हॅन्सन, गेरहार्ड हेन्रीक आरमौर : ( २९ जुलै १८४१ – १२ फेब्रुवारी १९१२ )
गेरहार्ड हेन्रिक अरमौर हॅन्सन यांचा जन्म नॉर्वेतील बर्गन (Bergen) येथे झाला. हॅन्सन वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले होते. त्यांनी पुढचे वैद्यकीय शिक्षण क्रिस्टेनिया युनिव्हर्सिटीत (Christiania University) घेतले. त्यांनी सुरुवातीला मुलींच्या शाळेत शिकवण्यास सुरुवात केली आणि नंतर त्यांनी स्वतःचे क्लासेस सुरू केले, ते अँनॉटॉमी विषय शिकवत असत. हॅन्सन यांनी वैद्यकशास्त्राचा अभ्यास करून रॉयल फ्रेडरिक्स युनिव्हर्सिटीमधून (Royal Frederick’s University) पदवी प्राप्त केली. त्यांनी क्रिस्टेनिया येथे नॅशनल हॉस्पिटलमध्ये सर्जन म्हणून काम केले. १८६८ मध्ये हॅन्सन हे त्यांच्या बर्गन येथील मूळ गावी परत गेले. त्या वेळेस बर्गनमध्ये कुष्ठरोग हा एक सामाजिक समस्या बनलेला रोग होता. हॅन्सन यांनी सुरू केलेल्या कुष्ठरोग कार्यक्रमामुळे बर्गन येथे संशोधनासाठी युरोपीयन सेंटर स्थापन झाले. त्या वेळी कुष्ठरोग हा अनुवांशिक किंवा दूषित वातावरणामुळे होतो असे समजले जात होते. हॅन्सन यांनी साथीच्या रोगशास्त्राच्या (Epidemiology) अभ्यासावरून हे सांगितले की हा एक आजार असून तो विशेष कारणामुळे होतो. १८७०-१८७१ मध्ये बॉन व्हिएन्नाला (Bonn Vienna) जाऊन त्यांनी प्रशिक्षण घेतले. त्याच्या सिद्धांताला सिद्ध करण्यासाठी १८७३ साली कुष्ठरोग्यांचे नमुने घेऊन प्रयोग केला असतांना त्यांना रोग्यांच्या पेशीत मायकोबॅक्टीरियम लेप्री (Mycobacterium Leprae) हा जीवाणू आढळून आला. विशेषतः तो दंडाकार (Rod Shape Bodies) असल्याचे त्यांनी सांगितले. या जंतुला हॅन्सनस बॅसिलस (Hansen Bacillus) असे ओळखले जाऊ लागले.
हान्सेन हे १८७९ मध्ये दंडगोलाकार सूक्ष्मजंतूसुद्धा रोगाचे कारण असू शकते, असे सांगणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते. त्यानंतर १८७९ मध्ये जर्मन जीवाणूशास्त्रज्ञ अल्बर्ट नेइस्सर (Albert Neisser) यांच्या मदतीने त्यांनी शोधनिबंध प्रकाशित केले. नेइस्सर यांनी संशोधनावर हक्क दाखवला त्यामुळे नेइस्सर आणि हॅन्सन यांच्यात वाद झाले. हॅन्सन हे जंतूची वाढ कृत्रिमरीत्या करण्यास आणि हा रोग संसर्गजन्य आहे हे सिद्ध करण्यात अपयशी ठरले हॅन्सन यांना कुष्ठरोगाच्या अभ्यासासाठी अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. हॅन्सन १८८४ मध्ये इंटरनॅशनल मेडिकल काँग्रेस इन कोपनहेगनचे अध्यक्ष. झाले. त्यांना रॉयल नॉर्वेजिअन ऑर्डर ऑफ सेंट ओलाव या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हॅन्सन हे हृदयरोगमुळे मृत्यू पावले .
संदर्भ :
- https://www.encyclopedia.com/science/dictionaries-thesauruses-pictures-and-press-releases/hansen-gerhard-henrik-armauer·
- https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4458930/
- https://onlinelibrary.wiley.com/doi/full/10.1111/aos.12159
समीक्षक : रंजन गर्गे