अब्जांश तंत्रज्ञानाचे संरक्षण क्षेत्रात अनेकविध उपयोग आहेत. या लेखन नोंदीमध्ये यांबाबत संक्षिप्त स्वरूपात माहिती दिली आहे. अब्जांश तंत्रज्ञानाचा सैनिकी क्षेत्रात वापर केल्यास सैनिकांना बहुआयामी संरक्षण मिळून त्यांची लढण्याची क्षमता वाढते. अब्जांश तंत्रज्ञान व अब्जांश पदार्थ यांचा संरक्षण क्षेत्रात खालील बाबींसाठी प्रामुख्याने उपयोग केला जातो.

(१) सैनिकांचे युद्धभूमीवरील पोशाख (Combat Suit) : सैनिकांचे पोशाख बनवताना पुढील बाबी लक्षात घेतल्या जातात – (१) वजनाने हलके परंतु, लवचिक पोशाख, (२) बंदुकीच्या गोळ्यांपासून बचाव करणारे (बुलेटप्रुफ) पोशाख, (३) जैव-रासायनिक पदार्थांपासून संरक्षण करणारे पोशाख, (४) स्वनिर्जंतूक होणारे पोशाख, (५) शत्रूच्या नजरेतून सुटण्यासाठी सभोवतालच्या वातावरणाच्या रंगाशी जुळवून घेणारे (Camouflage) म्हणजे मायावरण किंवा छद्मावरण असलेले पोशाख, (६) औष्णिक नियंत्रण करणारे पोशाख. ही उद्दिष्ट्ये साध्य करणारे सैनिकी पोशाख बनविण्यासाठी अब्जांश तंतू (Nano fiber) व संयुक्त अब्जांश पदार्थ (Nano composite material) त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांमुळे खूपच उपयुक्त ठरतात.

सैनिकांच्या युद्धपोशाखांमध्ये अब्जांश संवेदकांचे जाळे (Network of Nano-Sensors) विणलेले असते. त्यामुळे सैनिकांचे शारीरिक व मानसिक आरोग्याची माहिती घेता येते व त्या आधारे या गोष्टींवर नियंत्रण करता येते. कार्बन अब्जांश नलिकांचा (Carbon nano tube) वापर केल्यास वातावरणाच्या स्थितीनुसार शरीरातील उष्णतेचे नियमन देखील करता येते. अब्जांश तंतूपासून बनविलेल्या व सभोवतालच्या वातावरणानुसार बदलणाऱ्या मायावरणामुळे (Adoptive Camouflage) सैनिकांना शत्रूपासून लपून राहता येते. या मायावरणामुळे सैनिक कोणत्याही युद्धक्षेत्रावर पोशाख न बदलता काम करू शकतात व त्यामुळे त्यांचा बहुमूल्य वेळ वाचतो.

जैव-अब्जांश संवेदकांचा कपडे, शिरस्त्राण, पादत्राणे, हातमोजे इत्यादींच्या निर्मितीत उपयोग करण्याविषयी जगभर संशोधन चालू आहे.

(२) जैव-रासायनिक अस्त्रांपासून संरक्षण : घातक रसायने, विषारी वायू, जैविक अस्त्रे इत्यादी गोष्टींचा वापर शत्रू राष्ट्रांकडून होण्याची शक्यता वाढली आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी सैनिकांचे पोशाख अब्जांश कण, अब्जांश तंतू किंवा धागे यांचा वापर करून बनवतात. असे पोशाख हलके व सच्छिद्र असतात. अब्जांश पदार्थांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांमुळे त्यांच्यावर पडणाऱ्या विषारी रासायनिक पदार्थांचे विघटन होवून त्यांचे विलगीकरण होते. चांदी, निकेल, टिटॅनियम या धातूंचे व मॅग्नेशियम ऑक्साईडच्या अब्जांश कणांची जैव-रासायानिक अस्त्रांतील घटकांची विघटनक्षमता सिद्ध झाली असल्यामुळे त्यांचा सैनिकांच्या पोशाखांत प्रामुख्याने वापर होतो. विशेष म्हणजे सैनिक वापरतात त्या गरजेच्या वस्तू जैव-रासायानिक अस्त्रातील घटकांपासून दूषित होत नाहीत. सैनिकांच्या जीविताच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब ठरते.

(३) चलाख शिरस्त्राण (Smart Helmets) : युद्धभूमीवरील सैनिकांचे अत्यंत महत्त्वाचे संरक्षण साधन म्हणजे शिरस्त्राण (हेल्मेट) होय. सैनिकांची पारंपरिक शिरस्त्राणे कृत्रिम धागे, केवलार (Kevlar) व अरॅमिड (Aramid) या रासायनिक पदार्थांच्या तंतूपासून बनविलेली असतात. ही शिरस्त्राणे दारूगोळ्यामुळे उद्भवणाऱ्या छोट्या आगी तसेच बॉम्ब, सुरुंग इत्यादींच्या स्फोटामुळे निर्माण होणाऱ्या व आरोग्यास धोकादायक असणाऱ्या ध्वनिलहरी यांच्यापासून पुरेसे सरंक्षण देतात. सध्याच्या काही प्रकारच्या शिरस्त्राणांमध्ये अंधारात किंवा रात्री दिसण्याची अत्याधुनिक कॅमेऱ्याची सोय असते. या शिरस्त्राणांचे वजन कमी करणे तसेच अस्त्र-क्षेपणांपासून संरक्षण मिळविणे इत्यादी उद्देश साध्य करण्यासाठी आता अब्जांश तंत्रज्ञानाचा अधिकाधिक उपयोग केला जात आहे. यासाठी कार्बन अब्जांश नलिकांचा वापर केलेले बहुवारिक (Polymeric) पदार्थ वापरले जातात. या शिरस्त्राणांमध्ये त्रिमितीय दृष्य विभागणी तंत्रज्ञानाचा (Three Dimensional Scene Segmentation Technology) वापर केलेला असतो. त्यांमध्ये मानवी चेहरा ओळखण्याची क्षमता असते. चलाख (Smart) शिरस्त्राणांमध्ये बहुसंवेदक प्रणाली प्रस्थापित केलेली असल्यामुळे हेरगिरी, ध्वनीरूपी संदेशवहन, अंधारात लपून बसलेल्या शत्रू सैनिकाचा (Sniper) शोध, युद्धभूमीवर सैनिक जिवंत असल्याचे पुरावे शोधणे इत्यादी बाबी शक्य होतात.

(४) संदेशवहन : अब्जांश तंत्रज्ञानाच्या वापरामुळे संदेशवहन उपकरणे अधिक कार्यक्षम, आकाराने लहान व वजनाने हलकी झाली आहेत. साहजिकच ती वापरणे खूपच सुलभ झाले आहे. अब्जांश विद्युत् यांत्रिकी प्रणालीमधील (Nano Electromechanical System) प्रगतीमुळे अब्जांश आकारातील अनुनादक (Resonators) अधिकाधिक विकसित करण्यात येत आहेत. सैनिक तळावरून तेथील परिसराचे धावते व्हिडिओ चित्रण करून नियंत्रण कक्षास उपयुक्त माहिती पाठवता येते. त्यामुळे सैनिक असलेल्या क्षेत्रातील भौगोलिक परिस्थितीचे अचूक आकलन होते. त्यामुळे प्रत्यक्ष युद्धाचे वेळी अचूक निर्णय घेण्यास मदत होते. अब्जांश तंत्रज्ञानामुळे संदेशवहनासाठी वापरली जाणारी उपकरणे आकाराने लहान असल्याने ती पोशाखावर बेमालूमपणे लावता येतात.

(५) जैवसंवेदकाद्वारे औषध वितरण व्यवस्था : युद्धाचे वेळी सैनिकांचे मानसिक व शारीरिक आरोग्य खूप महत्त्वाचे असते. शरीरावर अब्जांश आरोग्य संवेदकांच्या साहाय्याने आरोग्याच्या तपशिलाची माहिती मिळू शकते. शरीरातील नेमक्या ठिकाणी औषधी द्रव्य पोहोचणे, जखमी सैनिकाचे बाबतीत कृत्रिम परंतु, चैतन्यशील अवयवरोपण करणे यांबाबतीत अब्जांश तंत्रज्ञान वरदान ठरत आहे.

(६) शस्त्रास्त्रे : अब्जांश तंत्रज्ञानाचा व अब्जांश पदार्थांचा शस्त्रनिर्मितीत महत्त्वाचा उपयोग होतो. अशी शस्त्रे वजनाने हलकी परंतु, दणकट असतात. रेडिओ लहरींच्या साहाय्याने जहाजे, विमाने इत्यादींचे स्थान निश्चित करणाऱ्या रडार यंत्रणेमध्ये अब्जांश तंत्रज्ञानाचा व अब्जांश पदार्थांचा उपयोग होतो.

अब्जांश तंत्रज्ञानाचे विविध क्षेत्रात अनेक उपयोग आहेत. म्हणूनच भारतासह सर्वच देशांमध्ये त्याचा वापर सातत्त्याने वाढत आहे.

संदर्भ :

  • Defence, Weapons and The Use Of Nanotechnology In Modern Combat Equipment and Warfaer, AZo Nano,  Jan 3, 2020.
  • Tomar, Sanjiv, Nanotechnology Enabled Sensor Applications, CBW  Magazine, Institute for Defence Studies and Applications, July–December 2014.
  • Tomar, Sanjiv, Nanotechnology – The Emerging Field for Future Military Applications, I.D.S.A. Monograph Series, No. 48.

समीक्षक : वसंत वाघ