ग्राम, हॅन्स क्रिस्चिअन जोचिम :  ( १३ सप्टेंबर, १८५३ ते १४ नोव्हेंबर, १९३८) ग्राम यांचा जन्म कोपनहेगन, डेन्मार्क येथे झाला. सुरुवातीला ग्राम यांनी नैसर्गिक विज्ञान या विषयात अभ्यास केला. कोपेनहेगनच्या मेट्रोपॉलिटन शाळेतून १८७१ साली ते बी.ए. झाले.  पुढे त्यांना वैद्यकशास्त्र या विषयात रुची निर्माण झाली म्हणून १८७८ साली त्यांनी कोपनहेगन विद्यापीठामध्ये वैद्यकशास्त्र विषय शिकण्यासाठी प्रवेश घेतला. पुढील काही वर्षे त्यांनी कोपनहेगनमधील विविध दवाखान्यांमध्ये सहाय्यक म्हणून काम केले. १८८२ मध्ये विद्यापिठातील एका निबंध स्पर्धेत त्यांना सुवर्णपदक मिळाले, विषय होता ‘छोलॉरिकस आजारात असणारी लाल रक्तपेशींची संख्या व त्यांचे आकार .’ १८८३ साली त्यांनी ‘मानवी लालरक्तपेशींचा आकार’ या विषयावर त्यांचा शोध प्रबंध सादर केला व त्यांना एम. डी. ही पदवी प्रदान झाली. त्यापुढील काही वर्षे त्यांनी दवाखान्यातील सहाय्यक म्हणून काम केले. १८९१ साली ते औषधनिर्माणशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कोपनहेगन विद्यापीठात नियुक्त झाले. १८९२ साली ते रॉयल फ्रेड्रिक्स इस्पितळातील अंतर्गत वैद्यक विभागात मुख्य वैद्य म्हणून नियुक्त झाले. १९०० सालापर्यंत त्यांनी विद्यापीठातील प्राध्यापकपद व्यवस्थितरित्या सांभाळले. याच दरम्यान तरुण मुलांना क्लिनिकल शिक्षण देण्याबाबत ग्राम यांना विलक्षण रुची वाटू लागली. त्यांची भाषणे पुढे चार भागात प्रकाशित झाली. संपूर्ण डेन्मार्कमध्ये या पुस्तकांचा  मोठ्या प्रमाणात विद्यार्थी  वर्गात वापर सुरू झाला. १९०१ ते १९२१ या काळात प्राध्यापकी व्यतिरिक्त ग्राम हे खाजगी वैद्यकीय व्यवसाय करीत होते.

जीवाणूंचे अभिरंजन हे आंतरराष्ट्रीय पातळीवर ग्राम यांना ओळख आणि सन्मान देणारे संशोधन होते. १८८४ साली संशोधनानिमित्त ग्राम बर्लिनला असताना ते न्यूमोनियाने मरण पावलेल्या रुग्णाच्या फुफ्फुसांच्या पेशी सूक्ष्मदर्शकाखाली पाहत होते. त्यांच्या असे निदर्शनास आले की, काही रंगद्रव्य हे जिवाणूंकडून तत्परतेने शोषले जातात व टिकतात. या प्रयोगासाठी ग्राम यांनी एका काचपट्टीवर जिवाणूंचा पातळ थर तयार केला. हवेनी तो थर कोरडा झाल्यानंतर पेटलेल्या दिव्याच्या उष्णतेवर त्याला आणखी कोरडे केले. त्यानंतर त्या थरावर जेन्शिअन  (क्रिस्टल) व्हायोलेट हे रंगद्रव्य टाकले. अशा पद्धतीने जिवाणू असलेली काचपट्टी सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यानंतर ग्रामला असे दिसले की ही काचपट्टी पाण्याने धुतल्यावर काही जीवाणू (न्यूमोकोकाय) हे रंग जतन करून ठेवतात अशा जंतूंना ग्राम पॉझिटिव्ह, तर काही जीवाणू हे रंगद्रव्य सोडून देतात अशा जंतूंना ‘ग्राम निगेटीव्ह’  असे त्याने संबोधिले. ग्रामने त्याचे सुरुवातीचे संशोधन स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी  क्लेबसीएला न्यूमोनी  हे जंतू वापरून केले.

ग्रामने त्याच्या पद्धतीमध्ये प्रति रंगद्रव्य कधीही वापरले नाही. त्याच्यानंतर काही वर्षांनी जर्मन शास्त्रज्ञ कार्ल वेइगर्ट याने साफ्रानीन (safranin)  वापरण्याची शेवटची पायरी सांगितली. ग्रामने स्वतः कधीच साफ्रानीन हे लाल रंगाचे द्रव्य ग्राम निगेटिव्ह जीवाणू बघण्यासाठी वापरले नव्हते.

डेन्मार्कच्या राजाने १९१२ साली ‘गोल्ड मेडल ऑफ मेरिट’ हा सन्मान देऊन ग्राम यांचा गौरव केला. १९०१ ते १९२१ च्या दरम्यान ते फार्माकोपिया कमिशनचे अध्यक्ष सुद्धा होते.

‘ग्राम अभिरंजन पद्धत’ जीवाणूंच्या वर्गीकरणासाठी आजही सूक्ष्मजीवशास्त्रातील प्रमाणित पद्धत म्हणून वापरण्यात येते.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे