ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स या दोन देशांना अलग करणारी, तसेच इंग्लिश खाडी आणि उत्तर समुद्र (नॉर्थ सी) यांना जोडणारी सामुद्रधुनी. या सामुद्रधुनीच्या सामान्यपणे वायव्येस ग्रेट ब्रिटन, आग्नेयीस फ्रान्स, नैर्ऋत्येस इंग्लिश खाडी आणि ईशान्येस उत्तर समुद्र आहे. या सामुद्रधुनीमुळे यूरोप खंडाच्या मुख्य भूमीपासून ग्रेट ब्रिटन वेगळा झाला आहे. सामुद्रधुनीची रुंदी ३० ते ४० किमी. आणि खोली ३५ ते ५५ मीटर आहे.

पूर्वी या सामुद्रधुनीच्या जागी जमीन होती. याचा अर्थ इंग्लंड यूरोप खंडाला जोडलेला होता. सांप्रत सामुद्रधुनीचा भूभाग चॉक खडकांनी बनलेला आहे. चॉक हा सापेक्षत: मऊ चुनखडक असून त्याचा सहज भुगा होतो. या भूभागाचे अपक्षरण (झीज) होऊन त्या जागेवर सामुद्रधुनी निर्माण झाली असावी, अशी शक्यता वर्तविली जाते. या सामुद्रधुनीच्या प्रामुख्याने ब्रिटनच्या बाजूवर पांढऱ्या रंगाच्या चॉक खडकाचे कडे स्पष्टपणे दिसतात. फ्रान्सच्या किनाऱ्यावरही असे कडे आहेत. झिजेमुळे हे कडे मागेमागे हटत असल्याचे आढळते.

टेम्स (इंग्लंड) ऱ्हाईन व उत्तर यूरोपातील अनेक नद्या उत्तर समुद्राला मिळतात. सुमारे ४,२५,००० वर्षांपूर्वीच्या प्लाइस्टोसीन हिमयुग काळात स्कँडिनेव्हिया ते स्कॉटलंड यांदरम्यान हिमाचा बांध (धरण) निर्माण झाला होता. त्यामुळे या बांधाच्या वरच्या भागात विस्तृत सरोवर निर्माण होऊन पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्या सरोवरातील अतिरिक्त पाणी ज्या मृदु भूभागावरून वाहू लागले, त्या ठिकाणी दरी निर्माण झाली. तीच डोव्हर सामुद्रधुनी होय. इ. स. २००७ मध्ये झालेल्या संशोधनानुसार प्राचीन काळी आलेल्या दोन पुरांमुळे डोव्हर सामुद्रधुनीची निर्मिती झाली आहे. त्यांपैकी एक पूर म्हणजे वर उल्लेखित सुमारे ४,२५,००० वर्षांपूर्वीचा होय. त्यानंतर असाच पूर सुमारे २,२५,००० वर्षांपूर्वी आला होता. या दोन्ही पुरांच्या वेळी टेम्स, शेल्ड्रट, ऱ्हाईन, म्यूज इत्यादी नद्या डोव्हर सामुद्रधधुनीच्या मध्यभागी असलेल्या अरुंद व खोल पात्रातून वाहत होत्या. ग्रहीय वाऱ्यांमुळे या सामुद्रधुनीतील पाण्याचा मुख्य प्रवाह नैर्ऋत्येकडून ईशान्येकडे वाहत येतो; परंतु ईशान्येकडून वाहत येणाऱ्या दमदार वाऱ्यांमुळे तो प्रवाह परत फिरविला जातो.

डोव्हर सामुद्रधुनीमार्गे जाणारा जलमार्ग हा जगातील गजबजलेल्या सागरी मार्गांपैकी एक आहे; परंतु त्यातून केली जाणारी वाहतूक ही १९७७ मध्ये घालून दिलेल्या नियमावलींचे काटेकोर पालन करून करावी लागते. वाहतूक सुरळीत चालावी यासाठी रात्रंदिवस या मार्गावर गस्त घातली जाते. अटलांटिक महासागर ते उत्तर समुद्र आणि बाल्टिक समुद्र यांदरम्यानची सर्व वाहतूक याच मार्गाने केली जाते; कारण उत्तरेकडील स्कॉटलंडला वळसा घालून उत्तर समुद्राकडे जाणारा जलमार्ग अधिक अंतराचा आणि धोकादायक आहे. ही संपूर्ण सामुद्रधुनी राजकीय दृष्ट्या ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स या दोन देशांच्या सीमांतर्गत येत असली, तरी यातील वाहतूक मार्ग सर्व देशांसाठी खुला आहे. इंग्लंडमधील डोव्हर आणि फॉक्स्टोन, तर फ्रान्समधील कॅले आणि बूलोन ही या सामुद्रधुनीच्या किनाऱ्यावरील प्रमुख बंदरे आहेत. दररोज सुमारे चारशेहून अधिक व्यावसायिक जहाजांची ये-जा या मार्गावरून होते. वाढत्या वाहतुकीमुळे सामुद्रधुनीतील पाण्याचे होणारे प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे.

इंग्लंड आणि फ्रान्स या दोन देशांदरम्यानच्या डोव्हर सामुद्रधुनीच्या तळाखालून लोहमार्ग बोगदा काढण्याची योजना पहिल्यांदा इ. स. १८५६ मध्ये प्रस्तावित करण्यात आली होती; परंतु त्यानंतर १३० वर्षे हा प्रकल्प मार्गी लागला नाही. पुढे १९८७ ते १९९१ या कालावधीत हा बोगदा खोदण्यात आला आणि १९९४ पासून तो अधिकृतपणे वाहतुकीस खुला करण्यात आला. सामुद्रधुनीचा तळ मृदु खडकाचा असला, तरी त्याच्याखालील ४५ मीटर खोलीवरील कठीण चॉक खडकातून हा बोगदा काढला आहे. या बोगद्याची लांबी ५० किलोमीटर आहे. हा बोगदा इंग्लंड व फ्रान्स यांच्या दरम्यानचा प्रमुख वाहतूकमार्ग आहे. या मार्गाने दररोज सुमारे ५०० रेल्वेगाड्या ये-जा करतात. २०१८ मध्ये या मार्गावरून सुमारे ११ द. ल. प्रवासी आणि १.२२ द. ल. टन मालवाहतूक झाली. इंग्लंड-फ्रान्स यांच्या किनाऱ्यांदरम्यान या सामुद्रधुनीतून वेगवान फेरी वाहतूक चालते.

अनेक ऐतिहासिक नाविक युद्धे या सामुद्रधुनी परिसरात लढली गेली. त्यांपैकी इ. स. १५८८ मधील युद्धात इंग्लंडवर हल्ला करण्यासाठी आलेल्या स्पॅनिश आरमाराला इंग्लंडने मागे हटविले होते. पहिल्या महायुद्धाच्या काळात बूलोन येथे प्रमुख लष्करी तळ होता, तर डोव्हर सामुद्रधुनीतून वाहतूक करणाऱ्या जहाजांच्या संरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘डोव्हर पेट्रोल’ नौसेनेचे डोव्हर हे प्रमुख केंद्र होते.

आकाश निरभ्र असताना उघड्या डोळ्यांनी इंग्लंड आणि फ्रान्स यांना एकमेकांचे किनारे सहज दिसतात. विशेषतः डोव्हरचे पांढऱ्या रंगाचे कडे फ्रान्सच्या किनार्‍यावरून दिसतात. तसेच दोन्ही देशांच्या किनाऱ्यावरील इमारती आणि रात्रीच्या वेळचा दिव्यांचा झगमगाट एकमेकांना दिसतो. या सौंदर्याचे वर्णन इंग्रज कवी मॅथ्यू अर्नॉल्ड यांच्या ‘डोव्हर बीच’ या कवितेत आलेले आहे. सामुद्रधुनीतील जैवविविधता, मासेमारी, किनाऱ्यावरील  वैशिष्ट्यपूर्ण भूमिस्वरूपे, वाहतुकमार्ग, पर्यटन इत्यादी दृष्टीने या सामुद्रधुनीला विशेष महत्त्व आहे. इंग्लिश खाडीप्रमाणेच ही सामुद्रधुनी जलतरणपटूंसाठी लोकप्रिय आहे.

समीक्षक : वसंत चौधरी