अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील एक राज्य. संयुक्त संस्थानांच्या उत्तर भागात असलेल्या या राज्याच्या उत्तरेस नॉर्थ डकोटा राज्य, पूर्वेस मिनेसोटा व आयोवा राज्ये, दक्षिणेस नेब्रॅस्का, तर पश्चिमेस वायोमिंग व माँटॅना ही राज्ये आहेत. राज्याच्या आग्नेय भागात साउथ डकोटाची आयोवा राज्याशी असलेली सरहद्द बिग सू नदीने, तर नेब्रॅस्का राज्याशी असलेली काही सरहद्द मिसूरी नदीने निर्माण केलेली आहे. देशाच्या पूर्व-पश्चिम विस्ताराचा विचार करता भौगोलिक दृष्ट्या साउथ डकोटा हे राज्य अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या बरोबर मध्यावर आहे. सामान्यपणे आयताकृती असलेल्या या राज्याचा पूर्व-पश्चिम विस्तार ६१० किमी. व उत्तर-दक्षिण विस्तार ३९५ किमी. आहे. राज्याचे एकूण क्षेत्रफळ १,९६,५४१ चौ. किमी. व लोकसंख्या ८,८४,६५९ (२०१९ अंदाज) होती. पिअर (लोकसंख्या १३,६४६–२०१०) हे राज्याच्या राजधानीचे ठिकाण आहे. ʼसनशाइन स्टेट‘ या टोपणनावाने या राज्याला ओळखले जाते.
भूवर्णन : प्राकृतिक दृष्ट्या साउथ डकोटाची विभागणी मुख्य तीन प्रदेशांत करता येते. (१) पूर्वेकडील सखल प्रेअरी प्लेन्स, (२) पश्चिमेकडील ग्रेट प्लेन्स आणि (३) ब्लॅक हिल्स. पिअरी हिल्स या नावाने ओळखला जाणारा ईशान्येकडील टेकड्यांचा प्रदेश वगळता पूर्वेकडील ‘प्रेअरी प्लेन्स’ हा हिमानी क्रियेतून निर्माण झालेला सखल मैदानी प्रदेश आहे. हा संपूर्ण प्रदेश लोम मृदेने व्यापला आहे. येथील गवताळ प्रदेशात उंच गवत आढळते. येथून मका व इतर अन्नधान्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर मिळते. यातील जेम्स नदीचे खोरे या उत्पादनांसाठी विशेष महत्त्वाचे आहे. राज्यातील सर्वांत कमी उंची (२९३ मी.) ईशान्य भागातील बिग स्टोन सरोवराजवळ आहे.
पश्चिमेकडील ग्रेट प्लेन्स या प्राकृतिक विभागात हिमानी क्रिया आढळत नाही. यात उंच ब्यूट, ओबडधोबड खोल कॅन्यन, सपाट पठारी भाग (टेबल लँड) व उत्खातभूमी (बॅडलँड्स) प्रदेश आढळतात. प्रेअरी प्लेन्स व ग्रेट प्लेन्स या प्रदेशांदरम्यानचा भूमिस्वरूपाच्या आणि जलवायुमानाच्या दृष्टीने जोडणारा दुवा म्हणजे ‘मिसूरी हिल्स’ प्रदेश होय. पिअरी मैदानी प्रदेशापेक्षा मिसूरी हिल्स प्रदेश सामान्यपणे ओबडधोबड व शुष्क आहे. अन्नधान्य उत्पादनाच्या दृष्टीने हा प्रदेश विशेष उपयुक्त नसला, तरी गवताळ प्रदेशामुळे पशुपालनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मिसूरी नदीच्या काठालगत कृषी प्रदेश आहे. शतकानुशतके झालेल्या गाळाच्या संचयनामुळे मिसूरी खोऱ्यात गम्बो ही सुपीक मृदा आढळते. ग्रेट प्लेन्स प्रदेश एकसारखा आढळत नसला, तरी तेथे शेल खडकांच्या विदारणातून निर्माण झालेला तपकिरी व करड्या तपकिरी मृदेने हा प्रदेश व्यापला आहे. आखूड ग्रामा, बफालो व वेस्टर्न व्हीटग्रास, तसेच अन्नधान्य पिकांच्या वाढीच्या दृष्टीने हा भाग अनुकूल आहे. राज्याच्या नैर्ऋत्य भागात वायोमिंग सरहद्दीवर ब्लॅक हिल्स हा घुमटाकार पर्वतीय प्रदेश आहे. येथील हार्ने पीक (उंची २,२०७ मी.) हे सर्वाधिक उंचीचे ठिकाण आहे. ब्लॅक हिल्सच्या पूर्वेस उत्तरेकडील शाइआन व दक्षिणेकडील व्हाइट व बॅड या नद्यांदरम्यानच्या खोऱ्यात उत्खात भूमीप्रदेश आहे. वारा, वाहते पाणी या कारकांच्या कार्यामुळे हा भाग निर्माण झालेला आहे.
राज्यात सोने, चांदी, फेल्स्पार, अभ्रक, वैदूर्य, युरेनियम, चुनखडक, ग्रॅनाइट, मँगॅनीज, लिग्नाइट, कोळसा, बेंटोनाइट, चिकणमाती, वाळू, रेती ही खनिजद्रव्ये आढळतात. ब्लॅक हिल्स प्रदेशांत सोन्याचे फार मोठे साठे आहेत.
राज्याच्या साधारण मध्यातून दक्षिणेस व आग्नेयीस वाहणाऱ्या मिसूरी नदीमुळे राज्याचे पूर्व व पश्चिम असे दोन भाग झाले आहेत. पूर्व भागाचे जलवाहन बिग सू, व्हर्मिलिअन व जेम्स या मिसूरीच्या उपनद्यांनी केले आहे. हिमानी क्रियेतून निर्माण झालेल्या खोऱ्यांमधून या नद्या दक्षिणेस वाहत जाऊन मिसूरीला मिळतात. पश्चिम भागाचे जलवाहन ग्रँड, मोर, शाइआन, बॅड व व्हाईट या मिसूरीच्या पूर्ववाहिनी उपनद्यांनी केलेले आहे.
साउथ डकोटामध्ये अनेक लहानमोठी नैसर्गिक सरोवरे आहेत. मिसूरी नदीच्या पूर्वेकडील सरोवरे प्रामुख्याने प्राचीन हिमानी क्रियेतून निर्माण झालेली असून या सरोवरांना वसंत ऋतूत भरपूर पाणीपुरवठा होतो, तर शरद ऋतूत ती कोरडी पडतात. मिसूरी नदीतील कृत्रिम सरोवरांनाही फार महत्त्व आहे. पूरनियंत्रण, जलसिंचन, विद्युतनिर्मिती इत्यादी उद्देशांनी मिसूरी नदीवर बांधलेल्या बिग बेंड, फोर्ट रांदल, ओआहे, गॅव्हिन्स पॉईंट या धरणांमुळे मोठमोठी सरोवरे निर्माण झालेली आहेत. सरोवरांच्या परिसरात समृद्ध वन्य प्राणिजीवन आढळते. तसेच ही सर्व प्रकारची सरोवरे प्रमुख पर्यटनस्थळे बनली आहेत. याशिवाय राज्यात शेकडो लहानलहान धरणे बांधण्यात आलेली आहेत.
साउथ डकोटाचे हवामान समशीतोष्ण, परंतु खंडीय प्रकारचे आहे. खंडांतर्गत स्थानामुळे उन्हाळ्यातील व हिवाळ्यातील तापमानात बरीच तफावत आढळते. सातत्याने वाहणारे वारे, कमी वृष्टिमान व कमी आर्द्रता ही येथील हवामानाची वैशिष्ट्ये आहेत. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५० सेंमी. असून पाऊस प्रामुख्याने वसंत ऋतूत व उन्हाळ्यात पडतो. राज्यातील एकूण ६,५५,१८६ हेक्टर क्षेत्र अरण्यांखाली असून त्यांपैकी ३,९६,१८७ हेक्टर क्षेत्र राष्ट्रीय अरण्याखाली आहे. कॉटनवूड, विलो, पाईन, एल्म, स्प्रूस, सीडार, ओक, एल्डर, ॲस्पेन हे वृक्षप्रकार येथे आढळतात. कॉयॉट, हरीण, बॉबकॅट, बीव्हर, रॅकून, प्रेअरी डॉग, बॅजर, मस्करॅट, वीझल इत्यादी प्राणी येथे आढळतात.
इतिहास : साउथ डकोटामधील मानवी इतिहास सुमारे २५,००० वर्षे मागे जातो. मानवजातिविज्ञान तज्ज्ञांच्या मते, अगदी पहिल्यांदा बेरिंग येथील भूभागमार्गे आशियाई लोक या नव्या जगात आले असावेत. त्यांनी येथे शिकारी समाज विकसित केला. इ. स. पू. ५००० पर्यंत त्यांचे वास्तव्य येथे होते. त्यानंतर मात्र ते या भागातून नाहीसे झाले. अशाप्रकारे एकामागून एक असे इतर भटके शिकारी येथे आले व गेले. इ. स. ५०० च्या दरम्यान अर्धभटक्या लोकांचे सुमारे तीन शतके येथील पिअरी मैदानात वास्तव्य होते. यूरोपियनांचे आगमन होण्यापूर्वी या प्रदेशात डकोटा (सू) इंडियन लोक भटकत असत; त्यावरून या राज्याला डकोटा हे नाव पडले असावे. पिअर येथे एक शिशाचे तबक सापडले. त्यावरून असे आढळते की इ. स. १७४२-४३ मध्ये फ्रेंच समन्वेषकांनी या प्रदेशाला भेट दिली होती. त्यामुळे त्यांनी या प्रदेशावर फ्रान्सचा हक्क सांगितला होता.
इसवी सन १७६३ मध्ये मिसिसिपी नदीच्या पश्चिमेकडील संपूर्ण फ्रेंच भूमी स्पेनच्या ताब्यात आली. नेपोलियन युद्धकाळात फ्रान्सने
पुन्हा याचा ताबा घेईपर्यंत यावर स्पेनची सत्ता होती. इ. स. १८०३ मध्ये ‘लुइझिआना परचेस’चा एक भाग म्हणून फ्रान्सने ही भूमी संयुक्त संस्थानांना विकली. इ. स. १८०४ मध्ये मिसूरी नदीला अनुसरून वायव्येस पॅसिफिककडे गेलेल्या मेरीवदेर लेविस व विल्यम क्लार्क यांच्या सफरीचे साउथ डकोटामध्ये सात आठवडे वास्तव्य होते. इ. स. १८५६ मध्ये मिसूरी नदीकाठावर रांदल किल्ला बांधण्यात आला. तोपर्यंत केवळ यूरोपियन फासेपारधी व फरचे व्यापारी येथे सक्रीय होते. इ. स. १८६१ मध्ये नॉर्थ व साउथ डकोटा मिळून एकत्रित असा ‘डकोटा प्रदेश’ होता. त्या वेळी केवळ आग्नेय भागातच वस्ती होती; परंतु इ. स. १८७५-७६ मध्ये सोन्याच्या खाणींचा शोध लागल्यानंतर मात्र येथील लोकसंख्या वेगाने वाढली. इ. स. १८८९ मध्ये नॉर्थ व साउथ डकोटा असे विभाजन होऊन २ नोव्हेंबर १८८९ रोजी चाळीसावे राज्य म्हणून साउथ डकोटा संयुक्त संस्थानांत समाविष्ट झाले. इ. स. १९०४ मध्ये पिअर हे राज्याच्या राजधानीचे ठिकाण म्हणून कायम करण्यात आले.
आर्थिक स्थिती : साउथ डकोटामध्ये अगदी सुरुवातीला ज्या गोऱ्या लोकांच्या वसाहती होत्या, त्यांपैकी मिसूरी नदीच्या पूर्वेकडे राहणाऱ्यांचा शेती हा व्यवसाय होता, तर नदीच्या पश्चिमेस राहणाऱ्या लोकांचे पशुपालन व खाणकाम हे व्यवसाय होते. राज्यातील बहुतांश भूमी शेती व गुरेचराईसाठी वापरली जाते. साउथ डकोटाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषी व्यवसायावर आधारित असून त्या अनुषंगानेच कारखानदारी, व्यापार व सेवा व्यवसाय विकसित झाले आहेत. गहू, मका, राय, अंबाडी, अल्फाल्फा ही येथील प्रमुख पिके आहेत. राज्यातील शेताचा सरासरी आकार ५५० हेक्टरांचा आहे (२०००). पिकांच्या उत्पन्नापेक्षाही प्राणिज उत्पादने व मांस प्रक्रिया या व्यवसायांपासून अधिक रोकड उत्पन्न मिळते. गुरे व डुकरांच्या पैदाशीमध्ये राज्य अग्रेसर आहे.
कृषी उत्पादनांशी निगडित असे येथील उद्योग आहेत. मांसप्रक्रिया व डबाबंदी व्यवसाय चांगल्या प्रकारे विकसित झाला आहे. सू
फॉल्स हे मांस डबाबंदी व वित्तीय केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. राज्यात खाद्यपदार्थांचा ठोक व्यापार चालतो. ब्लॅक हिल्समधील लीडजवळ असलेली होमस्टेक खाण ही देशातील सोने उत्पादनातील अग्रेसर खाण आहे. अलीकडच्या काळात येथील सोने उत्पादनात घट झालेली आहे. मिसूरी नदीवर चार ठिकाणी धरणे बांधली असून जलविद्युतनिर्मितीचे ते प्रमुख स्रोत आहेत. राज्यात दोन आंतरराज्य महामार्ग व अनेक लोहमार्ग आहेत. आकर्षक सृष्टीसौंदर्य, सरहद्दभागातील चालीरीती व परंपरा, ब्लॅक हिल्समधील मनोरंजनाच्या सुविधा इत्यादींशी पर्यटन व्यवसाय निगडित आहे.
लोक व समाजजीवन : आद्य समाजजीवनातील कला, परंपरा, संस्कृती राज्यभर आढळते. राज्यातील आप्रवासी प्रामुख्याने नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, जर्मनी व रशियातून आलेले आढळतात. येथील इंडियन हे मूळ डकोटा इंडियनांचे वंशज असून त्यांचे आजचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण ७ टक्के आहे. बिगर गोऱ्या लोकांमधील हा सर्वांत मोठा गट आहे. ल्यूथरन, रोमन कॅथलिक, मेथडिस्ट, ख्रिस्ती युनायटेड चर्च, प्रेसबिटेरियन, बॅप्टिस्ट व एपिस्कोपलिअन या धार्मिक गटांचे लोक येथे आहेत. निम्म्यापेक्षा अधिक लोक ग्रामीण भागात राहतात. अपुऱ्या आर्थिक संधीमुळे मोठ्या संख्येने तरुण वर्ग इतर राज्यांकडे गेलेला दिसतो.
उच्च व व्यवसाय शिक्षण देणाऱ्या अनेक सार्वजनिक आणि खाजगी शैक्षणिक संस्था राज्यात आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ साउथ डकोटा, व्हर्मिलिअन (१८६२), साउथ डकोटा स्टेट युनिव्हर्सिटी, ब्रुकिंग्ज(१८८१), साउथ डकोटा स्कूल ऑफ माइन्स अँड टेक्नॉलॉजी, रॅपिड सिटी (१८८५), नॉर्दर्न स्टेट युनिव्हर्सिटी, ॲबरडीन (१९०१), ब्लॅक हिल्स स्टेट युनिव्हर्सिटी, स्पिअरफिश (१८८३), डकोटा स्टेट युनिव्हर्सिटी, मॅडिसन (१८८१) या येथील प्रमुख उच्च शिक्षण संस्था आहेत.
ब्लॅक हिल्समधील एका ग्रॅनाइटी कड्यात मौंट रशमोअर हे राष्ट्रीय स्मारक असून त्यात जॉर्ज वॉशिंग्टन, टॉमस जेफर्सन, थीओडोर रूझवेल्ट व अब्राहम लिंकन या माजी राष्ट्राध्यक्षांचे पुतळे कोरण्यात आले आहेत. ब्लॅक हिल्समधीलच उन्हाळी रंगमंदिरांची जगभर ख्याती आहे. मौंट रशमोअर, वुइंड केव्ह व बॅडलँड्स या राष्ट्रीय उद्यानांचे तसेच जेवेल केव्ह या राष्ट्रीय स्मारकांचे व्यवस्थापन नॅशनल पार्क सर्व्हिस विभागाकडून पाहिले जाते. सू फॉल्स, रॅपीड सिटी, ॲबरडीन, वॉटरटाउन, ब्रुकिंग्ज, मिटचेल, पिअर, यांक्टन, ह्यूरॉन, व्हर्मिलिअन, स्पिअरफिश, मॅडिसन, स्टर्गिस ही राज्यातील प्रमुख शहरे आहेत. त्यांपैकी सू फॉल्स (लोकसंख्या १,२३,९७५–२०००) हे सर्वांत मोठे शहर आहे.
समीक्षक : ना. स. गाडे