हूबर, रॉबर्ट : ( २० फेब्रुवारी, १९३७ )
रॉबर्टं हूबर यांचा जन्म म्यूनिक येथे झाला. म्यूनिकमधील भाषेचे ज्ञान देणार्या शाळेत (Humanistische Karls-Gymnasium ) त्यांनी प्रवेश घेतला. तिथे त्यांना लॅटिन व ग्रीक या भाषांबरोबरच नैसर्गिक विज्ञान व रसायनशास्त्र यांचेही ज्ञान मिळायचे. त्यांची रसायनशास्त्रची गोडी वाढल्याने मिळतील तेवढी पुस्तके मिळवून ती त्यांनी वाचून काढली. त्यानंतर त्यांनी म्यूनिकमधील तंत्रज्ञान संस्थेत (Technische Hochschule) प्रवेश घेतला. याच संस्थेतून त्यांनी रसायनशास्त्रातली पदवी मिळवली. नंतर रॉबर्ट हूबर यांनी कार्बनी संयुगाच्या स्फटिक रचनेवर संशोधन करण्यास सुरुवात केली. या संशोधनाचे त्यांना मानधनही मिळायचे. त्यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत झाली. म्यूनिक तंत्रविज्ञान विद्यापीठ (Munich Technical University) येथे ड्ब्लु. होप्प यांच्याबरोबर स्फटिकशास्त्रावर संशोधन करून त्यांनी पीएच्.डी. मिळवली. त्यांच्या प्रबंधाचा विषय होता Diazo संयुगाची स्फटिक रचना. स्फटिकशास्त्राची ताकद हूबर यांना माहीत होती; म्हणूनच की काय त्यांच्या पुढील सगळ्याच कार्यावर त्याचा प्रभाव दिसून येतो. हूबर यांनी आपले सर्वाधिक संशोधन होप्प आणि कार्लसन यांच्याच प्रयोगशाळेत पूर्ण केले. कीटकांमध्ये होणारे रूपांतरण एकडिसोन या संप्रेरकामुळे होत असते. या संप्रेरकाच्या रचनेचा अभ्यास हूबर यांनी केला. कार्लसन प्रयोगशाळेत एकदा स्फटिकशास्त्रावर प्रयोग करत असताना एकडिसोनच्या रेणु वस्तुमान व स्टेराइड गुणधर्माबद्दल त्यांना समजले.
स्फटिकशास्त्राच्या क्षेत्रात त्यांचे काम चालूच होते. मॅक्स प्लांक इंस्टिट्युट फॉर बायोकेमिस्ट्री याठिकाणी हूबर यांनी रचना संशोधन विभाग (Structure Research Department) मध्ये संचालकपद स्विकारले. त्याचबरोबर म्यूनिक तंत्रविज्ञान विद्यापीठासोबत काही काळ प्राध्यापक म्हणून संलग्न राहिले. १९७० पासून त्यांनी प्रतिक्षमता प्रथिनांवर (Immunoglobulin) काम करण्यास सुरुवात केली. प्रथिनांवर अभ्यास करत असताना प्रथिने अतिशय लवचिक असतात असे त्यांच्या संशोधनातून त्यांना वाटले. परंतु वैज्ञानिक विश्वात यास मान्यता मिळाली नाही. १९८५ साली रॉबर्ट हुबर यांनी आपले सहकारी जोहान डीसेनहोप्पर आणि हार्टमंड मायकल यांच्याबरोबर प्रथमच प्रकाश संश्लेषण क्रिया केंद्राची (Photosynthesis Reaction Centre) त्रिमितीय रचना यशस्वीरीत्या शोधून काढली. हा एक क्रांतिकारी शोध होता. कारण यामुळे प्रकाश संश्लेषण प्रकाश क्रिया (Photosynthesis Light Reaction) तसेच प्रथिनांचे कार्य यांचे गूढ व्यवस्थितपणे उकलले गेले. त्यांच्या या कार्याबद्दल १९८८मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल परितोषिक रॉबर्ट हूबर आणि त्यांच्या सहकार्यांना दिले गेले.
त्यांनी २००५ सालापासून मॅक्स प्लांक संस्थेच्या जीवरसायनशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहिले. २०१३ साली ते म्यूनिक तंत्रज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्ट सन्माननीय सेवानिवृत्त प्राध्यापक (Emeritus of Excellence) म्हणून नेमले गेले आणि आजतागायत ते या पदावर कार्यरत आहेत.
संदर्भ :
- https://www.nobelprize.org/prizes/chemistry/1988/huber/autobiography/
- https://www.thefamouspeople.com/profiles/robert-huber2700.php
समीक्षक : मोहन मद्वाण्णा