इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनियरिंग अॅन्ड बायोटेक्नॉलॉजी : ( स्थापना – १९८३ )
संयुक्त राष्ट्र संघाच्या औद्योगिक विकास महामंडळाच्या (युनायटेड नेशन्स इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या) मान्यतेने १९८३ साली इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनियरिंग अॅन्ड बायोटेक्नॉलॉजी संस्थेची( थोडक्यात आयसीजीईबी) स्थापना झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील ही अद्वितीय स्वायत्त संस्था असून संस्थेच्या इटली, भारत व दक्षिण आफ्रिकेत प्रयोगशाळा आहेत.
या संस्थेस १९९४ साली स्वायत्त दर्जा मिळाला आहे. ६५ देश या संस्थेचे सभासद आहेत. एका नियंत्रण मंडळातर्फे संस्थेचे कार्य चालते. प्रत्येक सभासद देशाच्या एका संशोधक प्रतिनिधींच्या सल्ल्याने, तसेच विख्यात संशोधकांच्या सलागार समितीतर्फे संशोधनाचा आराखडा ठरवला जातो. इटलीतील त्रिस्टे, भारतात दिल्ली आणि दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन या तीन केंद्राच्या अखत्यारीतील एकूण ४६ प्रयोगशाळेतून संस्थेचे काम चालते. संशोधन, तंत्रज्ञान व प्रशिक्षण या तीन पद्धतीने संस्थेचे काम चालते.
रेण्वीय जीवविज्ञान, जैवतंत्रज्ञान या क्षेत्रातील आधुनिक तंत्रे, जैव वैद्यकीय (बायोमेडिसीन), पीक सुधार, पर्यावरण संरक्षण, जैवऔषधनिर्मिती (बायोफार्मा), जैविक कीडनाशके आणि जैवइंधन यातील संशोधनासाठी चाळीस देशातील सातशे वैज्ञानिक सध्या वेगवगेळ्या प्रयोगशाळेतून काम करीत आहेत. आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील व्यक्तींच्या मृत्यूचे कारण संसर्गजन्य आजारामध्ये आहे. आधुनिक रेण्वीय विज्ञानाच्या सहाय्याने विषाणू आणि परजीवींमुळे होणारे संबंधित आजाराचे निदान शोधणे व अशा आजारावर उपचार करण्यातील संशोधन त्रिस्टे, दिल्ली आणि केप टाउनमधील केंद्रामध्ये करण्यात येते. गोचीडीमधून प्रसारित होणाऱ्या मेंदू ताप विषाणू, डेंगी, चिकुनगुन्या आणि झिकावरचे संशोधन इटली आणि दिल्लीतील केंद्रामध्ये केले जाते.
याशिवाय क्षय, आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणात असलेला ट्रिपॅनोसोमा एकपेशीय परजीवीमुळे होणारा ट्रिपॅनोसोमा संसर्ग, लेशमानिया (स्लीपिंग सिकनेस) आणि चपट कृमीमुळे झालेला संसर्ग यांच्या प्रतिक्षमता चाचण्या यांवर केपटाउन येथे संशोधन होते.
त्रिस्टेमधील दोन गट रक्तवाहिन्याविकार व हृदयविकार यांच्यामधील आरएनएच्या सहभागावर संशोधन करीत आहेत. नव्या दिल्लीतील प्रयोगशाळेत परजीवींविरुद्ध प्रतिक्षमता व कर्करोग पेशीविरुद्धची नैसर्गिक प्रतिक्षमता यावर संशोधन चालू आहे.
जैवतंत्रज्ञानातील उपयोजित संशोधन हा आयसीजीईबीचा केंद्रबिंदू आहे. मानवी आजारावरील उपचार व निदान यांचे तंत्रज्ञान विकसित करणे. हे तंत्रज्ञान औषध उद्योग व जागतिक पातळीवर उपलब्ध करणे यावरील संशोधन त्रिस्टे व दिल्लीत चालू आहे. सभासद देशामध्ये प्रयोगशाळा तयार करवून आपल्या गरजेनुसार आवश्यक संशोधन करण्यासाठीचे उत्तेजन संस्थेतर्फे दिले जाते. उत्कृष्ट संशोधन, प्रशिक्षण आणि संशोधन हस्तांतरणासाठीचा एक उत्तम नमुना असा या संस्थेचा नावलौकिक आहे.
औद्योगिक जैवतंत्रज्ञानामध्ये सेल्युलोजपासून जैविक इंधन तयार करण्याचे प्रायोगिक पथदर्शक प्रकल्प संस्थेमध्ये यशस्वी झाले आहेत. यासाठी लागणारी विकरे जीवाणुंपासून वेगळी केली आहेत. किण्व पेशीच्या मदतीने लिग्नोसेल्युलोज व त्यापासून जैवइंधन बनवण्याचे प्रयोग दिल्ली येथील प्रयोगशाळेमध्ये यशस्वी झाले आहेत.
थोडक्यात पिके, कृषि, उद्योग, औषधी विज्ञान, मानवी आजार व रोग अशा सर्व क्षेत्रात जगाबरोबर संशोधन करणे यांसाठी आयसीजीईबी या आंतरराष्ट्रीय संस्थेचे सतत प्रयत्न चालू आहेत.
संदर्भ :
समीक्षक : किशोर कुलकर्णी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.