अँटिऱ्हायनम : (इं. स्नॅपड्रॅगॉन; लॅ.अँटिऱ्हायनम मॅजुस, कुल – स्क्रोफ्यूलॅरिएसी). हे हंगामी / बहुवर्षायू फुलझाड आहे. फुले सुंदर, आकर्षक आणि मोहक असून अनेक दिवस टिकतात. बागेसाठी, फुलदांडे, गुच्छ, सुशोभीकरण, ताटवे (Bedding), कुंडीतील लागवड, मिश्र लागवड, किनारी इत्यादीसाठी उत्कृष्ट फुलझाड आहे. फुलांना मंद सुगंध असून अनेक फुलांचा एकत्रित फुलदांडा असतो. काहीशी नळीसारखी व बाहेरील बाजूस उमलणारी, दोन उघड्या ओठासारखी भासतात. याच्या ४२ प्रजाती असून उगमस्थान युरोप आहे. आधुनिक वाणाचे मूळ भूमध्यसामुद्रिक प्रदेशातून युरोपात पोहोचल्याचे दाखले आहेत.
याचे बुटके, मध्यम व उंच वाढणारे असे तीन प्रकारचे वाण आहेत. अँटिऱ्हायनम मॅजुस ही प्रजाती भारतात व जगभर मोठ्या प्रमाणावर लावली जाते. उंची ३-४ फुट असते. यामध्ये अनेक वाण असून आधुनिक संकरित वाण सरस आहेत. रंगांची विविधता, सुगंध यामुळे लोकप्रिय आहेत. अलीकडे यात चौगुणी (Tetraploid) वाण तयार केले असून त्यांची टपोरी, लांब, आकर्षक विविध रंगी फुलास सर्वाधिक मागणी आहे. मुख्यतः लाल, गुलाबी, नारंगी, पांढरा, पिवळा इत्यादी रंग आहेत.
लागवड : पिकाच्या लागवडीसाठी सुपीक, पाण्याचा निचरा होणारी जमीन योग्य असते. लाल सुपीक जमिनीत फुले चांगली वाढतात. अति पाऊस व पाणथळ जमिनीत पिक वाढत नाही व मर रोग येतो. भरपूर सूर्यप्रकाश व मुबलक प्रमाणात अन्नद्रव्ये असणारी निचऱ्याची जमीन उत्कृष्ट असते. लागवडी वेळी उत्तम दर्जाचे कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. जमीन भूसभूशीत पण काहीशी घट्ट असावी. लागवड २०-३० सेंमी. अंतरावर करावी. याची लागवड युरोपात हरितगृहात केली जाते.
मोठी फुले असणाऱ्या एकाच फुलदांडयासाठी एक खोड वाढू द्यावे, परंतु जास्त फुलदांडे पाहिजे असल्यास झाड ८-१० सेंमी. उंच असताना शेंडा खुडावा जेणेकरून फुट येते. आणखी जास्त फुलदांडे पाहिजे असल्यास दुय्यम फुटीचा शेंडा पुन्हा खुडावा; त्यामुळे मुबलक प्रमाणात फुट येते व फुलदाडयांची संख्या सर्वाधिक होते. झाडे उंच वाढल्यास आधार देणे आवश्यक असते. जुनी व फिका रंग झालेली फुलदांडे काढून टाकावी. फुले बुडाकडून शेंडयाकडे उमलतात, सुरुवातीची ५ – ७ फुले उमलताच फुलदांडयांची काढणी करावी. फुलदांडे चार तास सोडीयम हायपोक्लोराइड (Bleach) द्रावणात ७ सेंमी. पाण्यात राहतील अशी ठेवावी. त्यानंतर विक्रीस पाठवावी अथवा ४-७o से. तापमानात साठवणूक करावी.
अँटिऱ्हायनमची रोपे बियापासून करतात. बियाणे अत्यंत लहान असते. रोपे कुंडीत तयार करावीत. चाळलेले शेणखत + माती समप्रमाणात घेऊन पेरणी करावी. बियाणे पृष्ठभागावर पेरावीत, बियाणे खोलवर जाणार नाही याची काळजी घ्यावी. कुजलेले खत अथवा कोकोपीटने हलके झाकावे. सूक्ष्म फवाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे अन्यथा बियाणे उघडे पडते. १०-१४ दिवसांत उगवण होते. रोपे ६ पानाची झाल्यास पुनर्लागवङ करावी. लागवडी वेळी माती घट्ट दाबावी.
फुलझाडावर मावा किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. नियंत्रणासाठी कीटकनाशकाची फवारणी करावी. पिकावर भुरी, केवडा, मर, तांबेरा इ. रोग येतात, त्यांचे नियंत्रणासाठी बुरशी नाशकाची फवारणी करावी.
संदर्भ : Randhawa, J.S.; Mukhopadhy, A. Floriculture in India, Allied publishers Pvt.Ltd.,New Delhi,1986.
समीक्षक : प्रमोद रसाळ