थॉमसन, जॉर्ज पॅजेट : ( ३ मे १८९२ – १० सप्टेंबर १९७५ )
ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ जॉर्ज पॅजेट टॉमसन ह्यांनी इलेक्ट्रॉनमध्ये कणात्मक गुणधर्मांबरोबरच तरंग लहरींचेही गुणधर्म असतात हे दाखवून दिले. ह्या शोधासाठी १९३७ सालचा भौतिकशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार त्यांना क्लिंटन डेव्हिसन ह्यांच्या सोबत विभागून देण्यात आला.
जॉर्ज पॅजेट थॉमसन ह्यांचा जन्म केंब्रिज येथे झाला. नोबेल पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञ सर जे. जे. थॉमसन ह्यांचे ते सुपुत्र. दि पर्से स्कूल, केंब्रिज येथून शालेय शिक्षण पूर्ण करून जॉर्ज ह्यांनी १९१० साली केंब्रिज येथील ट्रिनिटी महाविद्यालयात गणित व भौतिकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी प्रवेश घेतला. आपले वडील जे. जे. थॉमसन ह्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वर्षभर संशोधन केले. परंतु पहिले महायुद्ध सुरू झाल्यावर ते ब्रिटीश पायदळातल्या क्विन्स रेजिमेंटमध्ये भरती झाले. काही काळ ते फ्रान्समध्ये कार्यरत होते. त्यानंतर विमानांचे स्थैर्य आणि वायुगतिकीच्या (aerodynamics) प्रश्नांवर संशोधनात्मक काम करण्यासाठी ते फार्नबरो (Farnborough) येथे आले. पहिल्या महायुद्धाच्या काळात त्यांनी हे काम सुरू ठेवले. ह्या दरम्यान आठ महिन्यांकरीता त्यांनी अमेरिकेतही काम केले.
जॉर्ज पॅजेट थॉमसन यांनी १९२० साली लष्करातील आपल्या कप्तान पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर तीन वर्षे त्यांनी कॉर्पस ख्रिस्ती महाविद्यालय केंब्रिज येथे अध्यापन केले. १९२२ साली ते ‘नैसर्गिक तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक’ (Natural Philosophy) ह्या पदावर अॅबर्डीन विद्यापीठात रुजु झाले. आठ वर्षे ते ह्या पदावर कार्यरत होते. ह्याच काळात त्यांनी इलेक्ट्रॉनच्या गुणधर्मांवर संशोधन केले. संशोधनात त्यांना इलेक्ट्रॉनमध्ये तरंग-लहरींचे गुणधर्म आढळले. ह्या संशोधनाबद्दल त्यांना क्लिंटन डेव्हिसन ह्यांचेबरोबर नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले. इलेक्ट्रॉनचा झोत धातूच्या पातळ पापुद्र्यातून आरपार जाताना ह्या इलेक्ट्रॉनचे विवर्तन (diffraction) होते असे जॉर्ज पॅजेट थॉमसन यांच्या निदर्शनास आले. विवर्तन हा तरंग लहरींचा गुणधर्म आहे. म्हणजेच इलेक्ट्रॉनमध्ये कणात्मक आणि तरंग-लहरीचेही गुणधर्म असतात, असे सिद्ध होते.
या प्रयोगांत इलेक्ट्रॉनच्या विवर्तनासाठी त्यांनी वापरलेले तंत्र घन पदार्थांच्या पृष्ठभागांचा अभ्यास करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरलेले आहे.
जॉर्ज पॅजेट १९३० ते १९५२ या काळात थॉमसन इंपिरिअल महाविद्यालय लंडन येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. या कार्यकाळात त्यांनी अणुकेंद्रकीय भौतिकशास्त्र आणि त्याचा लष्करी उपयोग ह्यांत विशेष रस घेतला. अणुबॉम्बची शक्यता पडताळून पहाण्यासाठी स्थापन केलेल्या एम. ए. यु.डी. (MAUD- Military Application Of Uranium Detonation) समितीच्या अध्यक्षपदी १९४० साली त्यांची नेमणूक झाली. ह्या काळात अमेरिकेचे अणुबॉम्ब निर्मितीचे प्रयत्न त्यांनी जवळून पाहिले.
इंपिरीअल महाविद्यालयात जॉर्ज पॅजेट थॉमसन यांनी ड्युटेरिअमपासून अणुकेंद्रकीय ऊर्जा मिळवण्याच्या शक्यतेवरसुद्धा संशोधन केले. सुरक्षिततेच्या करणासाठी हे संशोधन पुढे अल्डरमास्टन येथील असोसिएटेड इलेक्ट्रिकल रिसर्च लॅबोरेटरीज येथे हलविण्यात आले. जॉर्ज अल्डरमास्टन येथे सल्लागार म्हणून कार्यरत होते.
लंडनच्या रॉयल सोसायटीने १९३० मध्ये थॉमसन यांची सदस्य म्हणून निवड केली आणि त्यांना ह्यूज व रॉयल ही पदके मिळाली, नाइट हा किताबही त्यांना मिळाला. केंब्रिज येथील कॉर्पस ख्रिस्ती कॉलेजाचे ते मास्टर होते. इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स आणि ब्रिटिश ॲसोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स या संस्थांचे ते अध्यक्ष होते.
थॉमसन यांनी लिहिलेले ॲप्लाइड एरोडायनॅमिक्स; वेव्ह मेकॅनिक्स ऑफ द फ्री इलेक्ट्रॉन; द ॲटम, थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ इलेक्ट्रॉन डिफ्रॅक्शन (डब्ल्यू. कॉक्रन यांच्याबरोबर); द फोर्सिबल फ्यूचर; द इन्स्पिरेशन ऑफ सायन्स आणि जे. जे. थॉमसन अँड द कॅव्हेंडिश लॅबोरेटरी इन हिज डेज हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
केंब्रिज येथे त्यांचा मृत्यू झाला.
संदर्भ :
- https://www.thefamouspeople.com/profiles/sir-george-paget-thomson-php
- https://www.nobelprize.org/nobel_prizes/physics/laureates/1937/thomson-bio.html
समीक्षक : हेमंत लागवणकर