्नधान्याची जनुकसंपत्ती गोळा करीत. त्यानंतर ते इकार्डा (आंतरराष्ट्रीय शुष्क कृषी विज्ञान संशोधन केंद्र) येथे अन्नधान्य व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी चीन, तुर्कस्थान, जॉर्डन, इराण, मोरोक्को वगैरे देशातून धान्यजनुके गोळा केली.

सध्या दमानिया कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या डेव्हिस येथील वनस्पतीशास्त्र विभागात रिसर्च जेनेटिक्स म्हणून कार्यरत आहेत. जैवविविधतेचे जतन, पुराणी कृषीव्यवस्था, औषधी आणि जंगली वनस्पतींची लागवड अशा विषयात संशोधन करीत आहेत. गव्हाच्या पिकात संशोधन करणे, जनुकसंपत्तीचे जतन करणे, आशियातील कृषीपद्धती इत्यादी विषयांवर त्यांनी आजवर २५० शोध निबंध आणि लेख प्रसिद्ध केले आहेत. याशिवाय १५ पुस्तकांचे संपादन केले आहे.

जगभरातील अन्नधान्याची जनुकसंपत्ती ओळखून ती गोळा करून त्याचा संग्रह व जतन करण्याच्या कार्याबद्दल दमानिया यांना अनेक सन्मान मिळाले आहेत. त्यात फेलो ऑफ इंडियन सोसायटी ऑफ जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग, फेलो ऑफ इंडियन सोसायटी ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस, फेलो ऑफ क्रॉप सोसायटी ऑफ अमेरिका इत्यादी आहेत.

युनायटेड नेशन्सच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या (आयबीपीजीआर) व्हालीव्होव्ह रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट इंडस्ट्रीज, पीटसबर्ग, रशिया यांचे पदक त्यांना मिळाले आहे.

समीक्षक : चंद्रकांत लट्टू