आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था : (स्थापना १९५६) आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था ही इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर आशिया अँड पॅसिफिक (ESCAP) या संयुक्त राष्ट्र संघातर्फे चालवण्यात येणार्‍या प्रादेशिक पातळीवर काम करणार्‍या शिक्षण, प्रशिक्षण आणि लोकसंख्या विषयीचे संशोधन करणारी संस्था आहे. या संस्थेत त्रेपन्न देश व नऊ सहभागी सभासदांचा समावेश आहे. लोकसंख्या विज्ञान संशोधन आणि प्रशिक्षण देणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे.

मुंबईमध्ये १९५६ साली या संस्थेची स्थापना भारत सरकार, संयुक्त राष्ट्र संघ आणि सर दोराबजी टाटा न्यास यानी संयुक्तपणे केली. प्रारंभी संस्थेचे प्रमुख कार्य आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरण विषयक क्षेत्रीय विश्लेषण करणे असे होते. जुलै १९७० पर्यंत या संस्थेचे नाव Demographic Training and Research Centre (DTRC) असे होते. नंतर १९८५पर्यंत ती International Institute for Population Studies या नावाने कार्यरत होती. १९ ऑगस्ट, १९८५ रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाने या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा (डीम्ड युनिव्हर्सिटीचा) दर्जा दिलाआणि आता असलेले नाव दिले.

जगाच्या अनेक भागात अशा प्रादेशिक संस्था आहेत, परंतु आशिया पॅसिफिक प्रदेशात स्थापन झालेली ही जगातील पहिली संस्था आहे आणि सर्वात अधिक लोकसंख्या असलेल्या भागाला सेवा देते. या संस्थेचे  प्रशासन आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्यातर्फे होते.

प्रशिक्षण व संशोधन याशिवाय ही संस्था शासकीय व अशासकीय संस्थेना सल्ला देण्याचे काम करते. लोकसंख्या आणि आरोग्य क्षेत्रात आशिया पॅसिफिक देशांसाठी संशोधन करणाऱ्या संशोधकांसाठी संस्था महत्त्वाचे केंद्र बनली आहे. गेल्या ५३ वर्षात आफ्रिका, उत्तर अमेरिका आणि आशियामधील या संस्थेतून प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींनी आपापल्या ठिकाणी महत्त्वाच्या पदावर काम केले आहे.

संस्थेचे कार्यक्रम भारत व इतर देशांमध्ये लोकसंख्याशास्त्र आणि त्याच्याशी संबंधित इतर बाबींच्या आणि त्यातल्या त्यात कुटुंबकल्याणविषयक अभ्यासासाठी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षित करणे, आशिया पॅसिफिक देश आणि भारत यांच्या कक्षेतील लोकसंख्या समस्यावर संशोधन करणे, भारतातील व जगातील इतर देशातील लोकसंख्येविषयी तुलनात्मक माहितीचा जागतिक पातळीवर प्रसार करणे असे आहेत. याशिवाय शासकीय खात्यातून संशोधन, प्रशिक्षण, मूल्यमापन करून समाजाची उद्दिष्टे निश्चित करणे यासाठी आवश्यक अभ्यासक्रम, परिषदा, व्याख्याने आणि इतर उपक्रम आखणे असे काम संस्था नियमितपणे करते. संशोधन पत्रिकेतून लेख व पुस्तके प्रसिद्ध करणे, ग्रंथालये उभी करणे आणि माहितीचे स्त्रोत उपलब्ध करणे अशी सहउद्दिष्टेही आता तिच्या कार्याच्या व्याप्तीत समाविष्ट केली आहेत.

सध्या या संस्थेमध्ये लोकसंख्या विषयातील पदव्युत्तर एम.ए. व एम.एस्सी. पदवी, मास्टर ऑफ सायन्स इन बायोस्टॅटिस्टिक्स अँड डेमोग्राफी, मास्टर ऑफ पॉप्युलेशन सायन्स, मास्टर ऑफ फिलॉसॉंफी इन पॉप्युलेशन स्टडीज, पीएच्.डी. इन पॉप्युलेशन स्टडीज, आणि पोस्ट डॉक्टरल संशोधन करण्याची सोय आहे. या सर्व पाठ्यक्रमांकरिता संख्याशास्त्रात पदवी सहसा अनिवार्य आहे. सध्या या संस्थेमध्ये चारशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ती संख्या वाढविण्याचे प्रयत्न चालू आहेत.

दर्जेदार शिक्षणाशिवाय संस्थेमध्ये संशोधन प्रकल्प राबवण्यावर भर देण्यात येतो. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मूल्यमापन व सर्वेक्षण करण्यात संस्थेची ख्याती आहे. या संस्थेने मुद्दाम विकसित केलेली सर्वेक्षण पद्धती जगभरात वापरली जातात. ज्या संस्थांना सर्वेक्षण करायचे आहे, त्यांना ठराविक काळासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ संस्थेतर्फे पुरवले जाते तसेच संमंत्रक सेवा दिली जाते.

क्षेत्रीय जनगणनेसहित अनेक आर्थिक व सामाजिक सर्वेक्षणांचे विश्लेषण या संस्थेमध्ये केले जाते. उदा., २०१४-१५ साली करण्यात आलेले चौथे कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण संस्थेने यशस्वीपणे पूर्ण केले. या सर्वेक्षणावरून राष्ट्रीय पातळीवर कौटुंबिक आरोग्यासाठी राष्ट्रीय पातळीवर किती खर्च करायचा याचे धोरण आखले गेले.संस्थेच्या संशोधनातून प्रसिद्ध केलेल्या ग्रंथांची यादी तिच्या पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे : http://www.iipsindia.org/

संस्थेचा पत्ता : गोवंडी स्टेशन रोड, देवनार, मुंबई, महाराष्ट ४०० ०८८.

संदर्भ :

समीक्षक : विवेक पाटकर