आ.१. विद्युत धुलाई यंत्र : अंतर्गत रचना

दैनंदिन जीवनामध्ये घरोघरी कपडे धुण्यासाठी व सुकविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आणि विजेवरती चालणाऱ्या यंत्राला विद्युत धुलाई यंत्र असे म्हणतात. १९०६ मध्ये अल्वा जे. फिशर यांनी विद्युत धुलाई यंत्राची रचना केली. प्रक्षालकमिश्रित (Detergent) पाण्यामध्ये कपडे भिजविणे, कपड्यांवर पाण्याचा मारा करणे, कपडे खळखळून धुणे, कपडे पिळणे आणि सुकविणे यांसारख्या क्रिया विद्युत धुलाई यंत्राच्या साहाय्याने सहज करता येतात.

विद्युत धुलाई यंत्राचे प्रकार : विद्युत धुलाई यंत्राचे तीन प्रकारांत वर्गीकरण केले जाते : (१) सामान्य विद्युत धुलाई यंत्र, (२) अर्धस्वयंचलित विद्युत धुलाई यंत्र आणि (३) पूर्ण स्वयंचलित विद्युत धुलाई यंत्र.

() सामान्य विद्युत धुलाई यंत्र : रचना : सामान्य विद्युत धुलाई यंत्राची रचना आ. २ मध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी साधी असते. या यंत्रामध्ये प्लॅस्टिकची एक टोपली (Tub) असते. या टोपलीमध्ये धुलाई चाक असून ते मोटरच्या दंडाला (Shaft) जोडलेले असते. या रचनेमध्ये पाणी खळखळते राहण्यासाठी घुमटाकार चकती बसविलेली असते. कपडे धुण्यासाठी स्पंदनिर्मिती तत्त्वाचा वापर करत असल्यामुळे या चकतीला स्पंदकारक (Pulsater)  म्हणतात.

काही धुलाई यंत्रामध्ये पाण्यामध्ये कपडे घुसळण्यासाठी नळीच्या आकाराचे पिंप (Tubular type drum) वापरतात. या पिंपाच्या आतमध्ये घुसळण पाती (Agitating vanes) बसविलेली असतात. यामध्ये पिंप फिरविण्यासाठी चरखी पट्टा (Pulley belt) आणि मोटरचा उपयोग केला जातो. काही धुलाई यंत्रामध्ये दंडगोलाकृती  टोपलीमध्ये तळाशी छिद्रित रवी (Agitator) बसविलेली असते आणि ती मोटरला जोडलेली असते. मोटर सुरू करताच छिद्रित रवी फिरू लागल्यामुळे पाण्यात कपडे घुसळले जातात आणि कपड्यातील मळ सुटा होऊ लागतो. काही धुलाई यंत्रामध्ये कपड्यातील मळ निघण्यासाठी पाण्यात बुडबुडे निर्माण करण्याची व्यवस्था केलेली असते.

आ. २. सामान्य विद्युत धुलाई यंत्र : रचना

सामान्य धुलाई यंत्रामध्ये कालदर्शक नसल्यामुळे हे यंत्र स्वयंचलित नसते. वापरकर्त्याच्या इच्छेनुसार हे यंत्र चालू किंवा बंद करता येते. सुधारित प्रकारच्या विद्युत धुलाई यंत्रामध्ये कालदर्शकाचा वापर केला जातो. कालदर्शकाने नियंत्रित केलेल्या वेळेनुसार विद्युत पुरवठा आपोआप बंद केला जातो.

कार्यपध्दती :

  • धुलाई यंत्राच्या टोपलीमध्ये पाणी आणि कपडे धुण्याची पावडर टाकून प्रथम धुलाई यंत्र चालू करतात. त्यामुळे पाण्यामध्ये प्रक्षालक पावडर मिसळते.
  • आता धुलाई यंत्राचा विद्युत पुरवठा बंद करून त्यामध्ये उत्पादकाच्या सूचनेनुसार कपडे धुण्यास टाकतात.
  • टोपलीचा दरवाजा घट्ट बंद करून धुलाई यंत्राचा विद्युत पुरवठा चालू करतात.
  • विद्युत पुरवठा चालू झाल्यामुळे मोटर, स्पंदकारक फिरू लागतात. त्यामुळे पाण्यामध्ये कपडे घुसळले जातात आणि मळ सुटा होऊन कपडे स्वच्छ होतात.
  • कपडे स्वच्छ झाल्यानंतर यंत्राचा विद्युत पुरवठा बंद करतात.
  • शेवटी टोपलीमधील धुतलेले कपडे सुकविण्यास टाकतात.
आ. ३. अर्धस्वयंचलित विद्युत धुलाई यंत्र

() अर्धस्वयंचलित विद्युत धुलाई यंत्र : रचना : अर्धस्वयंचलित विद्युत धुलाई यंत्र हे पूर्णपणे स्वयंचलित नसल्यामुळे यामध्ये काही प्रक्रियेमध्ये मानवी सूचनांचा सहभाग आवश्यक असतो. उदा., कालदर्शकाचा वेळ नियोजित करणे तसेच संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वापरकर्त्याने सभोवताली असणे आवश्यक असते. या यंत्रामध्ये दोन टोपल्या असतात. एका टोपलीचा उपयोग कपडे धुण्यासाठी तर दुसऱ्या टोपलीचा उपयोग कपडे सुकविण्यासाठी केला जातो दोन्ही टोपल्यांसाठी एकच मोटर असते, तर काही यंत्रामध्ये प्रत्येक टोपलीसाठी स्वतंत्र मोटर वापरतात.

कार्यपध्दती : या यंत्रामध्ये प्रत्येक प्रक्रिया टप्प्यामध्ये आवश्यक सूचना मानवी स्वरूपात दिल्या जातात. यामध्ये वापरकर्त्याला धुलाई टोपलीमध्ये पाणी भरावे लागते, परंतु स्वयंचलित धुलाई यंत्राप्रमाणे हे यंत्र पाण्याच्या पातळीबद्दल कोणतीही सूचना देत नाही. यानंतर तुम्हाला प्रक्षालक पेटीमध्ये प्रशालक ठेवून पाणी भरावे लागते. सर्व सूचना नियंत्रक फलकावरती दिल्या जातात. वापरकर्ता पूर्वभिजवणीचा (Presoak) पर्याय निवडू शकतो. धुण्याच्या मुख्य प्रक्रियेपूर्वी कपडे भिजविल्यामुळे त्यावरचे डाग कमकुवत होतात आणि कपडे स्वच्छ होतात. अर्धस्वयंचलित धुलाई यंत्रामध्ये धुलाईचे मुख्यत: तीन प्रकार असतात : (१) सौम्य, (२) सामान्य आणि (३)‍ कठिण. वापरकर्ता या तिन्ही प्रकारांपैकी कोणताही पर्याय निवडू शकतो आणि त्याचसोबत धुलाई वेळ निश्चित करू शकतो. यंत्र निर्धारित कालावधीत धुलाई प्रक्रिया पूर्ण करते आणि त्यानंतर पुढील सूचना आवश्यक असते. धुलाई प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गढूळ पाणी बदलण्याची किंवा पुनर्वापराची निवड करता येते. जर पाणीटंचाई असेल तर पुन्हा तेच पाणी वापरले जाते. पुढील प्रक्रिया कपडे सुकविण्याची असते. अर्धस्वयंचलित यंत्रामध्ये कपडे सुकविण्यासाठी स्वतंत्र विभाग असतो. या विभागात ओले कपडे ठेवले जातात आणि सुकविण्यासाठी ते फिरविले जातात.

() पूर्ण स्वयंचलित विद्युत धुलाई यंत्र : रचना : स्वयंचलित विद्युत धुलाई यंत्रामध्ये मळकट कपडे धुणे आणि सुकविणे या दोन्ही क्रिया आपोआप केल्या जातात. या यंत्रामध्ये आत आणि बाहेर अशा दोन स्टीलच्या टोपल्या असतात.आतील टोपलीला छिद्रित रवी असते जिच्या साहाय्याने आतील टोपलीमधील पाणी बाहेरील टोपलीमध्ये काढले जाते. स्वयंचलित विद्युत धुलाई यंत्रामध्ये कपडे धुताना ते एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे सरकवण्यासाठी कोणत्याही बाह्य मदतीची गरज लागत नाही. या यंत्राचे कार्यतत्त्व अत्यंत प्रभावी असते, परंतु नवशिक्यासाठी सर्व प्रक्रिया जाणून घेणे थोडे अवघड जाते.

कार्यपध्दती : कपडे धुण्याची संपूर्ण प्रक्रिया धुणे, स्वच्छ धुणे, कपडे फिरवणे आणि कपडे सुकवणे या चार टप्प्यांत केली जाते. प्रत्येक टप्प्यात यंत्राकडून आपण सुरुवातीला भरलेले प्रक्षालक सोडले जाते. तसेच प्रत्येक टप्प्यात नवीन पाणी भरले जाते आणि खराब पाणी काढून टाकले जाते. पहिल्या टप्प्यामध्ये (धुणे) प्रक्षालकाचा उपयोग करून एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे जाणारे कपडे धुतले जातात. दुसऱ्या टप्प्यात (स्वच्छ धुणे), साबणयुक्त पाणी काढून टाकले जाते आणि शुद्ध पाणी सोडले जाते, जे कपड्यांमधून साबणांचे कण काढून टाकते. तिसऱ्या टप्प्यामध्ये साबणाचे पाणी काढले जाऊन नवीन पाणी भरले जाते. तसेच या टप्प्यात यंत्र द्रुतगतीने फिरते आणि कपड्यांमधून उर्वरित साबण काढून टाकते. शेवटच्या टप्प्यामध्ये (कपडे सुकविणे) कपडे बाहेर काढले जातात आणि पूर्णपणे सुकविण्यासाठी टाकली जातात.

आ. ४.

संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपणास कोणतीही प्रक्रिया घडवून आणण्यासाठी बाहेरून मदत करण्याची गरज नसते. एकदा कपडे टाकून यंत्र सुरू केल्यानंतर कपडे धुण्याची आणि सुकविण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वापरकर्त्याला जास्तीचे कपडे जमा करण्यासाठी यंत्र बंद करून झाकण उघडता येत नाही. यंत्रामध्ये कपडे धुण्यासाठी तापकाचा वापर करून गरम पाणी वापरता येते. संपूर्ण प्रक्रियेचा प्रत्येक टप्पा स्वयंचलितपणे निवडला जात असल्याने या यंत्राला स्वयंचलित विद्युत धुलाई यंत्र म्हणतात.

पूर्ण स्वयंचलित विद्युत धुलाई यंत्राचे दर्शनी भार (Front load) आणि ऊर्ध्व भार (Top load) असे रचनात्मक दोन प्रकार असतात. दर्शनी भार धुलाई यंत्रामध्ये झाकण समोरील बाजूला असते आणि त्यामध्ये काच बसविलेली असते तर ऊर्ध्व भार धुलाई यंत्रामध्ये झाकण वरील बाजूला असते.

विद्युत धुलाई यंत्र वापरताना घ्यावयाची काळजी :

१. विद्युत पुरवठा तार सुस्थितीत असल्याची (उदा., उंदरांकडून कुरतडली नसल्याची) खात्री करून घ्यावी.

२. विद्युत धुलाई यंत्राच्या तळाच्या पात्रामध्ये (Plate) उंदीर, झुरळे इ. जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.

३. उत्पादकाने सुचविलेलेच कपडे धुण्यासाठी धुलाई यंत्राचा वापर करावा अन्यथा कपडे फाटू शकतात.

४.यंत्राच्या टोपलीमध्ये उत्पादकाने सुचविलेल्या प्रमाणाइतकेच कपडे स्वच्छ करण्यासाठी ठेवावे. प्रमाणापेक्षा जास्त कपड्यामुळे मोटर अतिभारावरती चालू होऊन तिच्यामध्ये बिघाड होऊ शकतो.

५. यंत्राच्या टोपलीमध्ये पाणी पातळी निर्देशाइतकेच पाणी भरावे. तसेच या टोपलीमध्ये पाणी नसताना यंत्र चालू करू नये.

६. शक्यतो धुलाई यंत्र ठेवलेली खोली हवेशीर असावी.   

पहा : गृहोपयोगी उपकरणे.

 संदर्भ :

• Bali, S. P. Consumer Electronics Pearson Production.

• Bidar, Jain Inventions we use at home G. S. Production.

• Carry, James; Carry, Morris Home maintenance for Dummies Wiley Production.

• Shaha, Prakash Electrician Trade Theory Saraswati Book Company, Pune.

• Soni, G.S. Mechanical experiments and workshop practices I. K. International production.

समीक्षण : दिपक बनकर