शब्दब्रह्म हा सामासिक शब्द असून शब्दात्मक ब्रह्म असा त्याचा विग्रह आहे. हा शब्द वेदात्मक व स्फोटात्मक असून नित्य शब्दरूपी ब्रह्म या अर्थी त्याचा वापर केला जातो, असे वाचस्पत्यमकार म्हणतात. या शब्दाचा अर्थप्रयोग श्रीमद्भागवतात दहाव्या स्कंधात आढळतो. याशिवाय हाच उल्लेख महाभारताच्या ‘शांतिपर्वा’त, विष्णपुराणात, नारदपुराणात, ब्रह्मबिंदूपनिषद, त्रिपुरातापिन्युपनिषद, भोजदेवविरचित शृंगारप्रकाश इत्यादी ठिकाणी आढळतो. वाक्यपदीयनामक ग्रंथात शब्दब्रह्मवादी भर्तृहरीने विभिन्न कारिकांमधून शब्दब्रह्माचे स्वरूप स्पष्ट केले आहे. वाक्यपदीयच्या पहिल्या ब्रह्मकांडात वास्तुनिर्देशात्मक मंगलाचरणातून हे शब्दब्रह्माचे स्वरूप सांगताना म्हणतात की,
अनादिनिधनं ब्रह्म शब्दतत्त्वं यदक्षरम् ।
विवर्ततेऽर्थभावेन प्रक्रिया जगतोयत: ।। (वा. ब्र. १.१).
अर्थात, ते उत्पत्ती व विनाश या प्रक्रियेपासून मुक्त आहे, आदी व अंत रहित आहे. अर्थात कालकृत परिच्छेद रहित आहे अथवा पूर्व-अपर विभागरहित आहे. तसेच देशकृत परिच्छेदरहित हे शब्दब्रह्म अकारादी अक्षरांचे निमित्त असल्यामुळे अक्षर आहे. येथे अक्षर शब्दाने ओंकारलाच शब्द तत्त्वात्मक ब्रह्म म्हणून संबोधले आहे. थोडक्यात ज्यापासून जगातील घडामोडी अर्थ म्हणून प्रकट होतात, जे अनादी, अनंत व अविनाशी आहे, ते ब्रह्मच शब्दाचे खरे स्वरूप आहे.
प्रश्नोपनिषदानुसार ओंकार हाच परब्रह्म व परप्रणव आहे. शांत अवस्थेत ओंकारच परब्रह्म वा परप्रणव आहे, तर शबल अवस्थेत तेच अपरब्रह्म वा अपरप्रणव आहे. हे शब्दब्रह्म सक्रिय व निष्क्रिय असे द्विविध आहे. वैयाकरणांच्या मते शब्दब्रह्म सर्व वाङ्मय, जग आणि या चराचर सृष्टीला व्यापून असून तेच या जगाचे अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. अकरादी वर्णांचे कारण असूनही अविद्यारूपी बाह्यार्थ विवेक्षेमुळे घटपटादींच्या रूपाने विवर्तित होते, म्हणजे अर्थ किंवा कार्य रूपात दिसून येते. शब्द-अर्थ रूप पश्यंती वाणीरूप शब्दब्रह्मच जगातील सर्व घडामोडींना कारणीभूत आहे.
भर्तृहरीने शब्दाच्या पश्यंती, मध्यमा व वैखरी या तीन अवस्था मानल्या आहेत, तर नागेशभट्ट याने ज्या चवथ्या अवस्थेस ‘परा’ म्हटले आहे. तिलाच भर्तृहरीने तृतीय अवस्था, पश्यंती म्हटले असून तिच्यापासून जगाची उत्पत्ती होते, असे म्हटले आहे (वा. ब्र. १.१४३). काश्मिरी शैववादी शिवदृष्टीकार सोमानंद यांच्या मते ‘पश्यंती वाग्रूपं ब्रह्मेति’. तसे पाहता सृष्टीच्या आरंभी सर्व ग्राह्य-ग्राहकाकाररहित पश्यंती वाणीरूप शब्दब्रह्मच असते. सर्व प्राण्यांमध्ये चैतन्यरूपाने वास करणारे आणि हे समस्त जग ज्याचा परिणाम आहे, ते शब्दब्रह्म सर्वोत्तम आहे. विवर्त म्हणजे काय तर ‘अतत्त्वतोऽन्यथाप्रथा विवृतं इत्युदीरित:’ अर्थात विवर्त अतात्त्विक ज्ञान होय. जसे, दोरीला साप समजणे होय. याशिवाय अजून एक विकारनामक पदार्थदेखील आहे, जो ‘सतत्त्वतोऽन्यथाप्रथा विकार इत्युदीर्यते’ म्हणजे सतात्त्विक परिवर्तन विकार होय. जसे, दुधाचे दह्यात रूपांतर होणे (भागव. ११.१२.१७).
शब्दविवर्तवादानुसार हा अर्थरूप संसार शब्दाचे अतात्त्विक रूप आहे. तर शब्दपरिणामवादानुसार अर्थरूप संसार शब्दाचा परिणाम वा विकार आहे. वैयाकरणसिद्धांत विवर्तवादास मानतो. जरी या विवर्तवादास द्योतीत करण्यासाठी ‘शब्दस्य परिणामोऽयमित्याम्रायविदो विदु:’ (वा. ब्र. १.१२०) अशा प्रकारे जग शब्दाचा परिणाम आहे सांगतात, त्याचबरोबर विवर्ततेऽर्थभावेन (वा. ब्र. १.१) असेही म्हणतात, तरीही अद्वैतवादानुसार समस्त जग शब्दब्रह्माचे विवर्त आहे. प्राचीन काळी परिणाम या अर्थी विवर्त शब्दाचा प्रयोग होत, जसे भवभूतीने विवर्त हा शब्द परिणाम या अर्थी वापरलेला दिसतो. याशिवाय शांतरक्षित बौद्धाचार्य यांनी नाश व उत्पत्ती यांच्या अग्रस्थ जे शब्दमय परब्रह्म आहे, त्याचेच रूप म्हणजे रसादीभाव परिणाम आहेत, असे म्हटले आहे. येथेही विवर्त शब्दाचा अर्थ परिणाम असा करण्यात आला आहे. भर्तृहरीच्या मते त्या अखंड तत्त्वाचे स्वरूप अच्युत असून भेदानुकरणाने असत्यरूपात परिणत पावून ते भिन्न रूपांना व आकारांना धारण करते, यासच ‘विवर्त’ म्हणतात (वा.ब्र. १.२२).
वास्तविक पाहता ब्रह्म सर्व परिकल्पांच्या अतीत आहे, त्यामध्ये सर्व शक्ती निवास करतात. तेच सर्व सांसारिक पदार्थांच्या आकारात प्रकट होते. प्रत्येक क्रीयेच्या निष्पत्तीमध्ये ब्रह्माची कलनामक शक्ती कार्यरत असते. जसे, पाक (शिजविणे) क्रीयेत आग पेटविणे, चुलीवर/शेगडीवर भांडे ठेवणे, त्यात पाणी व तांदूळ घालणे, ते शिजविणे इत्यादी क्रीया पूर्वपरीभूतरूपाने होत असतात. या सर्व क्रीयांचा समाहार ”पाकक्रीया’ म्हणून संबोधला जातो. जसे, सोन्याची कुंडले इत्यादी सोन्याचा परिणाम आहेत, तसे अर्थरूप जग शब्दब्रह्माचा परिणाम आहे.
अशा प्रकारे अर्थरूप जग शब्दब्रह्माचा परिणाम सिद्ध केल्यानंतर पुढे म्हणतात की, हे शब्दब्रह्म परस्पर भिन्न व विविध शक्तीचे आश्रयस्थान आहे. हे आपल्या शक्तीतून अभिन्न असूनदेखील पृथकपृथक रूपात दिसून येते. जसे, घटापटादी परस्पर भिन्न असूनही पृथ्वीच आहेत, तसेच शब्दब्रह्माची एकता स्वाभाविक असून भेद काल्पनिक आहेत.
शब्दब्रह्माची कालशक्ती ही कर्तृशक्ती असून ती पदार्थांच्या उत्पत्ती व संहारास कारण आहे. सर्व पदार्थ हिच्याच आश्रयाने राहून जन्म, अस्तित्व, परिवर्तन, वाढ, क्षय व नाश हे सहा भावविकार क्रीयाभेदास कारण होतात (वा. ब्र. १.३).
शब्दब्रह्माच्या कालशक्तीचे अभ्यनुज्ञा (परवानगी) व प्रतिबंध असे दोन प्रकार आहेत. यामुळे भावविकारांचे उन्मीलन (उघडणे) व निमीलन (मिटणे) होते. वृक्ष इत्यादीसारख्या अचल पदार्थांमध्ये बीजांकुर, नाल, कांड, शाखा, प्रशाखा, पालवी, फूल, फळ या उत्तरोत्तर परस्परांच्या उपादान शक्ती आहेत. यांच्यात जो क्रम आहे, तो कालशक्तीच्या प्रतिबंध व अभ्यनुज्ञा शक्तींद्वारे घडून येतो. एकमात्र शब्दब्रह्म सर्व कारणांचे कारण असून तेच जगाच्या व्यावहारिक वर्गांचे रूप ग्रहण करते.
सर्व कार्यकारणात्मक शक्तींनी संपन्न शब्दब्रह्म भोक्ता, भोक्तव्य व भोग या तीन स्थितींमध्ये आढळते. जगातसुद्धा सर्व पदार्थांमध्ये कर्तृत्व, कर्म व क्रीया या तीन स्थिती दिसून येतात. जसे, पटज्ञानवानहम् (भोक्ता), अयं पट: (भोक्तव्य) आणि पटज्ञानं (भोग) याप्रमाणे. शब्दब्रह्म येथे स्वप्नावस्थेत मनुष्य जसा आपल्या मूळ स्वरूपाहून विचलित होत नाही आणि स्वप्नभूत परस्पर विलक्षण स्वप्न संसार निर्माण करतो, त्याप्रमाणे अजन्मा, अविकारी, नित्य शब्दब्रह्माप्रमाणे भोक्ता, भोक्तव्य व भोग या ग्रंथी विकसित होतात, तरी शब्दब्रह्मच या सर्व चराचर सृष्टीच्या प्रतिष्ठेस कारणभूत तत्त्व आहे.
संदर्भ :
- अवस्थी, शिवशंकर, वाक्यपदीयम् (ब्रह्मकांड), वाराणसी, २०१३.
- पं. श्रीकृष्णवल्लभाचार्य, ब्राह्मरसायनभाष्य, वाराणसी, १९७९.
- शर्मा, सच्चिदानंद, भर्तृहरी का शब्दब्रह्म, दिल्ली, २०१२.
समीक्षक : भाग्यलता पाटस्कर