हर्षे, अल्फ्रेड डे : ( ४ डिसेंबर,१९०८ – २२ मे,१९९७ )

अल्फ्रेड डे हर्षे यांचा जन्म ओवोसो मिशिगन येथे झाला. १९३० मध्ये मिशिगन स्टेट महाविद्यालयातून बी.एस. तसेच १९३४ मध्ये पीएच्.डी. संपादन केली. १९३४-५० या दरम्यान अल्फ्रेड यांनी वॉशिंग्टन विद्यापीठाच्या जीवाणूशास्त्र विभागात शिक्षण व संशोधनाचे काम केले. १९५० मध्ये हर्षे वॉशिंग्टनच्या कारनेशी संस्थेच्या जनुकशास्त्र विभागाचे सदस्य होते. १९६२ ला न्यूयार्क येथील कोल्ड स्प्रिंग हार्बर या संस्थेच्या जनुकशास्त्र संशोधन विभागाचे संचालक झाले. १९५८ ला त्यांची राष्ट्रीय विज्ञान अकादमीवर निवड झाली. १९६५ मध्ये किंबर जेनेटिक्स या पारितोषिकाने ते गौरविले गेले.

हर्षे यांनी आपल्या प्रबंधामध्ये जीवाणूंच्या सर्व घटकांना वेगळे कसे करायचे याचे वर्णन केलेले होते. पुढे हर्षे सॅट लुईस येथील वॉशिंग्टन विद्यापीठात शिक्षक म्हणून रूजू झाले. १९३६-१९३९ या दरम्यान जीवाणूंच्या वाढीवरील शोधनिबंध त्यांनी प्रकाशित केले. नंतर त्यांनी विषाणू व त्यांच्या विरुद्ध तयार झालेल्या प्रतिपिंडाचा अभ्यास केला शिवाय विषाणूच्या संसर्गास कारणीभूत असलेल्या घटकांचा अभ्यास केला. शरीरातील प्रतिजन  (antigen) आणि त्याविरुद्ध तयार होणारे प्रतिपिंड (antibody) यांच्यातील होणाऱ्या प्रतिक्रियांचे सखोल वर्णन केले. सेंट लुईसमध्ये असतांना विषाणू किरणोत्सर्गात गंधक (३२p) आपल्या डीएनए मध्ये घेतात व तेच त्यांच्या नाशास                                              कारणीभूत असते हे त्यांनी दाखविले.

हर्षे आणि रोटमन यांनी तीन वेगवेगळ्या संसर्गजन्य बॅक्टेरिओफाजपासून नवीन तयार होणाऱ्या फाजचे संबंध विश्लेषित केले. याला Linkage analysis असे म्हणतात. याच पद्धतीने त्यांनी जीवाणूंना संसर्ग करून फाजेसचे संपूर्ण जनुकीय अधोरेखांकन केले. याला मार्कर असे म्हणतात. हे सर्वप्रथम केलेले जीन मॅपिंग होय. यालाच आपण जनुक नकाशा म्हणता येईल. १९६९ साली हर्षे, मॅक्स डेलब्रुक आणि ल्युरिया यांना फाजेसच्या जनुकांच्या संपूर्ण सखोल अभ्यासासाठी नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

ह्या त्रिकुटाने लॅम्डा तसेच टी फाजेसचा सखोल अभ्यास केला. हर्षे यांनी गुणसूत्रांचा सखोल अभ्यास करून त्यांच्या घटकांतील रचनांचे फरक दर्शविले. शिकागो विद्यापीठाने D.Sc. ही मानद पदवी देऊन त्यांना गौरविले. जनुक नकाशा तयार करणारा पहिला शास्त्रज्ञ म्हणून हर्षे यांना सारे जग ओळखते.

हर्षे यांचे हृदयविकाराने निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक :  रंजन गर्गे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.