हार्डिमन, डेव्हिड (Hardiman, Devid) : (ऑक्टोबर १९४७). अंकित जनसमुदाय किंवा निम्नस्तरीय जनसमुदाय अभ्यासाची सुरुवात करणाऱ्या संस्थापक सदस्यांपैकी एक आणि इतिहासकार. त्यांनी अंकित जनसमुदाय अध्ययन दृष्टीकोन ‍‍विकसीत करण्यासाठी आयुष्यभर ‍कष्ट घेतले. त्यांचा जन्म पाकिस्तानातील रावळपिंडी येथे झाला. त्यांनी शालेय शिक्षण इंग्लंडमधील डोरसेट येथील शेरबोर्न शाळेत घेतले. १९७० मध्ये त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेतून इतिहास विषयात बी. ए.‍ ही पदवी मिळवली. १९७५ मध्ये  साऊथ एशियन हिस्ट्री या विषयात डी. फील. ही पदवी ससेक्स विद्यापीठातून पूर्ण केली. याच वर्षी त्यांनी ॲन्थोनी लॉ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पीझंट नॅशनलिस्ट ऑफ गुजरात खेड डिस्ट्रिक्ट १९१७ – १९४३‍’ हा शोधप्रबंध ऑस्ट्रेलियात येथे लिहून तो ससेक्स विद्यापीठात डॉक्टरेट पदवीसाठी सादर केला. यासाठी त्यांना रॉबिन जेफ्री व जिम मसेलोस यांचेही सहकार्य मिळाले. त्यांनी भारतात आल्यानंतर आपल्या शोधप्रबंधाच्या निष्कर्षाचे जवळपास अठरा महिने अभ्यास करून १९७७ ते १९७९ या काळात त्या प्रबंधाचे रूपांतर ग्रंथात करण्याचे काम केले. यासाठी त्यांना रंजीत गुहा व ग्यानेद्र पांडे यांचे सहकार्य मिळाले.

हार्डिमन यांच्यावर पाश्चात्य मार्क्सवादी इतिहासकार इ. पी. थॉम्पसन यांच्या नैतिक अर्थव्यवस्थेचा विचार, युजिन जेनोवेस आणि एलिजाबेथ जेनोवेस या अमेरिकन इतिहासकारांच्या अमेरिकेतील गुलामगिरिची चौकट आणि निर्दयी शोषणाविरोधातील विचारांचा प्रभाव होता. याबरोबरच कार्ल मार्क्स, अंतोनियो ग्राम्शी, मिशेल फुको, पिअर बॉरद्यू, डी. डी. कोसंबी, जयरूस बनाजी, पर्लीन फ्रांक यांनी हार्डीमन यांची वैचारिक बैठक तयार होण्यासाठी महत्त्वपूर्ण बौद्धिक संपदा पुरवली. ज्यामुळे त्यांची आत्मदृष्टी व वैचारिक बैठक मजबूत झाली. या सर्व संशोधनाच्या प्रभावातून त्यांना इतिहासकार म्हणून मान्यता प्राप्त होऊन त्यांना आधुनिक भारताच्या इतिहासात विशेषत्व प्राप्त झाले. हार्डिमन यांनी प्रामुख्याने लेइस्टर विद्यापीठ, स्कूल ऑफ ओरिएन्टल, अफ्रिकन स्टडीज लंडन, न्युकॅसल विद्यापीठ व ऑक्सफर्ड विद्यापीठात अशा विविध विद्यापीठांत प्राध्यापक म्हणून काम केले. तसेच १९९६ ते २०१३ या काळात ते वॉरविक विद्यापीठात (इंग्लंड) कार्यरत होते. त्यांना ‘हिलिंग अँड सिव्हिलायझिंग : मिशन मेडिसीन अँड दी ट्रायबल ऑफ वेस्टर्न इंडिया १८८० – १९६०‘ या संशोधन कार्यासाठी वेलकम ट्रस्टकडून २००१ मध्ये शिष्यवृत्ती प्राप्त झाली; लेव्हरहेलम ट्रस्टकडून ‘ए हिस्टरी ऑफ नॉनवॉयलेन्ट रेसिस्टंन्स इन साउथ एशिया‘ या विषयाचे संशोधन करण्यासाठी तीन वर्षांकरीता २०१० मध्ये निधी प्राप्त झाला आहे. सद्या हार्डिमन याच विद्यापीठात मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत असून अंकित जनसमुदायाच्या अभ्यासावर त्यांचे बारीक लक्ष आहे. तसेच ते रॉयल हिस्टोरिकल सोसायटीचे अभ्यासक आहेत.

हार्डिमन हे भारतातील गुजरात राज्यातील सुरत येथे स्थापित असलेल्या सेंटर फॉर सोशल स्टडिज या संशोधन संस्थेचे एक संशोधक होते. त्यांनी १९८३ ते १९८९ या काळात संशोधक म्हणून निरंतर अध्ययन केले. त्यांनी येथे अनेक शासकीय व निमशासकीय प्रकल्पाचे मुल्यांकन केले. या अनुभवामुळे डेव्हिड हार्डिमन या क्षेत्रात सतत कृतीशील राहीले. १९८० च्या दशकात ते सेंटर फॉर स्टडीज इन सोशल  सायन्सेस, कलकत्ता, ऑस्टेलियन राष्ट्रीय विद्यापीठ, इस्टिट्यूट ऑफ कॉमनवेल्थ स्टडीज इन लंडन, प्रिंस्टन विद्यापीठ व मॅनचेस्टर ‍विद्यापीठ अशा विद्यापीठांत अभ्यागत प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.

हार्डिमन हे इतिहासाचे अभ्यासक असले, तरी त्यांचे लेखन हे अंकित जनसमुदायाच्या सामाजिक जीवनावर आधारीत आहे. त्यामुळे त्यांच्या दृष्टिकोनाचा अभ्यास समाजशास्त्रातही केला जातो. त्यांनी वसाहतकालीन दक्षिण आशियाचा इतिहास या विषयाच्या अभ्यासाला प्राधान्य दिले. त्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने वसाहतकालीन भारताचा इतिहास शोधण्यास महत्त्व दिले. त्यांनी जवळपास एक दशक भारताचा वसाहतकालीन इतिहास तपासला. यामध्ये शासनपद्धती, ग्रामीण समाज, सत्ता संबंध, भारतातील स्वातंत्र्य चळवळ, भारतीय राष्ट्रवाद, पर्यावरण व वैद्यकीय इतिहास इत्यादी विषयांवर भर दिला होता.

इसवी सन १९७० च्या शेवटी हार्डिमन हे एका इतिहासकारांच्या गटामध्ये सहभागी झाले. हा गट अंकित जनसमुदायाच्या सामाजिक इतिहासाचा अभ्यास करीत होते. पुढे हा गट ‘अंकित जनसमुदायाचे अध्ययन’ या नावाने ओळखला जाऊ लागला. या गटात प्रामुख्याने १९८१ पासून संपादकीय ग्रंथांची मालिका प्रकाशित केली. ही ग्रंथ मालिका अंकित जनसमुदायाचे अध्ययन या नावे प्रकाशित केली. हार्डिमन हे या ग्रंथ मालिकेच्या आठव्या खंडाचे सहसंपादक होते. त्यानंतर ते संपादक मंडळाचे कायम स्वरूपी सभासद राहिले. त्यामुळे ते या प्रकल्पाचे संस्थात्मक सदस्य मानले गेले.

अंकित जनसमुदाय ही संकल्पना दोन शब्दांची मिळून बनली आहे. त्यांपैकी Subaltern हा शब्द अंतोनियो ग्राम्शीने सर्वप्रथम उपयोगात आणला. Subaltern म्हणजे Subordinate Group या अर्थाने घेतला आहे. त्याचा मराठी अर्थ अंकित जनसमुदाय, दुय्यम जनसमूह, वंचित जनसमूह, निम्नस्तरीय जनसमुदाय असा होतो. त्यास हिंदी भाषेत ‘अधीनस्थ समूह परिप्रेक्ष्य’ असे म्हटले जाते. ज्याचा अर्थ आज्ञा, अधिकार इत्यादीच्या बाबतीत कोणाच्यातरी अधिकाराखाली वा अधीन असणे हा आहे. रंजीत  गुहा या दृष्टीकोनाचे जनक मानले जातात. समाजातील अंकित जनसमुदायाचे अध्ययन करणे, हा प्रमुख हेतू अंकित जनसमुदाय अध्ययनाचा आहे. भांडवली समूहात जसे वर्ग दिसतात, तसे कनिष्ठ जनसमूहात दिसून येत नाहीत. असे अंकित जनसमुदायाचे अध्ययन करणाऱ्या गटाचे मत आहे. या समूहाला पूर्ववर्चस्ववादी वसाहतीचे स्वरूप मोडून काढायचे असून उच्चभ्रू लोकांच्या इतिहासापेक्षा अंकितांचा सामाजिक इतिहास मांडायचा आहे; कारण वसाहत काळात राज्यकर्त्यांचा व राष्ट्रवादी नेत्यांचा इतिहास लिहीला गेला; परंतु अंकित जनसमुदायांचा इतिहास लिहीला गेला नाही. भारतामध्ये या दृष्टीकोनातून विचार पुढे नेणारे प्रमुख विद्वान म्हणून डेव्हिड हार्डीमन, रंजीत गुहा इत्यादी आहेत.

हार्डिमन यांनी भारतातील राष्ट्रवादी चळवळीचे सविस्तर अध्ययन महात्मा गांधी यांची जन्मभुमी असलेल्या गुजरात येथे स्थानिक पातळीवर जाऊन केले. त्या वेळी हार्डिमन यांना असे दिसून आले की, या भागातील गांधीवादी नेते व स्थानिक पातळीवर कार्यरत असलेले शेतकरी कार्यकर्ते यांच्यामधील उद्देश व कार्यक्रम यांमध्ये तफावत आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे असल्याचे हार्डिमन यांच्या लक्षात आले. तसेच त्यांनी ग्रामीण समाजात असलेली सत्ता संरचना समजून घेतली. त्या वेळी त्यांच्या असे लक्षात आले की, ग्रामीण समाजात सावकार हेच श्रेष्ठीजन आहेत व ग्रामीण सत्ता संरचनाही सावकाराच्या भोवती केंद्रीत झाली आहे.

इसवी सन १९२२-२३ या काळात आदिवासी लोकांनी दारु विक्रेत्यांच्या विरोधात जो उठाव केला त्या उठावाचा हार्डिमन यांनी सखोलपणे अभ्यास केला. त्यांनी आपल्या कमिंग ऑफ देवी  या पुस्तकात पश्चिम भारतात सावकारांकडून आदिवासी लोकांच्या होणाऱ्या शोषणाच्या बाबतीत सविस्तर चर्चा केली. ब्रिटिशांनी दारु विक्रीचा एकाधिकार श्रेष्ठीजनांकडे म्हणजेच सावकार व जमीनदार यांच्याकडे सोपविला होता. ते आदिवासी लोकांचे आर्थिक, श्रमिक व शारीरिक शोषण करीत होते; परंतु या काळात आदिवासी लोकांमध्ये देवीवर अंधविश्वास ठेवणारी लाट निर्माण झाली. ही देवी आदिवासी क्षेत्रात संदेश देत फिरत असे. देवीचा संदेश पाळला नाही, तर देवीचा कोप होतो. या भितीमुळे आदिवासी लोक देवीचा संदेश भक्तीभावाने पाळत होते. त्याचा आदिवासी लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडला. आदिवासी लोकांचे शोषण कमी झाले. त्यांच्या जीवनात सुधारणा झाली. देवीच्या संदेशामध्ये प्रामुख्याने दारुचे आणि ताडीचे सेवन न करणे, मांसाहार न करणे, स्वच्छ आणि साधे जीवन जगणे, स्वच्छतेचा अंगीकार करणे, दिवसातून दोन वेळा स्नान करणे, पारशी लोकांशी संबध न ठेवणे, सावकारांकडून कर्ज न घेणे इत्यादी बाबींचा आदिवाशी लोकांवर मोठा सकारात्मक परिणाम झाला. त्यांच्यात व्यापक परिवर्तन घडून आले. अनेक कुप्रथांमधून त्यांना मुक्ती मिळाली. या घडामोडीचा हार्डिमन यांनी ‘देवी चळवळ’ म्हणून अभ्यास केला. त्यांची देवी चळवळीची वैचारिक मांडणी सामाजिक शास्त्रात प्रभावी ठरली.

हार्डिमन यांनी आपल्या अध्ययनासाठी लोकप्रिय आठवणी, कथा व गाण्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात माहिती मिळविली. तसेच स्थानिक पातळीवर जाऊन लोकांबरोबर बोलणे, त्यांच्या सामूहिक कार्यक्रमाला हजर राहणे व त्यांच्या कथा, गाणी शब्दबद्ध करून त्यांच्या नोंदी करणे या माध्यमातून माहिती संकलित केली. त्यांच्या मते, ‘दक्षिण आशियाचा इतिहास ‍लिहीण्यासाठी मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध असून संशोधक हा अध्ययन क्षेत्रात गेल्यावर त्यांना अनेक बाबींची माहिती मिळते, नवीन प्रश्न माहित होतात व स्वत:चे स्वतंत्र संशोधन निर्माण होते‘.

थोडक्यात हार्डिमन यांनी वसाहतकालीन भारताच्या सामाजिक परिस्थितीचा अभ्यास केला आहे. त्यामुळे भारतात अंकित जनसमुदायाचे अध्ययन करणारा एक प्रवाह निर्माण झाला असून जो भारतातील दलित,‍ आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, कामगार व स्त्रियांच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास करू लागला आहे. अर्थात या दृष्टीकोनाच्या काही मर्यादा अभ्यासकांनी अधोरेखित केल्या आहेत. या दृष्टीकोनावर उत्तरसंरचनावादाचा प्रभाव पडला आहे. यामुळे पर्यायी क्रांतिकारी मूलभूत घटक शेवटपर्यंत नाकारला जातो. असे जरी असले, तरी हार्डिमन यांनी भारतीय समाजाचा अभ्यास एका वेगळ्या परीप्रेक्षाचा प्रयोग करत केला. त्यातून आपली वेगळी ओळख निर्माण केली असून ती इतर समाजशास्त्राज्ञापेक्षा वेगळी आहे. भारतीय समाजामध्ये जेथे दलित, आदिवासी, वंचित आणि शेतकरी अधिक आहेत, त्यांचा अभ्यास करण्यासाठी हार्डिमन यांचा दृष्टीकोन अत्यंत मोलाचा आहे.

हार्डिमन यांनी अनेक ग्रंथांचे लेखन केले असून त्यांनी या लेखनातून सामाजिकशास्त्रात नवीन विचार प्रवाह विकासीत केला. त्यांचे काही महत्त्वपूर्ण ग्रंथ पुढील प्रमाणे आहेत : दी क्वाईट इंडिया मूव्हमेंट इन गुजरात, १९८०; पिझन्ट नॅशनॅलिस्ट्स ऑफ गुजरात : खेडा डिस्ट्रिक्ट, १९१७ – १९३४, १९८१; दि कमिंग ऑफ दि देवी : आदिवासी असेर्शन इन वेस्टर्न इंडिया, १९८७; पिझन्ट रेसिस्टंस इन इंडिया १८५८ – १९१४, १९९२; फिडिंग दि बनिया : पिझन्ट अँड असुरर्स इन वेस्टर्न इंडिया, १९९६; गांधी इन हिज टाईम अँड अव्हर्स : दी ग्लोबल लेगॅसी ऑफ हिज आयडियाज, २००३; हिलिंग बॉडीज, सेव्हिंग सोल : मेडिकल मिशन इन एशिया अँड आफ्रिका, २००६; हिस्टरीज फॉर दी सबऑर्डिनेटेड, २००६; मिशनरीज अँड देअर मेडिसीन : ए ख्रिश्चन मॉडर्निटी फॉर ट्रायबल इंडिया, २००८; मेडिकल मार्जिनॅलिटी इन साउथ एशिया : सिच्युएटिंग सबाल्टर्न थेरप्यूटिक्स, २०१२; दी नॉनवॉयलेन्ट स्ट्रगल फॉर इंडियन फ्रिडम, १९०५ – १९१९, २०१८. यांशीवाय त्यांचे अनेक महत्त्वपूर्ण शोधनिबंध प्रथितयश ‍नियतकालीकांमध्ये प्रसिद्ध  झाले आहेत.

संदर्भ :

  • धनागरे, डी. एन., संकल्पनाचे विश्व आणि सामाजिक वास्तव, पुणे, २००५.
  • गोपाळ गुरू, वर्चस्व आणि सामाजिक चिकित्सा, पुणे, २०१५.
  • गावस्कर, महेश (संपा.), इतिहास लेखन मीमांसा : निवडक समाज प्रबोधन पत्रिका, खंड – १, मुंबई, २०१०.
  • Hardiman, David, Feeding the Baniya : Peasants and Usurers in Western India, 2000.
  • Hardiman, David, The coming of the Devi : Adivasi assertion in western India, 1987.

समीक्षक : प्रियदर्शन भवरे