लूरिया, साल्वाडोर एडवर्ड : (१३ ऑगस्ट १९१२ – ६ फेब्रुवारी १९९१) साल्वाडोर एडवर्ड लूरिया यांचा जन्म इटलीतील टुरिन या गावी एका ज्यू कुटुंबात झाला. त्यांनी टुरिन विद्यापीठातून वैद्यकीय पदवी संपादन केली. नंतरची दोन वर्षे त्यांनी इटलीच्या सैनिकी सेवेत वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरी केली. रोम विद्यापीठात त्यांनी रेडिऑलॉजी या विषयाचा अभ्यास केला. येथे असताना त्यांच्या वाचनात मॅक्स डेल्ब्रुक यांचा जनुकविषयक सिद्धांत वाचण्यात आला आणि त्यांनी बॅक्टेरियाला संक्रमित करणार्‍या बॅक्टेरियोफाज व्हायरसची जनुकविषयक सिद्धांताची चाचणी घेण्यासाठी प्रयोगांची मांडणी केली. त्यानंतर लवकरच त्यांना अमेरिकेत अभ्यासासाठी शिष्यवृत्ती मिळाली. या ठिकाणी त्यांनी मॅक्स डेल्ब्रुक यांच्याबरोबर संशोधन केले. बेनिटो मुसोलिनी या फॅसिस्ट शासनकर्त्याने ज्यू धर्मियांसाठी अभ्यास शिष्यवृत्या बंद केल्या. शिष्यवृत्तीच्या अभावामुळे त्यांनी फ्रांस गाठले. नाझी सैन्य फ्रान्समध्ये घुसल्यामुळे त्यांनी सायकलवरच दक्षिण फ्रांसमधील मार्सिले बंदर गाठले आणि तेथून अमेरिकेचा व्हिसा मिळवला आणि ते न्यूयॉर्क शहरात पोहोचले. रोम विद्यापीठातून अमेरिकेत पोहोचलेला भौतिकशास्त्रज्ञ एन्रिको फर्मी याच्या मदतीने त्यांनी रॉकफेलर फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळवली आणि ते कोलंबिया विद्यापीठात रुजू झाले.

ते  मॅक्स लुडविग हेनिंग डेल्ब्रुक यांच्या संपर्कात आले. डेल्ब्रुक आणि लूरिया यांनी उत्स्फूर्त जनुकीय उत्परिवर्तनामुळे व्हायरसच्या संक्रमणाला बॅक्टेरिया विरोध करतो (‘Bacterial resistance to virus infection mediated by random mutation’) अशा आशयाचा शोधनिबंध प्रकाशित केला. दरम्यान वॉशिंगटन विद्यापीठाचे अल्फ्रेड हर्षे हे व्हंडेरबिल्ट विद्यापीठाला भेटी देऊ लागले. लूरिया-डेल्ब्रुक प्रयोग फ्लक्चुएशन चाचणी म्हणून ओळखली जात होती. नैसर्गिक निवड ही सहजगत्या किंवा उत्स्फूर्तपणे घडलेल्या उत्परिवर्तनामुळे होते हा डार्विन यांचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत बॅक्टेरियासाठी तसेच उत्क्रांत जीवांनादेखील लागू पडतो हे लूरिया आणि डेल्ब्रुक यांनी प्रात्यक्षिकाद्वारा दाखवून दिले. याच त्यांच्या संशोधानासाठी १९६९ साली लूरिया, डेल्ब्रुक आणि हर्षे या तिघांना वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार विभागून देण्यात आला. व्हायरसची जनुकीय रचना आणि त्याचे प्रजोत्पादन या संबंधीच्या संशोधांनासाठी त्यांना नोबेल परितोषिकाने सन्मानित करण्यात आले. नेबेल समितीने असे नमूद केले आहे की, लूरिया यांनी बॅक्टेरियोफाज व्हायरस बॅक्टेरियाच्या पेशीत कसा प्रविष्ट होतो याचे महत्त्वपूर्ण संख्याशास्त्रीय विवेचन केले. टी-1 बॅक्टेरियोफाज व्हायरस हा बॅक्टेरियाच्या पेशीत आपली अंनुवंशिक सामग्री रिकामी करतो. त्यामुळे बॅक्टेरियाच्या पेशीत नवीन टी-1 बॅक्टेरियोफाज व्हायरसची निर्मिती होते. या संबंधीच्या अनुवांशिक आणि संख्याशास्त्रीय संकल्पना विकसित करून डेल्ब्रुक, लूरिया आणि हर्षे यांनी बॅक्टेरियाच्या पेशीत होणारे उत्स्फूर्त उतपरिवर्तन सिद्ध केले आहे.

ते सात वर्षे इंडियाना विद्यापीठात प्राध्यापक होते. जेम्स वॉट्सन हे त्यांचे विद्यार्थी होते. ज्यांनी फ्रांसिस क्रीकच्या सोबत भविष्यात डीएनएच्या रचनेचा शोध लावला. लूरिया आणि  बेर्तानी ज्यूसेपे यांनी मिळून यजमान बॅक्टेरिया पेशी नियंत्रित निर्बंध आणि बॅक्टेरियोफाज मध्ये होणारे बदल या विषयावर संशोधन केले. डीएनएच्या धाग्याला विशिष्ट ठिकाणी कापणार्‍या एंझाइमाचा त्यांनी शोध लावला. यालाच रिस्ट्रीक्शन एंझाइम म्हणून ओळखले जाते. अणुजीवशास्त्रात, डीएनए रिकॉम्बिनंट तंत्रज्ञानात रिस्ट्रीक्शन एंझाइम हे आता अत्यंत महत्त्वपूर्ण असे साधन म्हणून वापरले जाते.

मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ म्हणून खास निर्माण केलेल्या प्राध्यापकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी आपल्या संशोधनाची दिशा बदलून पेशीपटल आणि बॅक्टेरिओसीन्स यावरती लक्ष केंद्रित केले. पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये काम करत असतांना त्यांच्या असे लक्षात आले की बॅक्टेरिओसीन्समुळे पेशीपटलाच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. बॅक्टेरिओसीन्समुळे पेशीपटलातून ‘विद्युतभरीत कण’(Ions) पेशीच्या आत-बाहेर होतात आणि त्या पेशीची विद्युत-रासायनिक विभव प्रवणता (Elecromagnatic gradient) बिघडते. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथे कर्करोग संशोधन संस्थेत खास निर्माण केलेल्या प्राध्यापकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. या नव्याने उभारलेल्या संस्थेतूनच पुढे अनेक नोबेल पुरस्कार विजेते निर्माण झाले.

त्यांना नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे सदस्यत्व, अमेरिकन सोसायटी फॉर मायक्रोबायोलॉजीचे अध्यक्षपद, १९६९ सालचा वैद्यकशास्त्राचा विभागून नोबेल पुरस्कार, कोलंबिया विद्यापीठाच्या लुईसा ग्रोस होरविथ परितोषिक (डेल्ब्रूक यांच्यासोबत विभागून), नॅशनल मेडल ऑफ सायन्स मिळाले. त्यांच्या Life: the Unfinished experiment या पुस्तकाला विज्ञान क्षेत्रातील नॅशनल बुक ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले. त्यांनी आपल्या कार्यकाळात १५० शोधनिबंध लिहिले.

मॅसॅच्युसेट्स येथील लेक्सिंग्टन येथे त्यांचे हृदय विकरणे निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक : मुकुंद बोधनकर